ज्येष्ठ पत्रकार उमेश उपाध्याय यांचे निधन

02 Sep 2024 12:57:04

Umesh Upadhyay

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Umesh Upadhyay Passed Away)
प्रसारमाध्यम जगतातील एक नावाजलेले नाव ज्येष्ठ पत्रकार उमेश उपाध्याय (६६) यांचे रविवार, दि. १ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या घरात काही बांधकाम सुरु होते. त्यादरम्यान काम करत असताना ते अचानक पडले आणि गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता जगतात शोककळा पसरली आहे. सोमवार, दि. २ ऑगस्ट रोजी निगम बोध घाट, दिल्ली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे वाचलंत का? : भारतीय मिडियाला परकीय षड्यंत्रांच्या कथनातून बाहेर पडावे लागेल : उमेश उपाध्याय

टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडियामध्ये त्यांनी आपल्या कामातून अमिट छाप सोडली. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी विविध माध्यम संस्थांमध्ये अनेक प्रमुख पदे भूषवली आहेत. प्रिंट, रेडिओ, टीव्ही आणि डिजिटल मीडियामध्ये त्यांची कारकीर्द चमकदार होती. मथुरा येथे जन्मलेल्या उमेशजींनी १९८० मध्ये पत्रकारितेतून कारकिर्दीला सुरुवात केली आणि अल्पावधीतच त्यांनी या क्षेत्रात नाव कमावले. ते देशातील प्रसिद्ध पत्रकारांपैकी एक होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. 

उमेश उपाध्याय यांचे आकस्मिक निधन ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. प्रचार प्रमुखाचे दायित्व सांभाळल्यानंतर उमेशजी सहज भेटायला आले होते. तोपर्यंत प्रचार विभाग हा केवळ प्रिंट मीडियापुरता मर्यादित होता. त्यांची भेट घेतल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे महत्त्व ध्यानात आले आणि त्याचा प्रचार विभागात समावेश करण्यात आला. देशात सर्वत्र इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रशिक्षण देण्याकरीता उमेशजी कायम सोबत असत. मग रेडिओ, लघुपट, स्तंभलेखक असे सर्व आयाम सुरू झाले, उमेशजी त्यातही सोबत होते. ते उत्तम लेखक, विचारवंत आणि प्रयोगशील व्यक्ती होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने एक विश्वासू सहकारी आणि जवळचा मित्र गमावल्याने मला दु:ख झाले आहे. देव दिवंगत आत्म्याला शांती देवो आणि कुटुंबीयांना हे दुःखद दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच नम्र प्रार्थना.
- डॉ. मनमोहन वैद्य, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

डिजिटल मीडिया ते टेलिव्हिजन या क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक उमेश उपाध्याय यांच्या निधनाने खूप दुःख झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता जगताची कधीही भरून न येणारी हानी आहे. या दु:खाच्या प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. ओम शांती!
- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Powered By Sangraha 9.0