आयुर्वेदातील कृमि विचार

02 Sep 2024 22:12:35
ayurveda bacteria stomach infection


कृमि म्हणजे जंत असे सामान्यपणे आपल्याला माहीत असते. लहान मुलांमध्ये जंत होतात. पोट दुखणे, वजन न वाढणे, मळमळणे, पोट फुगणे, शौचावाटे जंत पडणे, चेहर्‍यावर पांढरे डाग-चट्टे (hypo-pigmentation patches), भूक मंदावणे किंवा अति भूक लागणे इ.लक्षणे (यांतील काही किंवा सगळीच लक्षणे, कमी तीव्रतेची अथवा अति तीव्रतेची) असल्यास जंताचे औषध दिले जाते. रात्री एक गोळी वा द्रव औषध पाजून झाले की काम संपले. पण, कृमिचा आवाका इथेच संपत नाही. कृमि प्रौढांमध्येही होऊ शकतात. पावसाळ्यात याचे प्रमाण अधिक असते. कृमि वारंवार होण्याची काहींना सवय होते. आयुर्वेदामध्ये कृमिची सविस्तर माहिती सांगितली आहे. त्याबद्दल आजच्या लेखातून जाणून घेऊया.

शरीरात कृमिंचा प्रवेश होतो, मग त्यांची वाढ होते आणि नंतर विविध आजार उत्पन्न होतात. या कृमिंचा शरीरात प्रवेश विविध मार्गांनी होतो. दूषित माती (जमिनीतून) दूषित जल, दूषित अन्न आणि शारीरिक संबंधामुळे तसेच जे रोगग्रस्त आहेत, त्यांच्या (पशु-प्राणी-पक्षी व मनुष्य) प्रत्यक्ष संपर्कात आल्यास (transmission through physical contact) आणि रोगग्रस्त व्यक्तींच्या निश्वासाशी संपर्क आल्यास (जे प्रसरणशील स्वभावाचे रोग आहेत, म्हणजेच contagious) अशा वेळेस विविध प्रकारच्या व्याधि उद्भवतात.

कृमिचे मुख्यत्वे करुन दोन प्रकार आहेत. बाह्य आणि आभ्यंतर. बाह्य कृमिंना आयुर्वेदात युका-लिसा व पिपलीळा अशी नावे आहेत. शरीराच्या बाह्यांगावर यांची उपस्थिती असते. शौच-शुद्धि, सुचिता (hygiene) नीट न पाळल्याने (unhygienic and dirty habits) याचा प्रादुर्भाव होतो. तसेच अशा व्यक्तींच्या सान्निध्यात आल्यावरही याचा प्रसार होतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, उवा-लिखा. शाळकरी मुलींमध्ये याच पद्धतीने लागण होताना अधिक दिसते. शेजारी बसलेल्या मैत्रिणीच्या डोक्यातील उवा-लिखा बाजूला, पुढे, मागे बसणार्‍या विद्यार्थ्यांच्या डोक्यातही पसरतात. केस जाड असणे, घाम खूप येणे, डोक्यावरुन अंघोळ अनियमितपणे करणे (आठवड्यातून किमान दोनदा तरी केस स्वच्छ धुवावे), रोज केस विंचरणे, कंगवा व इतर केशश्रृंगाराची साधने प्रत्येकाची वेगवेगळी असावी, ओले केस बांधू नये, केसांमध्ये, डोक्यात खाज येत असल्यास वेळीच तपासून त्यावर उपाय करावे. खूप मोठे केस, दाट केस, कुरळे केस असल्यास उवा-लिखा लवकर होऊ शकतात आणि वारंवार होण्याची शक्यताही अधिक असते.

उवा-लिखा होऊ नये, म्हणून शरीराची विशेषतः डोक्याची व केसांची स्वच्छता राखावी. ज्यांचे केस चिकट आहेत किंवा घामाचा दुर्गंध येतो, अशा केसांमध्ये उवा-लिखा होण्याची शक्यता अधिक आहे. केसांची निगा घेणे शक्य नसल्यास मोठे केस वाढवू नये. उवा-लिखा फक्त डोक्याच्या केसांमध्येच होतात असे नाही, तर गुह्यांगाच्या केसांमध्ये, काखेतही होऊ शकतात. डोक्यातील उवा-लिखांमुळे डोक्यात पुरळ व चेहर्‍यावर बारीक पुरळ, त्वचा कोरडी आणि कानाच्या तक्रारीदेखील उत्पन्न होऊ शकतात. निम तेल, कापराचे पाणी, करंज तेल इ.चा फायदा होतो. बाधित व्यक्तीच्या कपड्यांवर उवा-लिखा असल्यास ते कपडे इतरांनी परिधान केले, तर त्यांच्यातही उवा-लिखांचा त्रास उत्पन्न होऊ शकतो.

बाह्य कृमिंप्रमाणेच अजून एका प्रकारच्या कृमिचे विस्तृत वर्णन आहे - आभ्यंतर कृमि. हे शरीरात आतील अवयवांमध्ये उत्पन्न होतात व तशी लक्षणे उत्पन्न करतात. दूषित अन्न, जल, माती जमीन व हवा यांमुळे आभ्यंतर कृमिंचेदेखील त्रास उत्पन्न होतात. आभ्यंतर कृमि मुख्यत्वेकरुन तीन प्रकारचे आहेत. पुरीषज कृमि, कफज कृमि आणि रक्तज कृमि. प्रत्येक प्रकारचे अजून बरेच उपप्रकार होतात. या आभ्यंतर कृमिंमुळे मुख्यत्वेकरुन पचनसंस्थेवर (gastrointestinal eliments) त्वचेवर परिणाम होतो. तसेच Anaemia (रक्ताची कमतरता)देखील उत्पन्न होते.

कफज कृमि पोटात (आमाशयात) उत्पन्न होतात आणि शरीरात सर्वत्र पसरतात. आभ्यंतर कृमि होण्याची काही कारणे आयुर्वेदात विशेषत्वाने सांगितली आहेत. जसे की अजीर्ण भोजन. म्हणजे, जेव्हा पचनशक्ती बिघडलेली असते, आधी सेवन केलेले अन्न पचलेले नसल्याने ते पोटात कुजते, करपट ढेकरा येतात. पोटात दुखते इ. असे असतेवेळी, अजीर्ण असताना पु्न्हा जेवणे-असे वरचेवर केल्यास आभ्यंतर कृमि उत्पन्न होतात. अजीर्ण असतेवेळी मळमळ, उलट्या-जुलाबही होतात. आहारात अधिक प्रमाणात गोड आणि आंबट चवीचे पदार्थ खाणे, हे आभ्यंतर कृमि होण्याचे आणखी एक कारण आहे. लहान मुलांमध्ये चॉकलेट्स, गोळ्या, सॉस इ.चे प्रमाण अधिक असल्याने त्यांच्यात आभ्यंतर कृमि वारंवार होताना दिसतात. अति द्रव पदार्थांचे सेवन, विशेषतः थंड पेय, गोड पेयांचा मारा हेदेखील अजून एक कारण आयुर्वेदशास्त्राने सांगितले आहे. गुळाचा अधिक वापर किंवा गुळ घालून केलेल्या पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन केल्यानेदेखील आभ्यंतर कृमि होतात. आयुर्वेदामध्ये आहारशास्त्र खूप विस्तृत पद्धतीने सांगितले आहे.

आहाराचा योग्य वापर-सेवन केल्यास आहारातूनच रोगाला आटोक्यात आणणे शक्य होते. उदा. घसा दुखत असल्यास मध-हळद चाटण किंवा गरम पाण्यात हळद, मीठ घालून त्याच्या गुळण्या, अजीर्ण असल्यास आले-लिंबू पाचकाचे सेवन इ. म्हणजे आहार नीट असल्यास रोग होऊ नयेत, असे प्रतिबंधात्मक (Preventive) परिणामही बघायला मिळतो. शास्त्रशुद्ध पद्धतीचा आहार सेवन न केल्यास आहारच रोगाचे कारण ठरतो आणि आहार (पथ्यपालन) जर नीट केले, तर रोगनिवारणही लवकर होते. म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर, आरोग्य व व्याधी हे दोन्ही आहारावर अवलंबून आहेत. (अंशिक प्रमाणात) विरुद्ध भोजन केल्याने आभ्यंतर कृमि होण्याचे प्रमाण वाढते. विरुद्ध भोजनाची बरीच उदाहरणे आयुर्वेदाने दिली आहेत. काही कॉम्बिनेशन्स विरुद्ध असतात. जसे दूध आणि मीठ - याला ‘संयोग विरुद्ध’ म्हणतात. काही व्यंजने बनविणार्‍या पद्घती चुकीच्या असू शकतात.

जसे, दही आणि गरम अन्न किंवा अन्न शिजवताना मध घालणे इ. अशा बर्‍याच विरुद्ध कॉम्बिनेशन्सचा, प्रक्रियांचा आयुर्वेदात संदर्भ आहे. (पुढील लेखात ते विस्तृत बघूया) विरुद्ध भोजनात या सर्वांचा समावेश होतो. अशास चुकीच्या आहार सेवनामुळे आभ्यंतर कृमि होतात. याचबरोबर दिवसा झोपणे हेदेखील आभ्यंतर कृमिंचे एक कारण सांगितले आहे. जेवल्यावर लगेच आडवे पडू नये. दुपारची झोप याला ‘वामकुक्षी’ असा शास्त्रीय शब्द आहे. ही वामकुक्षी डाव्या कुशीवर 15 मिनिटे पडणे, याला म्हटले जाते. यामुळे खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते. (कारण उदर वाम म्हणजे डाव्या बाजूस स्थित असते) पण वामकुक्षीदेखील जेवल्याजेवल्या लगेच करू नये. जेवणामध्ये आणि वामकुक्षीमध्ये दीड ते दोन तासांचे अंतर असावे. 15 मिनिटांपेक्षा अधिक झोपल्याने शरीरात आमनिर्मिती होते, क्लेदाचे प्रमाण वाढते. या कारणांमुळे कृमि उत्पन्न होण्याची शक्यता वाढते. तसेच उन्हाळ्यात केवळ दुपारी झोपावे, असे ही आयुर्वेद सांगते.

या कारणांइतकेच आणखी एक कारण कृमिंसाठी पूरक ठरते. ते म्हणजे, व्यायामाचा अभाव. शारीरिक हालचालीमुळे क्लेदाचे पचन होते. हे नियमित होणे गरजेचे आहे. क्लेदसंचितीने शरीरात कफ व मेद वाढतो आणि विविध आजारांना उत्पन्न करतो. लहान मुलांमध्येही मैदानी खेळ आणि शारीरिक कष्ट हळूहळू कमी होत चालले आहेत.
(क्रमशः)
Powered By Sangraha 9.0