मुंबई : राज्यातील महिलांच्या बँक खात्यात लवकरच लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता जमा होणार आहे. येत्या २९ सप्टेंबर रोजी हा लाभ मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत येत्या २९ सप्टेंबर रोजी रायगड येथे तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात वंचित राहिलेले लाभार्थी आणि २४ ऑगस्टनंतर आलेले अर्ज तसेच सप्टेंबर महिन्याच्या २५ तारखेपर्यंत अर्ज करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना डीबीटीमार्फत लाभ वितरित करण्यात येणार आहे. यामध्ये ज्या १ कोटी ६० लाख महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला आहे त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ मिळणार आहे. तसेच ज्यांना काही अडचणींमुळे अद्याप लाभ मिळालेला नाही त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचा लाभ वितरित करण्यात येणार आहे. २९ सप्टेंबर रोजी २ कोटींपेक्षा अधिक महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार आहे," असे त्यांनी सांगितले.
हे वाचलंत का? - "अशा गुन्हेगारांना तुडवून...", बदलापूर एन्काऊंटर प्रकरणावर उदयनराजेंचं वक्तव्यं
महायूतीमध्ये ७० ते ८० टक्के जागावाटप पूर्ण!
"आम्ही पुढच्या काळात महायूती म्हणूनच निवडणूका लढवणार आहोत. आपल्या पक्षाच्या संघटनेच्या जोरावर विधानसभेच्या जागेची मागणी करणं हा महायूतीमधील प्रत्येक घटक पक्षाचा अधिकार असतो. पण अंतिम निर्णय हा वरिष्ठांकडे असतो. ते जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू. महायूतीमध्ये ७० ते ८० टक्के जागावाटप पूर्ण झालेलं आहे. ज्या जागांवर अडचणी आहेत त्यावर लवकरात लवकर तोडगा निघेल. पण सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ताकदीने निवडणूका लढवण्याचा निर्णय घेतला आहे," असेही आदिती तटकरेंनी सांगितले.