अन् हत्ती धावू लागतो तेव्हा...

02 Sep 2024 21:52:31
indian economy grew fast


जागतिक पातळीवर अनिश्चितता असतानाही, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास थक्क करणारा आहे. विदेशी गंगाजळीतही भरीव वाढ झाली असून जीएसटी संकलनही उच्चांकी होत आहे. भारतीय बाजाराचे निर्देशांकही नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. थोडक्यात आकाराने हत्तीसारखी अजस्र असणारी भारताची अर्थव्यवस्था आता वेगाने दौडू लागली आहे.
 
भारताची विदेशी गंगाजळी दि. 23 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात 7.023 अब्ज डॉलर्सनी वाढून, 681.688 अब्ज डॉलर्सच्या नव्या उच्चांकी पातळीवर पोहोचली. मागील आठवड्यात एकूण साठा 4.546 अब्ज डॉलर्सनी वाढून, 674.664 अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे असलेला भारताचा राखीव साठा याच आठवड्यात तीन कोटी डॉलर्सनी वाढून, 4.68 अब्ज डॉलर्स इतका झाला. भारताच्या रिझर्व्ह बँकेने यासंदर्भातील माहिती दिली आहे. भारताच्या विदेशी गंगाजळीत झालेली वाढ ही लक्षणीय अशीच आहे. जागतिक पातळीवर अस्थिरता असताना, जागतिक अर्थव्यवस्था अनिश्चिततेचा सामना करत असताना, भारतीय अर्थव्यवस्थेने जी आर्थिक स्थिरता, तसेच लवचिकता दाखवली आहे त्याचेच हे लख्ख प्रतिबिंब आहे, असे निश्चितच म्हणता येते.

गेल्या काही आठवड्यांपासून भारताच्या विदेशी गंगाजळीत सातत्याने वाढ होत आहे. दि. 16 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात ती 4.546 अब्ज डॉलर्सनी वाढून, 674.664 इतकी झाली होती. देशाचे आर्थिक आरोग्य राखण्यासाठी, विदेशी गंगाजळी महत्त्वपूर्ण असते. यात विदेशी चलन, सोन्याचा साठा, तसेच युरोपीयन पाऊंड आणि येन यांसारख्या बिगर अमेरिकी चलनांचा समावेश असतो.

विदेशी गंगाजळीत वाढ झाल्याने, त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवर अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतील. आर्थिक स्थिरता देण्याचे काम ही गंगाजळी करते. जागतिक पातळीवरील अस्थिरता, सहन करण्याची ताकद ही गंगाजळी अर्थव्यवस्थेला देते. भारतीय चलनाचे दर स्थिर राखण्यासाठी, ही गंगाजळी मध्यवर्ती बँकेच्या हाताशी असते. रुपयाचे अवमूल्यन होत आहे असे वाटले, तर मध्यवर्ती बँक आपल्याकडील विदेशी चलनाचा साठा बाजारात ओतून, रुपयाची पडझड होऊ देत नाही. त्यामुळे गुंतवणुकदारांचा विश्वास कायम राखण्यास मदत होते.

मजबूत राखीव स्थिती, सरकारला आर्थिक विकासाला चालना देऊन, पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांमध्ये धोरणात्मक गुंतवणूक करण्यास परवानगी देते. देशाच्या वाढीसाठी अशी गुंतवणूक ही, कधीही चालना देणारी ठरते. भारताच्या विदेशी गंगाजळीत झालेली वाढ हे म्हणूनच, देशाच्या आर्थिक आरोग्याचे सकारात्मक सूचक आहे. मध्यवर्ती बँकेचे सक्रिय व्यवस्थापन, जागतिक आर्थिक परिस्थिती, याने या वाढीस हातभारच लावला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता असतानाही, भारताने विकासाचा दर कायम ठेवला आहे, हेच यातून दिसून येते. ही विदेशी गंगाजळी अर्थव्यवस्थेसमोरील संभाव्य आव्हानांचा सामना करण्यासाठी, हातभार लावणारी ठरणार आहे. त्यासाठीच यात झालेली वाढ, ही स्थिरतेचे प्रतिक मानले जाईल.

विदेशी चलनसाठ्यात झालेली वाढ ही बहुतांशी थेट, विदेशी गुंतवणुकीतून होते. विदेशी संस्थागत गुंतवणुकदार भारतीय बाजारात निधी ओतत असतात, त्यामुळेही वाढ होते. भांडवलाचा हा ओघ पायाभूत सुविधाप्रकल्पांना निधी देऊन रोजगार निर्माण करून, आणि उत्पादकता वाढवून, आर्थिक विकासाला चालना देणारा ठरतो. मध्य पूर्वेतील वाढता तणाव, रशिया-युक्रेन युद्ध यांसारख्या, अनिश्चित परिस्थितीत आर्थिक मंदी किंवा वस्तूंच्या किमतीत चढउतार होऊ शकतो. अशावेळी, ही स्थिरता आर्थिक वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करते. गुंतवणुकदारांना आणि व्यवसायांना ती आश्वस्त करणारी असते.

अधिक संख्येने असलेले विदेशी चलन, स्थानिक चलनाला स्थिरता देते. त्यामुळे चलनवाढीचा धोका कमी होऊन, क्रयशक्ती वाढीस लागते. ही वाढलेली क्रयशक्ती पुन्हा एकदा आर्थिक वाढीला चालना देते. राखीव निधीमध्ये झालेली वाढ, सरकारच्या आर्थिक धोरणांवर तसेच, एकूण आर्थिक आरोग्यावर गुंतवणुकदारांचा विश्वास वाढवणारा असतो. हा आत्मविश्वास अधिक गुंतवणूक आकर्षित करतो, आणि ग्राहक खर्चाला प्रोत्साहन देतो. आयातीसाठी तो अतिरिक्त निधी देण्याची क्षमता निर्माण करतो. तसेच व्यापारी तूट व्यवस्थापित करण्यासही हातभार लावतो. आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करण्याबरोबरच, आर्थिक क्रियाकलाप तो वाढवतो. विदेशी गंगाजळी ही आर्थिक आरोग्याच्या अनेक सूचकांपैकी एक असली, तरी त्यांची वाढ सामान्यतः सकारात्मक तसेच वाढीच्या शक्यतांशी संबंधित असते.
 
मध्यवर्ती बँकेने, विदेशी गंगाजळीचे शुभवर्तमान दिले असतानाच, केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यातील जीएसटी संकलनाची आकडेवारी जाहीर केली आहे. जीएसटी संकलनात दहा टक्के इतकी भरघोस वाढ नोंदवली गेली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची बैठक दि. 9 सप्टेंबरला होईल, अशी अपेक्षा आहे. या बैठकीत कररचना समायोजित करण्यावर निर्णय अपेक्षित आहे. सोमवारी सकाळी भारतीय बाजारांनी उच्चांकी पातळी गाठत,आठवड्याची सुरुवात जोरदार केली. भारतीय बाजारात झालेली ही वाढ, गुंतवणुकदारांची सकारात्मक भावना, आणि बाजारातील आशावाद दर्शवणारी ठरली आहे. ’सेन्सेक्स’ आणि ’निफ्टी’ हे दोन्ही, सार्वकालिक उच्चाकांवर पोहोचले आहेत. हे बाजारातील तेजीची भावना दाखवणारे लक्षण आहे. गुंतवणुकदार सूचिबद्ध कंपन्यांच्या भविष्यातील संभावनांबद्दल आशावादी आहेत, ज्यामुळे समभागांची मागणी आणि त्यांच्या किमती वाढल्या.

प्रारंभीच्या सत्रात झालेली वाढ, बाजार वरच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दाखवून देतो. हा कल भारतीय अर्थव्यवस्था, कॉर्पोरेट कामगिरी आणि भविष्यातील वाढीच्या संभाव्यतेवरील मजबूत गुंतवणुकदारांचा विश्वास दाखवणारा आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. भारतीय कंपन्या चांगली कामगिरी करत असून, त्या नफाही कमवत आहेत. पायाभूत सुविधांचा विकास, करसवलती आणि व्यवसायात सुलभता,यांसारख्या साहाय्यक सरकारी धोरणांमुळे, गुंतवणुकदारांचा आत्मविश्वास आणि बाजारातील भावना वाढलेली आहे. धोरणसातत्य हे भारताच्या वाढीचे प्रमुख कारण असल्याचे म्हणता येईल. जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा दर, यांच्यातील फरक थक्क करणारा आहे. जागतिक पातळीवर अनिश्चितता असताना, भारत ज्या वेगाने विकास करत आहे, तो म्हणूनच विश्लेषकांना आश्चर्यचकित करणारा आहे. अमेरिकेसारखी आर्थिक महासत्ता मंदीकडे वाटचाल करत असताना, भारतीय अर्थव्यवस्था तेजीकडे जात आहे, हेच सर्व काही अधोरेखित करणारे आहे.

संजीव ओक 
Powered By Sangraha 9.0