आला फुलपाखरांचा महिना !

02 Sep 2024 12:10:21
   big butterfly month
                                                                                                                                                  (छाया - मंगल राणे)



भारतात दरवर्षी सप्टेंबर महिना हा ‘बिग बटरफ्लाय मंथ’ (big butterfly month) म्हणजेच फुलपाखरांचा महिना म्हणून साजरा केला जातो. देशातील सर्व फुलपाखरूप्रेमी या महिन्यात फुलपाखरांची निरीक्षणे करतात (big butterfly month). फुलपाखरांबद्दलची माहिती मिळवणे आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन करणे हा त्यामागचा प्रमुख हेतू आहे. या उपक्रमांमध्ये सर्वांना कसे सहभागी होता येईल, तसेच नागरिक म्हणून फुलपाखरांच्या संवर्धनासाठी आपल्याला काय करता येईल, याबद्दलची माहिती जाणून घेऊया या लेखातून. (big butterfly month)
 
 
 
फुलांवर भिरभिरणारी फुलपाखरे हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. पावसाळ्यानंतरच्या कोवळ्या उन्हात मनमुक्त विहरणारी फुलपाखरे आपल्या परिसराची एकंदर गुणवत्ता उत्तम असल्याचे दर्शवितात. सौंदर्यात्मक मूल्याव्यतिरिक्त फुलपाखरे ही फुलांच्या परागीकरणातही महत्त्वाची भूमिका बजावतात. पर्यावरणातील लहानसहान बदलांचा दूरगामी परिणाम फुलपाखरांवर लगेच दिसून येतो. याच कारणामुळे आपल्या परिसरातील फुलपाखरांची एकूण संख्या आणि त्यांच्यातील जातीनिहाय विविधता हे परिसंस्थेच्या मूल्यमापनाचे सूचक ठरतात. निसर्गामध्ये, फुलपाखरे परिसंस्थेच्या केंद्रस्थानी असतात आणि त्यामध्ये परागकणांचे वाहक, ग्राहक आणि भक्षकांसाठी अन्नस्रोत अशा तिन्ही पातळ्यांवर महत्त्वाची भूमिका बजावतात. फुलांतील मधुरस पिण्यासाठी फुलपाखरे एका फुलावरून दुसर्‍या फुलावर सतत उडत असतात. असे करत असताना, त्यांच्या शरीराला चिकटलेले परागकण हस्तांतरित करतात, फुलांच्या पर-परागीकरणास मदत करतात. फुलपाखरांच्या अळ्या त्यांच्या भक्ष्य वनस्पतींची पाने खाताना, पानांतील जटिल अन्नघटकांचे विघटन करतात. अन्नपचनानंतर, ही पोषक द्रव्ये उत्सर्जनाद्वारे पुन्हा जमिनीत सोडली जातात. मुंग्या, गांधीलमाश्या, कोळी, चतुर आणि पक्षी यांसारख्या परभक्षी शिकार्‍यांसाठी, फुलपाखरे हा अन्नाचा प्रमुख अन्न स्रोत असतात. फुलपाखरांना झालेली हानी ही कालांतराने परिसंस्थेसाठी ही तितकीच हानिकारक असते आणि त्ङ्मामुळे तिचे संवर्धन आवश्यक ठरते.
 
 
 
प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे शहरांमधील फुलपाखरांच्या लोकसंख्येला धोका निर्माण होत आहे, अशावेळी आपल्यापुढे हा प्रश्न उदभवतो, की ङ्मा संवर्धनामध्ये एक सुजाण नागरिक म्हणून आपण काय करू शकतो? मुख्यत: फुलपाखरू संवर्धनामध्ये नागरिकांना तीन पातळ्यांवर सहभागी होता येते; १) फुलपाखरांचे निरीक्षण, २) प्रजातींची नोंदणी आणि ३) त्यांच्या अधिवासांचे संरक्षण. फुलपाखरांचे निरीक्षण करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला तरी व्यावसायिक फोटोग्राफीच्या उपकरणांची गरज नाही, एखादा साधा कॅमेरा किंवा अगदी सर्वांकडे असणारा स्मार्टफोनही पुरेसा आहे आणि त्याच्या जोडीला हातातली नोंदवहीसुद्धा पुरेशी आहे.
 
 
 
 
तुमच्या घरामागच्या अंगणात किंवा जवळच्या एखाद्या बागेला भेट देऊन तुम्ही निरीक्षणांची सुरुवात करू शकता. फुलपाखरांची निरीक्षणे करताना जवळच्या नोंदवहीत तुम्हाला दिसणार्‍ङ्मा प्रजातींची नावे तसेच वर्तनातील तपशील जरूर नमूद करा. फुलपाखरे उबदार हवामानाला प्राधान्य देतात आणि सकाळी 10च्या सुमारास सूर्य वर येताच, आपल्या अन्न स्रोतांभोवती (जसे की फुले आणि पराग) गोळा होतात. फुलपाखरांच्या काही प्रजाती त्यांच्या पोषणासाठी पर्यायी अन्नस्रोत जसे की पिकून रापलेली फळे, झाडाची साल, चिखल आणि उत्सर्जित घटक यांना पसंती देतात. अशा प्रजाती तुम्हाला फुलांच्या बागेपेक्षा स्थानिक भाजी मंडईत किंवा जंगलात ओढ्याच्या किनारी सहज सापडतील. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, तुमच्या आजूबाजूच्या शहरी भागातही तुम्हाला अनेक प्रकारची फुलपाखरे आढळतील.
 
 
अधिकाधिक निरीक्षणे जमा केल्यानंतर, पुढील पायरी म्हणजे तुमचे निष्कर्ष नोंदणीकृत करणे. फुलपाखराची ओळख आणि नोंदींसाठी इंटरनेटवर अनेक प्रकारची माहितीस्थळे मोफत उपलब्ध आहेत. फुलपाखरांवरील मार्गदर्शनपर पुस्तके ही माहिती सचित्र स्वरूपात उपलब्ध करून देतात. भारतातील फुलपाखरांना समर्पित ‘ळर्षेीपवर्लीीींंशीषश्रळशी’ या डेटाबेसमध्ये फुलपाखरांची चित्रे, त्यांच्या जीवनचक्रातील अवस्था, नमुना छायाचित्रे आणि फुलपाखरांच्या आवडीच्या वनस्पतींची यादी यासारखी वैज्ञानिक माहिती असते. सोशल मीडिया समुदायांवरही देशविदेशातील उत्साही फुलपाखरू तज्ञमंडळी आपल्याशी संवाद साधण्यास उत्सुक असतात. फुलपाखरांच्या मोजणीसाठी यंदा ‘बिग बटरफ्लाय मंथ’ या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याकडे एका सोप्या अ‍ॅपचीही निर्मिती करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी आणि अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी ‘बिग बटरफ्लाय मंथ’ च्या वेबसाईटला भेट द्या (https://bigbutterflymonth.in/).
 
 
एकदा का आपल्या क्षेत्रातील सर्व फुलपाखरांच्या संख्येची नोंदणी झाली की, पुढची पायरी म्हणजे त्यांची संख्या नैसर्गिकरित्या अबाधित राखणे. काही फुलपाखरांच्या प्रजाती आपल्या प्रभागातील स्थानिक रहिवासी असतात आणि वर्षभर आपल्या परिसरात राहतात, तर काही फक्त स्थलांतराच्या कालावधीत आपल्या भागात निवास-प्रस्थान करतात. फुलपाखरांसाठी अधिवास विकसित करताना स्थलांतराची ही प्रक्रिया समजून घेणे आणि त्यानुसार लागवड करणे आवश्यक आहे. फुलपाखरांमध्ये त्यांच्या निवासी क्षेत्रातील खाद्य आणि मधुरस वनस्पतींमध्ये कमालीची चोखंदळ वृत्ती आढळते, आणि ती भौगोलिक परिस्थितीनुसार बदलते. मूळ वनस्पतीचे वाण आणि स्थानिक कीटकांची विविधता संतुलीत ठेवणे महत्त्वाचे ठरते. लक्षात ठेवा, या उपक्रमाचा उद्देश केवळ फुलपाखरे वाढवणे किंवा त्यांचे प्रजनन करणे हा नसून संपूर्ण पर्यावरणीय अन्नसाखळी अबाधित ठेवणे हा आहे. अनेक रहिवासी एकत्रितपणे गावात एक सामुदायिक फुलपाखरू उद्यानही तयार करू शकतील जे त्यांच्या शहरातील फुलपाखरे आणि इतर उपयोगी कीटकांसाठी संरक्षित अधिवास म्हणून काम करेल. फुलपाखरांच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांद्वारे योगदान देऊन आपण हे सुनिश्चित करू शकतो की फुलपाखरे आपल्या परिसरांत सुखरूप राहतील आणि भावी पिढयांनाही निसर्गाचे हे सौंदर्य अनुभवता येईल. चला तर मग फुलपाखरांना उंच उडत राहण्यासाठी स्फुर्ती देऊया, घेऊया भरारी, एकत्र!!

देशभरातील उपक्रम आणि स्थानिक समनव्यकांच्या (Local event co-coordinators) संपर्कासाठी वेबसाईट लिंक https://bigbutterflymonth.in/calendar

- गौरव सोमण

 

(लेखक ‘बिग बटरफ्लाय मंथ’च्या मुंबई-ठाणे जिल्हयाचे समनव्यक आहेत)
Powered By Sangraha 9.0