"लोकसभेला एकनाथ खडसेंशिवाय काही अडले असल्याचे दिसलेच नाही"
02 Sep 2024 16:32:20
मुंबई : एकनाथ खडसे यांनी केलेल्या विधानावर भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. खडसेंशिवाय लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. जळगाव रावेरच्या रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांच्या दोन्ही जागा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी, गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने निवडून आणल्या. खडसे यांच्याशिवाय काही अडले आहे असे लोकसभेला दिसलेच नाही, असा टोला दरेकरांनी खडसे यांना लगावला.
पत्रकारांशी बोलताना दरेकरांनी राज्यातील विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले की, जळगावात पक्षाचे संघटन चांगले आहे. असे असताना पुन्हा एकदा वातावरण गढूळ होऊ नये अशी भावना तिथल्या कार्यकर्त्यांची आहे. कदाचित त्यामुळे खडसेंच्या पक्षांतराला उशीर होत असेल म्हणून आता राष्ट्रवादीचा पुन्हा झेंडा खांद्यावर घ्यायचा. स्वतःच्या आचार विचारापेक्षा माझे राजकीय अस्तित्व हेच त्यांना महत्वाचे वाटते हे दुर्दैवी आहे. जनतेशी किंवा पक्षाशी त्यांना बांधिलकी आहे असे त्यांच्या कृतीतून वाटत नाही.
वनराज आंदेकर यांच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानावर दरेकर म्हणाले कि, प्रॉपर्टीच्या वादातून ही घटना झाल्याचे समोर येत आहे. सुप्रिया सुळे या विरोधी पक्षनेत्या आहेत. त्यामुळे अशी दुर्घटना घडली कि त्याचे खापर सरकारवर, गृहमंत्र्यांवर फोडायचे. विकासाच्या बाबतीत जनतेच्या प्रश्नांबाबत त्यांचा कुठलाही सहभाग नाही. त्यांच्या डोक्यात २४ तास केवळ राजकारण शिरले असून, त्यामुळे कुठलीही दुर्घटना घडली कि त्याचा थेट संबंध देवेंद्र फडणवीसांशी जोडायचा अशा प्रकारचे नीच राजकारण दुर्दैवाने सुरू आहे. त्याचाच कित्ता सुप्रिया सुळे गिरवताना दिसत असल्याचा टोला त्यांना लगावला.
संजय राऊत यांच्या विधानावर बोलताना दरेकर म्हणाले की, औरंगजेब फॅन क्लब संदर्भात अमित शहा यांनी वक्तव्य केले आहे की यांची कृती आणि उक्ती यात फरक आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार सोडलाय. जे हिंदुत्व द्वेष्टे आहेत त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेसाठी बसलेत. त्यामुळे ह्यांचे विचार असे झालेत हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेच आहे. संजय राऊत यांच्या तोंडाला लगाम नाही. ते राजकारणातील कुठली औलाद आहे तेच कळत नाही. विकृत बोलायचे, काहीही बोलायचे आणि प्रसिद्धी माध्यमांत सणसनाटी करून द्यायचे. राजकीय संस्कृतीला काळिमा फासला जातोय याचे साधे भान राऊत यांच्या सारख्या विकृत मनोवृत्तीच्या नेत्याला समजत नाही.
अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागलेल्या पोस्टर्सवर दरेकरांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, महायुतीतील प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. तथापी महायुतीची भुमिका स्पष्ट आहे मुख्यमंत्री महायुतीचा होईल. कुठल्याही पक्षाचा महायुती म्हणून मुख्यमंत्री घोषित झालेला नाही. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला, नेत्याला आपल्या नेत्याने मुख्यमंत्री व्हावे असे वाटते त्यातून वक्तव्य येतात आणि अशाप्रकारचे पोस्टर्स लागत असतात.
जागा वाटपावर दरेकर म्हणाले कि, जागा वाटपाचा निकष हा मेरिटनुसार ज्याला जिंकण्याची जास्त शक्यता आहे, ज्या उमेदवाराच्या बाजूने जनाधार आहे आणि कार्यकर्त्यांना ज्यांची संमती आहे अशा प्रकारे तीन, चार प्रमुख निकषावर जनतेचे मत हाच उमेदवारी देण्यावर आमचा ठाम भर, निकष असेल.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर टिकास्त्र सोडताना दरेकर म्हणाले कि, जितेंद्र आव्हाड यांनी पहिले स्वतःची सुरत तपासून घ्यावी. कुठलाही विषय आला कि विद्रुप अंगविक्षप करायचे आणि इतिहासाची संदर्भ आपल्या सोयीने द्यायचे. हा एक विकृत मानसिकतेतील नेता जितेंद्र आव्हाड महाराष्ट्राने पाहिला आहे. वड्याचे तेल वांग्यावर काढायचे हे त्यांना नीट जमते. परंतु त्यांचे वक्तव्य कुणी गांभीर्याने घेत नाही. त्याच्या मागे द्वेषाचा दर्प, मत्सर असतो.
जरांगेंना देवेंद्र द्वेषाची कावीळ
दरेकर म्हणाले की, जरांगेंचे रंग वेगवेगळ्या वेळेला बदलताना सुरुवातीच्या आंदोलनापासून दिसत आहेत. पहिली भूमिका कुणबी नोंदीबाबत घेतली. नोंदी मोठ्या प्रमाणावर झाल्यावर सगेसोयऱ्यांची भूमिका घेतली. सगेसोयरे कायद्यात बसत नाहीत हे सांगूनही अट्टाहास केला. त्याचे नोटिफिकेशन काढले. लाभपेक्षा त्यांना त्यांचे राजकारण, नेतृत्व मोठे वाटत होते. प्रसिद्धीच्या झोतात ते गुदमरलेत. त्यामुळे राज्यव्यापी त्यांनी विचार घेतला. आता तर मराठा आरक्षणावर ते बोलतच नाहीत.
जरांगेंनी मराठा समाजाच्या प्रश्नांची काळजी करावी. भाजपात कोण नाराज आहे, फडणवीसांवर कोण काय बोलतेय त्यासाठी आम्ही समर्थ आहोत. महाराष्ट्रातील कार्यकर्ते, सर्व आमदारयांचा एकमुखी विश्वास देवेंद्र फडणवीसांवर आहे. तुम्ही विचलित होऊ नका. देवेंद्र द्वेषाची कावीळ तुम्हाला रोज मोठ्या प्रमाणावर होते आहे त्यातून ते अशी गरळ ओकत आहेत.