मुंबई, दि. १९ : (Pan Card Jihad) मुंबईत सुरू असलेल्या ‘पॅन कार्ड जिहाद’च्या तपासाचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबई भाजप उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांच्या तक्रारीवर फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना बनावट पॅनकार्डची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्रातील मालवणी परिसरात बनावट पॅन कार्डचे पुरावे आचार्य पवन त्रिपाठी यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिले आहेत. याविषयी माहिती देताना त्रिपाठी म्हणाले की, “एका विशिष्ट समाजातील लोक मोठ्या प्रमाणात बनावट पॅन कार्ड तयार करीत आहेत. मुस्लीमबहुल भागांमध्ये शिताफीने हजारो लोकांनी बनावट पॅन कार्ड तयार करून घेतले आहेत. आयकर विभागाच्या नोंदींमध्ये लोकसंख्येपेक्षाही अधिक पॅन कार्ड आढळून आले आहेत.” त्रिपाठी यांचे म्हणणे आहे की, “हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा एक व्यक्ती एकापेक्षा अधिक पॅन कार्ड तयार करतो. बनावट पॅन कार्डचा वापर बेकायदेशीर व्यवहार आणि काळा पैसा वैध होऊ शकतो,” अशी शक्यतादेखील त्रिपाठी यांनी वर्तविली आहे.
बनावट पॅन कार्डप्रमाणेच बनावट आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड आणि आयुष्मान कार्ड तयार केले जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. आचार्य पवन त्रिपाठी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका व्यक्तीचे अनेक पॅन कार्ड असल्याचे पुरावे दिले आहेत. ही व्यक्ती मालाड विधानसभा क्षेत्रातील मालवणी परिसरातील आहे. त्रिपाठी यांनी या फसवणुकीचा सखोल तपास करून या टोळीचे भांडाफोड करण्याची मागणी केली आहे.
मोठ्या कटाची शक्यता!
“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांना आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांनादेखील तत्काळ सूचित करण्याचे आदेश दिले आहेत. मालाडच्या मालवणी परिसरात होणार्या या फसवणुकीच्या मागे कोणत्यातरी मोठ्या कटाची शक्यता नाकारता येत नाही,” अशी प्रतिक्रिया आचार्य पवन त्रिपाठी यांनी दिली.