सर्व भाषांची जननी असलेल्या संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी झटणारे हरेशआनंद आमडेकर यांच्याविषयी...
हरेशआनंद सुधाकर आमडेकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील मनमाड गावी झाला. त्यांचे वडील परळ येथील गुणवत्ता प्रयोगशाळेच्या मध्य रेल्वेच्या मुख्यालयात कार्यरत असल्याने त्यांचे बालपण परळच्याच रेल्वे निवासालयात गेले. मध्य रेल्वे माध्यमिक शाळा येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर १९९२ मध्ये ‘गोखले एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयातून शालांत शिक्षण पूर्ण केले. आर. एम. भट्ट या बिगर कॉन्व्हेंट इंग्रजी माध्यम शाळेत संस्कृत हा गणितसदृश शास्त्रीय आणि गुणवर्धक विषय पर्यायाने मिळेल, अशी आशा होती. पण, ही सुविधा केवळ मराठी माध्यमास उपलब्ध असल्याने संस्कृत शिकण्याची त्यांची संधी हुकली. इथपर्यंत अभियांत्रिकी आणि त्यातून स्थापत्य शाखेतून शिक्षण घेण्याचे निश्चित केले. त्यानुसार माटुंगा येथील खालसा महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण झाल्यावर पुसदच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्नातक पदवी मिळवली, तर स्नातकोत्तर स्थापत्य व्यवस्थापनाचे व्यावसायिक शिक्षण पुणे येथून पूर्ण केले. नंतर वृत्तीकार्य करताना पर्यावरण विज्ञानातील पदवी (एमएससी) पूर्ण केली. कार्यस्थळी व्यावसायिक प्रशिक्षण म्हणून व्यवस्थापनाचे विविध विषयांचे उपक्रम, प्रणाली परीक्षण (सिस्टीम ऑडिट) यात अद्ययावत राहण्यासाठी त्यांचा अभ्यास आजतागायत सुरू आहे.
हरेश यांचे वडील सुधाकर विष्णुपंत आमडेकर हे रासायनिक विज्ञान शाखेमुळे रेल्वे सेवेत आणि आई जयश्री कला, भाषा शिक्षिका होत्या, तर भावंडेही अभियांत्रिकीत असल्यामुळे घरातून वेगळा असा वारसा नव्हता. त्यामुळे यांत्रिकीप्रमाणे स्थापत्यात ग्रीष्मकालीन प्रशिक्षण (समर ट्रेनिंग) ‘हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन’ कंपनीमध्ये वडील व अनेकांच्या साहाय्याने पूर्ण केले. पुढे इन्फ्रा, गृहनिर्माण असा प्रवास करत सध्या सूचना केंद्र (डाटा सेंटर) निर्माण करणार्या मुंबईतील खासगी संस्थेत मुख्य प्रकल्प नियंत्रकपदी कार्यरत आहेत.
संस्कृत भाषेव्यतिरिक्त हरेश यांनी इतरही अनेक छंद जोपासले आहेत. शालेय जीवनात काही काळ संगीत शिकल्यानंतर शिवाजी पार्कवर क्रिकेटचे धडेही घेतले. क्रिकेट पंच म्हणून परीक्षा देण्याचाही प्रयत्न केला. पण, अभियांत्रिकीसाठी मुंबई सोडल्यावर हे सगळे मागे पडले. तरी छंद म्हणून या सर्व गोष्टी जमेल तसा वेळ काढून जोपासल्याचे ते सांगतात.
संस्कृत प्रसाराची ओढ आणि प्रेरणा पालक, कुटुंबीय आणि गुरुजनांकडून मिळाल्याचे विशद करताना हरेश जुन्या आठवणींना उजाळा देतात. मुळात घरी पालकांसह शिक्षक-ज्येष्ठ नातेवाईक यांच्याकडून संघाच्या अनुकूल असे उत्तम संस्कार झाले. पुसदला असताना वेळोवेळी प्रचारक राहिलेले दामोदर सारोळकर यांनी नळकत आत्मीयतेने संस्कृतचे विचार रूजवले. याचीच परिणीती म्हणून २०१३ मध्ये ठाण्यात कावेसर येथे नव्याने सुरू झालेल्या शाखेत ते जाऊ लागले. २०१४ मध्ये दीपावलीत प्राथमिक वर्ग पूर्ण केला. संघाच्या मदतीने ‘संस्कृतभारती’ने राज्यभर पत्राद्वारे संस्कृत अभियान राबविले. याचे घोडबंदर नगराचे दायित्व तत्कालीन ठाणे जिल्हा संघचालक डॉ. विवेकानंद वडके यांनी हरेश आणि त्यांची पत्नी आकांक्षा यांच्यावर सोपवले. शाळेत हुकलेली संधी या उपक्रमामुळे चालून आली होती. तिचे त्यांनी सोने केले. सगळ्या भारतीय किंबहुना बहुतांश युरोपीय भाषांची जननी असलेली संस्कृत आपल्या ज्ञानवैभवाचे रक्षण करणारी भाषा आहे. घरी परवचा, स्तोत्रे, श्लोक हे बहुतांश संस्कृतमधून होतेच, पण अर्थ स्पष्ट होत नव्हता. अशा परिस्थितीत संस्कृत भाषाशिक्षण सुरू करायचे निश्चित करून संस्कृत प्रसारकाची वाट त्यांनी चोखाळली.
गेल्या दहा वर्षांत ‘पत्रद्वारा उपक्रमा’ची प्रभावी नोंदणी आणि धडपड करीत संस्कृत पुढे नेण्यासाठी ‘संस्कृतभारती’च्या पूर्व विस्तारिका आणि शिक्षिका स्मृती भाटे यांची मदत घेऊन त्यांनी आयोजित सध्याच्या श्रृंखलेतील पहिला वर्ग या आधारावर 2015 सालापासून ठाणे नगर सह-संयोजक हे दायित्व त्यांनी स्वीकारले. पुढे ठाणे प्रशासकीय जिल्हा संयोजक आणि गेली पाच वर्षे कोकण प्रांताचे संपर्कप्रमुख हे दायित्व त्यांच्यावर सोपवण्यात आले. कोरोनापश्चात गेली दोन वर्षे त्यांचे वेगाने काम सुरू आहे. विविध व्यक्ती आणि संस्थांना एकत्र करीत प्रभावी आणि यशस्वीपणे संस्कृत प्रसार, उपक्रमांचे आयोजन, भारतीय ज्ञानपरंपरेतील विषयांचे अध्ययन यांद्वारे राष्ट्रोत्थानास हातभार लावत आहेत. यात वैयक्तिक आणि कुटुंबस्तरावर काय करता येईल, यावर त्यांनी वैयक्तिक लक्ष निर्धारित केले आहे. याशिवाय ‘संस्कृतभारती’चे स्वतःचेप्रांत कार्यालय लवकरात लवकर सिद्ध व्हावे, यासाठी सर्व न्यासी तसेच कार्यकर्त्यांसह अथक प्रयत्न सुरू असल्याचे ते सांगतात.
संस्कृत प्रसाराचे त्यांचे कार्य उत्तरोत्तर पुढे सरकत आहे. विविध व्यक्ती आणि संस्थांना एकत्र करीत प्रभावी आणि यशस्वीपणे संस्कृत प्रसार, उपक्रमांचे आयोजन, भारतीय ज्ञानपरंपरेतील विषयांचे अध्ययन यांद्वारे राष्ट्रोत्थानास हातभार लावत आहेत.
संस्कृतसारखी वैज्ञानिक भाषा आणि त्यामधील ज्ञानकोष हे आजच्या काळातही उपयुक्त आहे. भारतीय ज्ञानपरंपरेची सांगड आपल्या अध्ययनात, व्यवसायात घालत, आपल्या ज्ञानकक्षा वाढवून संस्कृती-संस्कार-आत्मनिर्भरता हा भारतीय गौरवाचा वारसा सगळ्यांनी मिळून पुढे न्यावा, असे हरेश आवर्जून नमूद करतात. अशा या हरहुन्नरी संस्कृत प्रसारकाच्या पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!