मुंबई : महायुतीतून कोण बाहेर पडणार याचा विचार करण्यापेक्षा एवढं लाचार होऊन तुम्हाला एक दिवसाचं मुख्यमंत्रीपद तरी मिळेल का, याची काळजी घ्या, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांवर केली आहे. संजय राऊतांनी महायूतीवर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
केशव उपाध्ये म्हणाले की, "महाराष्ट्रातल्या निवडणुका अजून जाहीर झाल्या नाहीत, तोवर महाविकास आघाडीमध्ये उबाठा आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदावरून भांडण सुरू झालं आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेस उघडपणे नाही म्हणत असताना शिवसेना उबाठा तेवढ्याच लाचारपणाने उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार असे सांगत आहेत. आता तर मुख्यमंत्रीपद एकमेकांकडून हिसकावून घेण्याची भाषाही करत आहेत."
हे वाचलंत का? - छत्रपती संभाजीराजे जरांगेंच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल!
"महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करणाऱ्यासाठी असून घरी बसण्यासाठी किंवा भांडत बसण्यासाठी नाही, हे महाविकास आघाडी विसरली असावी. त्यामुळे महायुतीमधून कोण बाहेर पडणार आणि कोण राहणार याचा विचार करण्यापेक्षा तुम्हाला एवढा लाचार होऊन एक दिवसाचे मुख्यमंत्री पद तरी मिळते का? याची काळजी करा," असा सल्ला त्यांनी राऊतांना दिला आहे.