लांगूलचालनाचा नवा खेळाडू

02 Sep 2024 21:49:31
jan surajya prashant kishor


लांगूलचालन हा काही भारतीयांसाठी नवा विषय नाही, तर या आधी अनेक राजकीय पक्षांनी लांगूलचालनाचा मार्ग स्वीकारला आहे. यामध्ये मुस्लीम समाज हे या राजकीय पक्षांसाठी सहज जाळ्यात येणारे सावज ठरत आले. या स्पर्धेत आता ‘जन सुराज’ पक्षाची स्थापना करून, प्रशांत किशोर देखील सहभागी झाले आहेत. त्यांच्या राजकीय खेळीचा आढावा घेणारा हा लेख...

अल्पसंख्याक त्यातही मुस्लीम लांगूलचालन हे, भारतीय राजकारणाचे एक वैशिष्ट्य. कित्येक राजकीय पक्षांनी आपल्या अनेक पिढ्या, याच राजकारणात खर्ची घातल्या. अर्थात, भाजपसारख्या पक्षाने हे लांगूलचालन तोडण्याचा, आणि नवे राजकारण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चालविला आहे. अर्थात, त्याला यश येणार की नाही, हे येणारा काळच सांगू शकेल. त्याचवेळी सध्या तरी मुस्लीम लांगूलचालन हे, सुरूच राहणार असल्याचे चित्र आहे. याच लांगूलचालनामध्ये आता, प्रशांत किशोर यांनी नुकताच प्रवेश केल्याचे दिसून आले.

एकेकाळी राजकारण्यांना नव्या संकल्पनांचे धडे देणारे प्रशांत किशोर हे, आता स्वतःच राजकारणी झाले आहेत. त्यातही ते राजकारण करणार आहेत, ते बिहारसारख्या अतिशय संवेदनशील आणि किचकट सामाजिक समीकरणे असलेल्या राज्यात. येथे आहेत नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्यासारखे तगडे प्रादेशिक खेळाडू, आणि भाजपसारखा एकाचवेळी दोन्ही पक्षांना आव्हान देणारा राष्ट्रीय पक्ष. तर या राज्यामध्ये ‘जन सुराज’ या नावाने राजकारणात नवा प्रयोग करण्याचा दावा करणारे प्रशांत किशोर, स्वतःला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, प्रशांत किशोर यांनादेखील मुस्लीम लांगूलचालनाचा नवा आधार घ्यावा लागला आहे.

त्य्यासाठीच प्रशांत किशोर यांनी पाटणा येथील बापू सभागृहात मुस्लीम समाजाची बैठक घेतली. ‘राजकारणातील मुस्लिमांचा सहभाग’ यावर चर्चा करणे, हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. यावेळी त्यांनी मुस्लीम समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, आणि राजकीय सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, त्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. ”सध्या मुस्लीम समाजाला उपेक्षित वागणूक मिळत असून, ती भेदभावपूर्ण आहे. आपण स्वतःला त्यांचा नेता मानत नसून, ‘जन सुराज’ अभियानाच्या माध्यमातून तळागाळातील लोकांच्या हिताचे रक्षण करणारी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही” प्रशांत किशोर यांनी यावेळी स्पष्ट केले.

सभेच्या सुरुवातीला प्रशांत किशोर यांनी कुराणातील एक आयत वाचून दाखवली. प्रशांत किशोर पुढे म्हणाले की, ”देशातील मुसलमानांच्या पूर्वजांनी, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि विकासात महत्त्वाची भूमिका बजावली, मात्र आज त्याच देशाच्या संसदेत असे कायदे केले जात आहेत, त्यामुळे मुस्लीम समाजामध्ये अस्वस्थता आहे.”; ‘सीएए-एनआरसी’ आणि ‘वक्फ बोर्ड’ यांसारख्या मुद्द्यांचा संदर्भ देत ते म्हणाले की, ”अशावेळी मुस्लीम समुदायाला त्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी, एकजुटीने पुढे यावे लागेल.” ते म्हणाले, ”‘सीएए-एनआरसी’ संसदेत कायदा झाला. ‘वक्फ बोर्डा’चे नवे कथानक लिहिण्याचा प्रयत्न संसदेच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे सल्लामसलत करण्याची हीच वेळ आहे. तुम्ही ज्यांना किमान दहा कोटी मते दिली.

मात्र, जेव्हा रस्त्यावर काही गरीब, असाहाय्य मुस्लमांनाना, जमावाने मारहाण केली तेव्हा, तुमच्या दहा कोटी मते मिळालेल्या लोकांपैकी, दहा लोकही तुमच्या पाठीशी उभी राहिली नाहीत. त्यामुळे मुस्लिमांनी आता नवा विचार करण्याची वेळ आल्याचे प्रशांत किशोर यांनी सांगितले. एकूणच प्रशांत किशोर हेदेखील तोंडी लावण्यापुरते विकासाचे राजकारण घेऊनच, जेवायला बसले आहेत. कारण, त्यांचे ताट तर केवळ लांगूलचालनानेच भरल्याचे सध्यातरी दिसत आहे. ‘सीएए’, ‘एनआरसी’ आणि ‘वक्फ सुधारणा कायद्या’विषयी, आगामी काळात अफवा पसरविण्यात प्रशांत किशोरदेखील हिरिरीने सहभागी झाले, तरीदेखील आता आश्चर्य वाटणार नाही.

अर्थात, प्रशांत किशोर यांनी अतिशय चलाखीने राजदच्या ‘एम-वाय’ अर्थात ‘मुस्लीम-यादव’ समीकरणाला धक्का लावण्याची तयारी केली आहे. ते म्हणाले, गेल्या ”30 वर्षांत भाजप पराभूत व्हावा, म्हणून फक्त ‘एम-वाय’ समीकरण शिकवले गेले. सत्य हे आहे की, आज ते समीकरण अजिबातच प्रभावी नाही. कारण जेथे ‘वाय’ उभा राहतो, तेथे ‘एम’ साथ देत नाही. त्याचवेळी जेथे ‘एम’ उभा असतो, त्यावेळी ‘वाय’ साथ देत नाही. या देशात भाजपला 36 टक्के मते मिळाली आहेत, तर बिहारमध्ये 80 टक्के हिंदू आहेत. भाजपला मतदान करणार्‍यांमध्ये अनेक जातींच्या लोकांचा समावेश आहे. गांधीजींना मानणारा हिंदू भाजपशी सहमत नाही. डॉ. आंबेडकर, जयप्रकाश आणि लोहिया यांना मानणारे हिंदूही, भाजपला मत देत नाहीत. ‘जन सुराज’चा पाया याच सूत्राच्या आधारे रचला गेला आहे,” असा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे.

एकूणच, भाजपवगळता मुस्लीम समाजाला ठराविक राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न एकही पक्ष करत नसल्याचे दिसते. अर्थात, त्यासाठी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मुस्लीम अनुनयाचा ठपका स्वजनांकडूनच ठेवला जातो. मुस्लिमांचा नवा मसिहा होण्याची तयारी प्रशांत किशोर यांनी चालविली आहे. त्यासाठी मुस्लिमांना त्याच ‘घेटो’मध्ये अडकविण्याची भाषा त्यांच्या तोंडी दिसते. प्रशांत किशोर हे तसे चलाख आहेत. त्यामुळे जुन्याच बाटलीत जुनीच दारू जुन्याच पद्धतीने भरून नव्याने कशी विकायची, याची तयारी त्यांनी केली असेलच. मात्र, प्रशांत किशोर यांच्या रुपात लांगूलचालनाच्या राजकारणात नवा खेळाडू आल्याचे स्पष्ट झाले आहे.


Powered By Sangraha 9.0