योग - यम, नियम सारांश

02 Sep 2024 22:15:10
yoga pranayam sadhna

पारमार्थिक ध्येय हे नरदेहातच शक्य आहे. म्हणून आसने, प्राणायाम हे साधना समजून करावे. पारमार्थिक उन्नती म्हणजेच योग. कारण, योगाचा उद्देश जोडणे असा आहे. शरीर मनाला, मन आत्म्याला आणि आत्मा परमात्म्याला. यासाठी लागणारी सामग्री म्हणजे सद्गुण, ते आपल्यात निर्माण होण्यासाठी यम, नियमांचे पालन करावे लागते.

आपण मागील 13 लेख योगातील अष्टांगांपैकी पहिले दोन अष्टांग यम व नियम यांवर खर्च केले. पण, खरंच एवढे महत्त्व आहे का यांना? या प्रश्नाचे उत्तर होय, महत्त्व आहे, असे आहे. कारण, योगशास्त्रात जीवनाचा उद्देश काय दिला आहे? खायचे, प्यायचे अन् शौच करायचे एवढाच आहे की, घर-दार करायचे, मुले-बाळे करायची हा आहे? त्याला निश्चितच महत्त्व आहे. ते ऐहिक जीवन आहे. ते प्रत्येकाला आपल्या प्रारब्धाप्रमाणे मिळते. त्यासाठी करावे लागणारे प्रयत्नसुद्धा प्रारब्धानुसार प्रकृती आपल्याकडून करवून घेते. ते सगळे किडे, मुंग्या, पशुपक्षीसुद्धा करतात. मनुष्याचे थोडे वेगळे आहे. म्हणून म्हटले आहे,

प्रपंच करावा नेटका,
मग घ्यावे परमार्थ विवेका॥
समर्थ रामदास
कारण,माणसाला ऐहिक जीवनासोबतच पारमार्थिक जीवनसुद्धा आहे. तोच पशुयोनी व मनुष्ययोनीतील फरक आहे. तेथेच योग सुरू होतो, जेथे स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधायचे असते. म्हणून मनुष्यदेहाचे फार महत्त्व आहे.

नरदेह महती
नरदेह परम पावन।
जो भक्ति ज्ञानाचें आयतन।
जेणें साधे ब्रह्मज्ञान।
तो धन्य धन्य नरदेह॥127॥
जेणे नरदेहें जाण।
निःशेष खुंटे जन्ममरण।
जेणें जीव पावे समाधान।
स्वनंदघन स्वयें होय॥128॥
ज्या नरदेहाचे संगती।
होय अविद्येची निवृत्ती।
लाभे भगवत्पद प्राप्ती।
हे विख्यात ख्याती नरदेहीं॥129॥
ज्या नरदेहाची प्राप्ती।
प्राणिमात्र वांछिती।
प्राणी बापुडे ते किती।
स्वयें प्रजापती नरदेह वांछी॥130॥
ऐसे नरदेहाचे श्रेष्ठपण।
येथे साधे भक्तिविज्ञान।
परि भक्तिज्ञानास्तव जाण।
मनुष्यपण साधेना॥131 ।
एकनाथी भागवत अध्याय - 20
पारमार्थिक ध्येय हे नरदेहातच शक्य आहे. म्हणून आसने, प्राणायाम हे साधना समजून करावे. ते आपण पुढे बघू. ही पारमार्थिक उन्नती म्हणजेच योग. कारण, योगाचा उद्देश जोडणे असा आहे. शरीर मनाला, मन आत्म्याला आणि आत्मा परमात्म्याला. यासाठी लागणारी सामग्री म्हणजे सद्गुण, ते आपल्यात निर्माण होण्यासाठी यम, नियमांचे पालन करावे लागते. कोणत्या यम, नियमाने कोणते सद्गुण निर्माण होतात, ते सारांश रुपाने आपण खाली बघू. ते कसे पालन करावे म्हणजे निर्माण होतात, याचा ऊहापोह आपण मागील लेखांमध्ये केलेला आहे. येथे उजळणीदाखल सारांश रुपाने बघू.
 
यम पाळण्याची पद्धती
लाभ
1) सत्य विचार, उच्चार, आचार आणि व्यवहार सत्य करावे - धैर्यप्राप्ती
2) अहिंसा- शारीरिक, मानसिक आणि वाचिकनिर्वैरता
3) अस्तेय - विचार, वस्तू, धन, स्त्री-पुरुष आणि वेळ यांची चोरी करु नये.-निर्भयता
4) अपरिग्रह - आवश्यकतेपेक्षा जास्त संग्रह करू नये.- पर्याप्तता
5) ब्रह्मचर्य - पवित्र आचरण-पावित्र्यता
नियम पाळण्याची पद्धत
लाभ
1) शौच - शरीर, मन व साधन सुचिता शुद्धता
2) संतोष - आपल्या अधिपत्याखालील परिस्थितीवरच काम करणे-समाधान
3) तप- सातत्य, शरीर तापवणे, उपवास करणे इत्यादी-आत्मविश्वास
4) स्वाध्याय- सुशिक्षित बनणे-ज्ञानवृद्धी
5) ईश्वर प्रणिधान - कर्म ईश्वरार्पण करणे, तणाव व अहंकार निर्मूलन, नम्रता येते.
यासाठी जीवनात यम, नियम पालन करणे गरजेचे आहे.

डॉ. गजानन जोग 
9730014665
(लेखक योगोपचारतज्ज्ञ समुपदेशक आहेत.)
Powered By Sangraha 9.0