नवी दिल्ली, दि. २० : (Amit shah) केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी छत्तीसगढ मधील नक्षलवादी हिंसाचारातील पीडितांशी संवाद साधला. यामध्ये बस्तर शांतता समितीच्या अंतर्गत छत्तीसगढ मधील नक्षलप्रभावित भागात नक्षली हिंसाचारामुळे बाधित ५५ जणांचा समावेश होता. यावेळी काही पीडितांनी आपली व्यथा गृहमंत्र्यांना सांगितली.
नक्षलवादी हिंसाचारातील पीडितांशी संवाद साधताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी वचनबद्ध आहे. मोदी सरकारच्या धोरणांमुळे आता डाव्या विचारसरणीचा नक्षलवाद केवळ छत्तीसगढमधील काही जिल्ह्यांपुरताच मर्यादित राहिला आहे. नक्षलवाद हा मानवता आणि देशाची अंतर्गत सुरक्षा या दोन्हींसाठी मोठा धोका आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार आणि छत्तीसगढ सरकार येत्या तीन महिन्यांमध्ये नक्षल प्रभावित झालेल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक सर्वसमावेशक योजना आणणार आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. या योजनेमुळे, देशभरात नक्षलवादाने प्रभावित झालेल्या लोकांना आरोग्यसेवा सुविधा, रोजगाराच्या संधी आणि इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळू शकेल, असे ते म्हणाले. नक्षलवाद्यांच्या मानवाधिकारांबाबत बोलणाऱ्यांनी नक्षलवादामुळे त्रस्त झालेल्यांच्या मानवाधिकारांचाही विचार करावा, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.