मुंबई : भारतीय भांडवली बाजारातील निफ्टी फार्मा इंडेक्समध्ये तुफान वाढ झाली आहे. नवीन औषधे आणि किमतींमुळे फार्मास्युटिकल क्षेत्राला मोठी उभारी मिळाली असून निफ्टी फार्मा इंडेक्सने ३९ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. अमेरिकन बाजारातील सुधारणा यासह फार्मा कंपन्यांबद्दलच्या धोरणात्मक निर्णयामुळे फार्मा इंडेक्समध्ये भरघोस वाढ दिसून आली आहे. एकंदरीत, अमेरिकन बाजारातील मागणी आणि देशांतर्गत वाढ फार्मा क्षेत्राला मदत करेल, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आठ फार्मास्युटिकल कंपन्यांच्या बाजार भांडवलाने तब्बल १ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी फार्मा निर्देशांक यंदाच्या वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम कामगिरी करणारा निर्देशांक ठरला आहे. विशेष म्हणजे वर्षभराच्या कालावधीत इंडेक्सने ३९ टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. हा निर्देशांक निफ्टी-५० निर्देशांकाच्या तुलनेत १७ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
या आठवड्यात आठ सुचीबद्ध औषध कंपन्यांचे बाजार भांडवल १ लाख कोटी रुपये पार केले. तर वर्षभरापूर्वी फक्त तीन कंपन्या हा आकडा गाठू शकल्या होत्या. सद्यस्थितीस या यादीत मॅनकाइंड फार्मा नवे नाव जोडले गेले आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही वाढ या क्षेत्राची वाढीचा वेग टिकवून ठेवण्याची क्षमता, नवीन औषध लॉन्च, मजबूत जेनेरिक किंमत, यूएस मार्केटमध्ये औषधांचा तुटवडा आणि देशांतर्गत बाजारपेठेतील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे झाली आहे.