नवी दिल्ली : भारतातील रिअल इस्टेट बाजारात मोठी संधी असून मंदीच्या सावटापासून क्षेत्राला कोणताही फटका बसणार नाही. दरम्यान, देशातील रिटेल क्षेत्रात मंदीच्या सावटाची कुठलीच शक्यता नसून विकासकांकडून योग्य ठिकाणी आणि आकर्षक किमतीत निवासी मालमत्तांना मोठी मागणी आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रणी संस्था असलेल्या 'कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया'(क्रेडाई)नुसार भारतातील मालमत्ता किंमतीमध्ये गेल्या ३-४ वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे.
दरम्यान, रिअल इस्टेट क्षेत्रात सद्यस्थितीस प्रॉपर्टीच्या किमती फारशा वाढणार नाहीत किंवा त्यात थोडीशी घसरण होऊ शकते, असे गुंतवणूकदारांचा अंदाज आहे. परंतु, रिअल इस्टेट संस्था क्रेडाई या अनुमानांशी सहमत नाही. कारण, भारतीय रिअल इस्टेट मार्केटमध्ये घरांची मागणी मजबूत आहे आणि मंदीची कोणतीही चिन्हे नाहीत, आणि मागणी पूर्ण करण्यासाठी आणखी नवीन गृहनिर्माण प्रकल्प सादर करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वोच्च संस्था क्रेडाईच्या मते, कमी ऑफरमुळे घरांची विक्री कोणत्याही तिमाहीत कमी होऊ शकते. परंतु कोविड-१९ जागतिक महामारीनंतर ग्राहकांची वाढलेली मागणी कायम आहे. देशातील गृहनिर्माण बाजारपेठेतील मागणी सदाबहार अशी असून ऑफर्सची संख्या कमी असल्यामुळे एप्रिल-जून तिमाहीत प्रेस्टिज इस्टेट प्रकल्पांच्या विक्री बुकिंगमध्ये घट झाली आहे. क्रेडाईचे देशभरात सुमारे १४,००० रिअल इस्टेट डेव्हलपर सदस्य आहेत.