देशात एकीकडे पवित्र श्रावण महिना संपून गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत, अशावेळी हिंदूना जागरुकतेने खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो आहे, तर दुसरीकडे बाह्यशक्तींच्या ताकदीवर कुकी निर्दयी होत आहेत,. कशाचेही सोयरसुतक नसलेले इंडी आघाडीचे नेत्यांनी बालीश वक्तव्यांची परंपरा कायम राखली आहे. वर्तमानातील घटनांचा घेतलेला हा आढावा...
हिंदू समाज, हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्म यांचा अवमान करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. असा अवमान करणार्यांचे काही व्यापार क्षेत्रात असलेले प्रस्थ लक्षात घेऊन, अशा सनातन संस्कृतीस विरोध करणार्यांच्याशी काहीही व्यवहार न करण्याचे आवाहन कर्नाटकमधील भाजपचे आमदार बसणागौडा पाटील यत्नाळ यांनी, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदू समाजास केले आहे. हिंदू संस्कृती आणि हिंदू परंपरा यांचा आदर जे राखतात, त्यांच्याशीच हिंदू जनतेने व्यवहार करावा, असे आवाहन या भाजप आमदाराने केले आहे. दुसरीकडे, श्रीरामसेनेचे नेते प्रमोद मुतालिक यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून, जनतेने हलाल उत्पादनांचा वापर न करता, आगामी गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन केले आहे.
आमदार गौडा पाटील यत्नाळ यांनी आपल्या वक्तव्याद्वारे, जे प्राचीन हिंदू धर्म मानतात, हिंदू संस्कृती, परंपरा मानतात, या संस्कृतीबद्दल ज्यांना प्रेम आहे अशा व्यापार्यांशीच विशेषतः सणासुदींच्या दिवसात व्यवहार करावा, असे म्हटले आहे. आमदार गौडा पाटील यांनी आपले हे वक्तव्य विजयपूर येथे केले. देशाची सुरक्षा आणि विकास लक्षात घेऊन, ज्या व्यापार्यांना हिंदू धर्माबद्दल आदर आहे, आणि जे देशाबद्दल प्रेम व्यक्त करतात, अशा व्यापार्यांचीच वस्तू खरेदी करताना निवड करण्यात यावी. आपल्या देशाची सुरक्षा आणि विकास; तसेच आपल्या धर्माच्या अस्तित्वासाठी आपल्या धर्माबद्दल व देशाबद्दल आदर असलेल्या प्रत्येकाने किराणा माल,धान्य, फळे, कपडेलत्ते, भाजीपाला अशा वस्तू, ज्यांना हिंदू धर्माबद्दल आदर आहे त्यांच्याकडून खरेदी करावा. जे धर्म आणि राष्ट्रविरोधी आहेत त्यांच्याकडून धार्मिक कार्यक्रमांसाठी खात्रीचा माल मिळत नाही, त्यात भेसळ असते. धार्मिक विधींसाठी उत्तम प्रतीच्या वस्तू मिळत नाहीत. त्यामुळे त्या सणांचे पावित्र्यही राखले जात नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
आमदार गौडा पाटील यत्नाळ यांनी असे आवाहन केले असतानाच, अशाच धर्तीचे आवाहन श्रीरामसेनेचे प्रमोद मुतालिक यांनी केले आहे. देशभर जो गणेशोत्सव साजरा होणार आहे तो हलालमुक्त असला पाहिजे, असे आवाहन प्रमोद मुतालिक यांनी केले आहे. बेळगावी जिल्ह्यातील हुक्केरी येथे बोलताना, जे व्यापारी गोमांस खातात, गाईंची हत्या करतात, अशांकडून काहीही खरेदी करू नका असे आवाहन प्रमोद मुतालिक यांनी केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात चित्रपट दाखविणे, आक्षेपार्ह गाणी वाजविणे, दारू पिणे, गुटका खाणे असे प्रकार घडता कामा नयेत. सणाचे पावित्र्य प्रत्येकाने जपायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे. आमदार गौडा पाटील यत्नाळ आणि प्रमोद मुतालिक यांनी जी वक्तव्ये केली, त्यामुळे सार्वजनिक जीवनामध्ये आणि व्यापारात धर्माचे महत्व नेमके काय, अशी चर्चा सुरु झाली आहे. पण या दोघांच्या पाठीराख्यांनी आपल्या नेत्यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे, आणि ते जे म्हणाले त्यात चुकीचे काहीच नसल्याचे या समर्थकांकडून सांगण्यात आले.
कुकी अतिरेक्यांकडून ड्रोनद्वारे हल्ले
मणिपूरमधील परिस्थिती अद्याप पूर्वपदावर आली नसल्याचे तेथे ज्या घटना घडत आहेत, त्यावरून दिसून येत आहे. मणिपूरमधील मैतेयी समाजाविरुद्ध कुकी अतिरेक्यांकडून हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत. आता या कुकी अतिरेक्यांनी मैतेयी समाजाविरुद्ध ड्रोनचा वापर करून, हल्ले करण्याचे प्रकार सुरु केले आहेत. ड्रोनचा वापर आंतरराष्ट्रीय संघर्षांमध्ये, आपल्या शत्रूंवर हल्ले करण्यासाठी केला जात असल्याचे आपणास परिचित आहे. पण आता हे कुकी अतिरेकी मणिपूरमधील मैतेयी समाजावर हल्ले करण्यासाठी, ड्रोनचा वापर करीत असल्याचे आढळून आले आहे. इम्फाळ पश्चिम जिल्ह्यालगतच्या भागात, कुकी अतिरेक्यांनी ड्रोनद्वारे अग्निबाणांचा वापर करून ग्रेनेड हल्ले केल्याचे उघडकीस आले आहे. कुकी अतिरेक्यांची ही कृती पाहता, त्यांनी उघड उघड भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारल्याचे दिसून येत आहे. आतापर्यत कोणत्याही अतिरेकी गटाने ड्रोनचा वापर करून लोकांवर असे हल्ले केले नव्हते. अशा हल्ल्यांना वेळीच पायबंद घातला न गेल्यास नंतर खूप उशीर झालेला असेल, असे मैतेयी सिविल सोसायटीच्या नेत्यांनी म्हटले आहे. कुकी अतिरेक्याने केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये, एक महिला ठार झाली आणि अन्य काही जखमी झाले. आता प्रश्न असा आहे की बाह्यशक्तींच्या मदतीशिवाय, असे अत्याधुनिक ड्रोन कुकी अतिरेक्यांना मिळणे शक्य नाही. त्यामुळे हे लक्षात घेऊन, अशा भारतविरोधी बाह्यशक्तींच्या विरुद्ध कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. बाह्यशक्तींच्या जीवावरच कुकी अतिरेकी, मैतेयी समाजास लक्ष्य करीत आहेत. कुकी अतिरेक्यांचा बंदोबस्त करण्यासाठी, शासनाने पावले उचलली असली तरी, ती पर्याप्त नसल्याचे अशा घटनांवरून दिसून येत आहे.
तेजस्वी यादवकडून हिमंत सरमा यांचा अपमान
विरोधकांच्या ‘इंडी’ आघाडीकडून आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचा अवमान करण्याची घटना घडली आहे. या आधी ‘इंडी’ आघाडीचे सॅम पित्रोडा यांनी अशीच आक्षेपार्ह टीका केली होती. आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. आसामचे मुख्यमंत्री म्हणजे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची चिनी आवृत्ती आहे, अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली आहे. मुस्लीम आमदारांसाठी नमाजाकरिता 1937 सालापासून जी दोन तास सुट्टी मिळत असे ती रद्द केल्याचे निमित्त साधून, तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री हिमंत सरमा यांना लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्री सरमा हे सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी असे निर्णय घेत असल्यची टीका, तेजस्वी यादव यांनी केली आहे. मात्र मुख्यमंत्री सरमा यांच्यावर जी अवमानकारक टीका तेजस्वी यादव यांनी केली, त्यास मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी उत्तर दिले आहे. ‘इंडी’ आघाडीतील नेत्यांना भूगोल, इतिहास यांचे, तसेच आपल्या देशाचेही ज्ञान नाही,त्या आघाडीत सगळे अशिक्षित भरले आहेत, अशी टीका एन. बिरेन सिंह यांनी केली आहे. आसामचे मुख्यमंत्री ईशान्य भारतातील आहेत, म्हणून त्यांचा ‘चायनीज’ असा उल्लेख करणे अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही अन्य भारतीयांप्रमाणे भारतीयच आहोत, आणि ते सिद्ध करण्याची आवश्यकता नाही असे मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी तेजस्वी यादव सुनवले. ‘इंडी’ आघाडीचे नेते किती खालच्या पातळीवर जाऊन आपल्या विरोधकांवर टीका करतात, हे या एका उदाहरणावरून दिसून येते.
जगन्नाथ मंदिर एफएम सेवा सुरु करणार
जगन्नाथ पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ मंदिराचे व्यवस्थापन, आपली स्वत:ची एफ एम रेडीओ सेवा लवकरच सुरु करणार आहे. तसेच मंदिराच्या व्यवस्थापन समितीने 2024 - 2025 या आर्थिक वर्षासाठी 410 कोटीरुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे. भाविकांना विविध प्रकारच्या चांगल्या सुविधा देण्याची तरतूद, या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. जगन्नाथ मंदिरात जे रत्न भांडार आहे त्या भांडाराचे दरवाजे, सोन्याच्या पत्र्यांनी मढविण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला आहे. पुरातत्व विभागाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर, रत्न भांडाराचे काम हाती घेण्यात येईल असे व्यवस्थापन समितीकडून सांगण्यात आले.
9869020732