LICने लाँच केला NFO म्युच्युअल फंड! अर्ज करण्यासाठी ४ ऑक्टोबरची मुदत

23 Sep 2024 17:24:28
lic-mutual-fund-launches-manufacturing-fund


मुंबई :    सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा कंपनी(LIC)ने गुंतवणूकदारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. एलआयसी म्युच्युअल फंडाने नवीन 'मॅन्युफॅक्चरिंग फंड' लाँच केला असून गुंतवणूकदारांना ४ ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. या म्युच्युअल फंडाकरिता अर्ज करण्यासाठी ४ ऑक्टोबररची मुदत ठेवण्यात आली आहे. ही योजना निफ्टी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्सच्या मानकांवर ठेवली जाणार आहे.


दरम्यान, एलआयसीनुसार, नवीन फंड ऑफर(एनएफओ) दि. ०४ ऑक्टोबरपर्यंत खरेदी करता येईल तर योजनेअंतर्गत युनिट्सचे वाटप दि. ११ ऑक्टोबर रोजी केले जाणार आहे. फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आर. झा म्हणाले, भारताची मजबूत आर्थिक वाढ, जलद शहरीकरण, वाढती मध्यमवर्गीय लोकसंख्या, निर्यात प्रोत्साहन आणि पीएलआय योजना आणि 'मेक-इन-इंडिया' सारख्या धोरणात्मक उपक्रमांमुळे उत्पादित वस्तूंची मागणी वाढत आहे.

कंपनीने सांगितले की योजनेचे उद्दिष्ट उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांचे विविध विभाग प्रदान करणे आहे. यात ऑटोमोबाईल्स, फार्मास्युटिकल्स, रसायने, जड अभियांत्रिकी उत्पादने, धातू, जहाजबांधणी आणि पेट्रोलियम उत्पादने यांचा समावेश आहे. एलआयसी आयपीओला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता कंपनीकडून गुंतवणूकदारांसाठी खास म्युच्युअल फंडाची ऑफर दिली आहे. परिणामी, गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचा नवा पर्याय विमा कंपनीने उपलब्ध करून दिला आहे.
 

Powered By Sangraha 9.0