मेळ मैत्रीचा

23 Sep 2024 21:50:24

Shri Ram and Laxman
 
‘आप’चे नेते मनीष सिसोदिया यांनी तर चक्क स्वतःची आणि अरविंद केजरीवाल यांची तुलना भगवान श्री राम आणि लक्ष्मण यांच्याशी केली. दिल्लीतील ‘जंतरमंतर’ येथे आयोजित सभेत त्यांनी बोलताना हे विधान केले. यावेळी त्यांनी तुरुंगात असताना सीबीआयने त्यांच्याशी काय चर्चा केली हे सांगितले. 
 
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला. पण, तो जामीन केजरीवालांची कोंडी करणारा ठरला. केजरीवालांना जामीन मिळाला तो, अनेक अटी-शर्तींवर. ना मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार, ना फाईलवर सही करता येणार. बैठक घेण्याचाही अधिकार त्यांच्याकडून काढून घेतला. त्यामुळे केजरीवाल मुख्यमंत्री राहूनही मुख्यमंत्री नसल्यासारखेच होते. कोणतेही निर्णय त्यांना घेता येणार नव्हते. त्यामुळे त्यांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय नव्हता. अटी-शर्ती सर्वोच्च न्यायालयाने घातल्यानंतर त्यांना राजीनामा देण्याची बुद्धी सुचली. मात्र, इतके दिवस दिल्लीकर आणि दिल्लीला वार्‍यावर सोडून केजरीवाल तुरुंगात असूनही राज्य कारभार हाकत होते. खुर्चीला अगदी चिकटून राहिले.
 
मात्र, जेव्हा जामीन मिळाला, तेव्हा मात्र त्यांना राजीनाम्याचे सोंग सुचले. केजरीवाल बाहेर आल्यानंतर मग अन्य नेत्यांनीही आपली खुर्ची वाचविण्यासाठी केजरीवालांच्या कौतुकाचे पूल बांधण्यास सुरूवात केली. ‘आप’चे नेते मनीष सिसोदिया यांनी तर चक्क स्वतःची आणि अरविंद केजरीवाल यांची तुलना भगवान श्री राम आणि लक्ष्मण यांच्याशी केली. दिल्लीतील ‘जंतरमंतर’ येथे आयोजित सभेत त्यांनी बोलताना हे विधान केले. यावेळी त्यांनी तुरुंगात असताना सीबीआयने त्यांच्याशी काय चर्चा केली हे सांगितले. “अरविंद केजरीवाल यांनी आपले नाव दिल्याचे सांगून, सिसोदिया यांनीही केजरीवाल यांचे नाव घेतले, तर त्यांचा जीव वाचू शकतो,” असे अधिकारी म्हणाले, यावर सिसोदिया म्हणाले, “तुम्ही लक्ष्मणाला रामापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहात. जगात अशी कोणतीही शक्ती नाही जी, लक्ष्मणाला रामापासून वेगळे करू शकेल.” या वक्तव्यात सिसोदिया यांनी स्वतःला ‘लक्ष्मण‘ आणि केजरीवाल यांना ’राम’ म्हणून संबोधले. आपल्या आणि केजरीवाल यांच्यातील 26 वर्षांच्या मैत्रीचा दाखलादेखील त्यांनी दिला. परंतु, कथित मद्य घोटाळ्यात नावे आल्यानंतर आता, ही सोंगे सिसोदिया यांना सुचत आहे. प्रभु श्रीराम आणि लक्ष्मण यांच्याशी तुलना केली खरी, पण अयोध्येतील प्राणप्रतिष्ठासोहळ्या दरम्यान केजरीवाल काय करत होते, याचीही माहिती सिसोदिया यांनी घ्यावी. मैत्री म्हणत घोटाळ्यात अडकले आणि त्याचबरोबर दिल्लीकरांनाही ‘आम आदमी’ म्हणत म्हणत त्यांचे हाल केले.
खेळ खुर्चीचा...
आम आदमी पक्षाची सध्या राजकीय पक्ष कमी आणि नाटक कंपनी जास्त अशी गत. कारण, खोटेपणाची आणि राजकीय नाटकांची एकापेक्षा एक कथानके रचण्यात ‘आप’ नेत्यांचा हात कुणीही धरू शकत नाही. ‘आप’च्या नेत्या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी सोमवार, दि. 23 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. मात्र, त्यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ज्या खुर्चीवर बसत होते, ती खुर्ची मात्र रिकामीच ठेवली. आतिशी यांनी केजरीवालांची खुर्ची रिकामी ठेवल्याने नवा वादंग निर्माण झाला आहे. आम आदमी पक्षाचे नेते म्हणवणार्‍या केजरीवालांची वाटचाल तर, एका हुकूमशाह होण्याकडे सुरू झाल्याचेच यावरून दिसून येते. कारण, मुख्यमंत्री आतिशी असतानाही खरा राज्य कारभार मात्र अरविंद केजरीवालच पाहणार हे तर, आतिशी यांनी आपल्या कृतीतून स्पष्ट केले आहे. त्यामुळे केजरीवाल प्रत्यक्षात मुख्यमंत्री नसले तरीही, ते पडद्यामागून दिल्लीचा कारभार पाहणार आहेत. एकंदरीत आतिशी या नामधारी मुख्यमंत्री म्हणूनच काम पाहणार आहेत.
 
‘दिल्लीतील नागरिक आता केजरीवालांना आगामी विधानसभा निवडणुकीत बहुमताने निवडून आणतील तेव्हा, ते या खुर्चीवर बसतील. तोपर्यंत खुर्ची केजरीवालांची वाट पाहिल.’ असे आतिशी यांनी सांगितले. आतिशी यांनी पहिल्याच दिवशी हा खुर्चीचा खेळ मांडला. इतक्या दिवसांपासून दिल्लीला मुख्यमंत्री असूनही नसल्यासारखा होता, त्यात आतिशी यांची एन्ट्री होऊनही मुख्यमंत्री पदाची संगीत खुर्ची करून टाकली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची आजही रिकामीच आहे, कारण त्यांचा तसा दरारा होता, ते संविधानिक पदावरही नव्हते. मात्र, इकडे आतिशीबाईंनी मात्र नाटकीपणाचे सगळे विक्रम एका दिवसात मोडीत काढले. एक खुर्ची अशी खाली दिसणार असेल तर, मग ‘आप’मध्ये आणि दिल्लीत लोकशाही फक्त नावाला उरली आहे, असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. आधी प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या दिल्लीकरांना वार्‍यावर सोडले होते. सम-विषमचा खेळ मांडून तेव्हाही दिल्लीकरांची डोकेदुखी वाढवली होती. त्यानंतर कथित मद्य घोटाळ्याने दिल्लीत सरकारच सुट्टीवर गेले होते. त्यात आतिशी यांच्या वायफळ आतिषबाजीने दिल्लीकरांच्या तोंडाला पुन्हा एकदा पाने पुसली आहेत.
 
Powered By Sangraha 9.0