विद्यार्थी घडविणारा ‘देव’

22 Sep 2024 20:27:53
devendra tamhane
 

कल्याण येथील आदर्श शिक्षक, मार्गदर्शक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून नावलौकिक असणारे देवेंद्र ताम्हणे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील 35 वर्षांच्या बहुमोल योगदानाचा आढावा आजच्या लेखातून

शाळेत गणित आणि विज्ञान हे विषय सर्वांनाच घाम फोडतात. मात्र, हेच विषय अगदी सोप्या पद्धतीने मांडत, विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचविण्याचे काम, कल्याण येथील आदर्श शिक्षक, मार्गदर्शक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून नावलौकिक असणारे, देवेंद्र ताम्हणे गेली 35 वर्षे करत आहेत. कल्याण येथे वास्तव्यास असणारे देवेंद्र अनंत ताम्हणे यांनी, मुंबई विद्यापीठातून भौतिकशास्त्रातील पद्व्युत्तर शिक्षण पूर्ण केले. यावेळी ताम्हणे हे आपल्या महाविद्यालयात प्रथम आले होते. त्यांनी शिक्षण घेत असतानाच आपल्या परिसरातील काही शिकवणी वर्गांमध्ये, अर्धवेळ अध्यापनास सुरुवात केली होती. तेव्हापासून सुरु झालेला हा प्रवास ’Empowering education and creating happiness’ हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवत, देवेंद्र ताम्हणे गेली 35 वर्षे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना मार्गदर्शन करत आहे.

ताम्हणे सरांना विद्यार्थी घडविण्याचे बाळकडू हे आपल्या आईकडूनच मिळाले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सरांच्या आई देखील मुंबई महानगरपालिका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी, ब्रेल लिपीमध्ये शैक्षणिक पुस्तके रूपांतरित करून दिली. तसेच त्या विविध सामाजिक संस्थांबरोबरही कार्यरत आहेत. तर देवेंद्र ताम्हणे यांच्या पत्नी माधवी, मुंबई महापालिकेत साहाय्यक अभियंता या पदावर कार्यरत आहेत. मुलगा वेदांग हा ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च, तिरुपती’मधून ‘बीएसएमएस’ झाला आहे. तर मुलगी सानिका यंदाच्या वर्षी रसायनशास्त्रातील ‘पदवीच्या अंतिम वर्षाला आहे. देवेंद्र ताम्हणे म्हणतात की,’फॅमिली इज द युनिट ऑफ सक्सेस’. आपल्या यशात ते कुटुंबीयांचा सर्वाधिक वाटा असल्याचे आवर्जून सांगतात.

1997 साली ताम्हणे सरांनी ’चिंतन क्लासेस’ नावाने, आपले स्वतःचे मार्गदर्शनकेंद्र कल्याण इथे सुरु केले. त्यांनी 1997 ते 2020 या कालावधीत या क्लासच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी घडविले. याच दरम्यान त्यांचा परिचय सुप्रसिद्ध लेखक मुलाखतकार आणि मनोविकासतज्ज्ञ, डॉ. आनंद नाडकर्णी सरांसोबत झाला. ’वेध’ परिषद हा त्या काळात नावाजलेला उपक्रम होता. या उपक्रमांत त्यांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत. तसेच यादरम्यान होणार्‍या स्पर्धांतदेखील हे विद्यार्थी घवघवीत यश संपादित करत. या माध्यमातून ताम्हणे सर, आनंद नाडकर्णी यांच्या ‘आयपीएच’ या संस्थेबरोबर गेली 25 वर्षे कार्यरत आहेत.
 
हे काम सुरु असतानाच ताम्हणे सरांच्या लक्षात आले की, आठवी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच, व्यावसायिक आणि करिअर मार्गदर्शन ही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच त्यांनी ‘पाथेय शैक्षणिक सामाजिक ट्रस्ट, कल्याण’ नावाने संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून कल्याण परिसरातील विद्यार्थ्यांसाठी, विविध उपक्रम राबवले जातात. त्यातील एक सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘वेध व्यवसाय परिषद’ हा आहे. आत्तापर्यंत या संस्थेच्या माध्यमातून कल्याणमध्ये आठ ‘वेध व्यवसाय परिषदां’चे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. इतकेच नाही, तर, राज्यभरातील शाळा आणि महाविद्यालयात ताम्हणे सरांच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन केले जाते.

खरं तर इतके विद्यार्थी घडवायचे म्हणजे स्वतःदेखील अनुभव संपन्न आणि अभ्यासक, चिकित्सक असणे आवश्यक आहे. हा अभ्यास आणि चिकित्सक वृत्ती कायम जागृत ठेवण्याचे काम पुस्तके करतात. ताम्हणे सर स्वतः उत्कृष्ट वाचक असून, त्यांचे स्वतःचे जवळजवळ पाच हजार पुस्तकांचे ग्रंथालय आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून ते, राज्यभरात आपल्या व्याख्यान आणि विविध उपक्रमांदरम्यान उत्कृष्ट पुस्तकांचा प्रचार आणि प्रसार करतात. विविध उपक्रमांच्या माध्यमातून, त्यांनी आत्तापर्यंत 20 लाख रुपयांची पुस्तके राज्याच्या दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली.

शैक्षणिक वर्ष 2019-2020मध्ये ताम्हणे सरांनी, संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान तसेच स्पर्धापरीक्षांची तयारी कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले. अभ्यासाचे महत्त्व सांगतानाच, लैंगिकता शिक्षण आणि विविध विषयांवर त्यांनी दहा हजार विद्यार्थ्यांपर्यंत, प्रत्यक्ष पोहोचून मार्गदर्शन केले आहे. कोरोनाकाळातही त्यांनी ‘झुम’च्या माध्यमातून आपले कार्य सुरूच ठेवले होते. याकाळात तर जगभरातून विद्यार्थी-शिक्षक सरांच्या व्याख्यानात, मार्गदर्शन उपक्रमात सहभागी झाले होते. इतकेच नाही, तर सरांनी नुकतेच दि. 5 एप्रिल ते दि. 4 मे या कालावधीत, मेघालयातील ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना ‘सेवा भारती’च्या माध्यमातून गणित आणि विज्ञान विषयांचे मार्गदर्शन केले.


‘सेवा भारती’च्या वसतिगृहात, एक महिनाभर ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान या विषयांचे मार्गदर्शन केले. याच उपक्रमांतर्गत मेघायलयातील शाळेमध्ये प्रयोगशाळा उभे करण्याचे महत्त्वाचे कामही ताम्हणे सरांनी हाती घेतले आहे. फेब्रुवारी 2025 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवत, ताम्हणे सर वाटचाल करत आहे. प्रथम जेव्हा ताम्हणे सर मेघालयात ग्रामीण भागांत विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी गेले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, अगदी नववी, दहावी ‘सीबीएससी’ माध्यमातून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी थर्मामीटर, भिंग यांसारख्या प्रयोगशाळेतील वस्तू कधीही पाहिल्यादेखील नाहीत. हे पाहाता, या विद्यार्थ्यांसाठी एक प्रयोगशाळा उभारण्याचे शिवधनुष्य त्यांनी हाती घेतले आहे. आता हे ध्येय पूर्ण करण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु आहे. विद्यार्थी घडविण्याच्या त्यांच्या या स्त्युत्य ध्येयाला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या अनेकानेक शुभेच्छा!


Powered By Sangraha 9.0