मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bangladesh Durgapooja) बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांविरोधात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर 'बांगलादेश राष्ट्रीय हिंदू आघाडी'ने आगामी दुर्गापूजेच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या अंतरिम सरकारकडे चार प्रमुख मागण्या केल्या आहेत. यापूर्वी गणेशोत्सवादरम्यान येथील गणेश मंडळांवर हल्ले करण्यात आले होते. त्यामुळे आगामी दुर्गापूजेच्या दिवशीसुद्धा असे हल्ले होऊ शकतात अशी शक्यता बांगलादेश राष्ट्रीय हिंदू आघाडीकडून वर्तवण्यात आली आहे.
हे वाचलंत का? : धारावीत प्रचंड तणाव! बेकायदा मशिदीवर कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या गाड्यांची तोडफोड
ढाका येथे बांगलादेश राष्ट्रीय हिंदू आघाडीची नुकतीच एक पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उपस्थित नेते म्हणाले की, ९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या उत्सवादरम्यान दुर्गापूजा मंडपांवर मोठ्या प्रमाणात हल्ले आणि तोडफोड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांगलादेश नॅशनल हिंदू अलायन्सने सर्व कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या पूजा मंडपांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासह सुरक्षा उपायांमध्ये वाढ करावी. दुर्गापूजेच्या वेळी सर्व पूजा मंडपांवर लष्करी जवान तैनात करावेत. त्यासोबतच अल्पसंख्याक संरक्षण कायदा आणि अल्पसंख्याक आयोग स्थापन करावा.
पुढे ते म्हणाले की, दुर्गापूजा संपूर्ण राष्ट्रासाठी एकता आणि उत्सवाचे प्रतिनिधित्व करते. यासाठी महत्त्वपूर्ण बांधिलकी आणि धार्मिक रीतिरिवाजांचे पालन आवश्यक आहे. बांगलादेशच्या गृहमंत्रालयाने यापूर्वीच दुर्गापूजेदरम्यान हिंदूंवर अनेक निर्बंध जाहीर केले होते. मंत्रालयाने पूजा समित्यांना अजान आणि नमाजच्या पाच मिनिटे आधी दुर्गापूजा विधी आणि साउंड सिस्टम बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
तीन दिवसांची सरकारी सुट्टी देण्याची यावी
दुर्गापूजेसाठी किमान तीन दिवसांची सरकारी सुट्टी देण्याची यावी. एक दिवसाची सुट्टी सण आणि धार्मिक विधींमध्ये पूर्णपणे सहभागी होण्यासाठी पुरेशी नाही. त्यामुळे अष्टमी, नवमी आणि दशमीच्या दिवशी अधिकृत सुट्टी जाहीर करावी, अशी विनंती पत्रकार परिषदेदरम्यान करण्यात आली आहे.