मुंबई, दि.२१: (Dharavi)धारावीतील क्रिकेटपटूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या 'धारावी प्रीमियर लीग' (DPL) च्या दुसऱ्या हंगामाची सुरुवात शुक्रवारपासून मोठ्या उत्साहात झाली. 'धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल)च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या लीगमध्ये धारावीतील स्थानिक खेळाडूंचे एकूण १४ संघ सामील होणार आहेत. धारावीतील 'डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स'च्या मैदानावर हे सामने रंगतील. विजेत्या संघाचे पुढील सामने शनिवारी खेळवले जाणार असून अंतिम विजेत्या संघाला आकर्षक चषक आणि १ लाख रुपयांचा धनादेश तर उपविजेत्या संघाला आकर्षक चषकासह ५० हजार रुपयांचा धनादेश दिला जाणार आहे.या लीगच्या माध्यमातून धारावीतील खेळाडूंना पहिल्यांदाच टर्फ क्रिकेटचा थरार अनुभवता येणार आहे. 'अपना टाईम आ गया' या ब्रीदवाक्यसह धारावीतील तरुणाई या तीन दिवसीय लीगमध्ये क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटणार आहे.
"'आंतरराष्ट्रीय टी-२०' क्रिकेटच्या धर्तीवर खेळवल्या जाणाऱ्या डीपीएलचा पहिला हंगाम स्थानिक खेळाडू आणि क्रिकेट रसिकांच्या उदंड प्रतिसादात यावर्षीच्या मे महिन्यात पार पडला होता. यावेळी धारावीच्या सेक्टर १ मधील सुमारे २०० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. यानंतर स्थानिक खेळाडूंच्या मागणीनुसार सेक्टर २ मध्ये डीपीएल १.२चे आयोजन करण्यात आले आहे" असे डीआरपीपीएलच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.
मिनी इंडिया अशी ओळख असलेल्या धारावीमध्ये विविध सेक्टरमध्ये एकूण ६ टप्प्यांत या लीगचे आयोजन करण्यात येणार आहे. डीपीएल १.२ मध्ये सेक्टर २ मधील कुंभारवाडा, सोशल नगर, राजीव गांधी नगर, जीवनज्योत रहिवासी संघ, महात्मा गांधी नगर, मुस्लिम नगर या परिसरातील क्रिकेट संघ सहभागी झाले असून या संघाना आयोजकांच्या वतीने विशेष जर्सी देखील वितरित करण्यात आल्या आहेत. या लीग मध्ये धारावीतील कुंभारवाडा बॉइज, धारावी मास्टर ब्लास्टर, धारावी थालायवा, क्रिकेट फायटर्स, अँग्री बॉईज, थंडर इलेव्हन वॉरियर्स यांसारखे एकूण १४ संघ सहभागी होणार आहेत.
"डीपीएलच्या पहिल्या सीजनचे सामने हे केवळ सेक्टर १मधील खेळाडूंसाठी असल्याने आम्हाला यामध्ये सहभागी होता आले नव्हते. आपल्यालाही अशा प्रकारच्या दर्जेदार लीगमध्ये सहभागी होऊन आपले क्रीडा नैपुण्य दाखवण्याची संधी मिळावी, हे माझे आणि माझ्या मित्रांचे स्वप्न होते. डीपीएल 1.2 च्या निमित्ताने हे स्वप्न पूर्ण झाले असून यासाठी मी व्यक्तिशः आयोजकांचे आभार मानतो."
-अंकितदीप सरोज, कॅप्टन (थंडर इलेव्हन वॉरियर्स)