राज्यभर मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन

02 Sep 2024 11:48:19

devendra fadanvis


मुंबई, दि.२ :
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वैद्यकीय मदत कक्षाच्या समन्वयातून राज्यभर मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यभरात आयोजित २५ हजार शिबिराच्या माध्यमातून सुमारे ४० लाख नागरीकांच्या तपासण्या करण्याचे ध्येय या शिबिरांच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहे.गावातील वस्त्या, आदिवासी पाडे, झोपडपट्टया, आर्थिक दुर्बल घटक अशा आरोग्य सेवेपासून वंचित असलेल्या भागात होणार शिबिरांचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती कक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.

उप मुख्यमंत्री कार्यालया अंतर्गत कार्यरत राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष, वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, निरामय सेवा फाऊंडेशन, धर्मादाय रुग्णालये यांच्या सहयोगातून सदर आरोग्य शिबरे राबविण्यात येणार आहे. राज्यातील सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या भागांत वैद्यकीय सेवेपासून वंचित असलेल्या भागातील लोकांपर्यत आरोग्य सेवा पोहचविण्याकरीता उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर लोकसहभागातून सामुदायिक आरोग्य शिबिरे राबविण्यात येणार असून रामेश्वर नाईक हे या शिबिर आयोजन कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक आहेत.

या सामाजिक आरोग्य शिबिरामध्ये विविध धर्मादाय संस्था, मेडीकल असोसिएशन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व त्यांच्याशी संल्लग्नीत खाजगी वैद्यकीय महाविद्यालये व विद्यार्थी, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत नोंदणीकृत रुग्णालये, समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी, लोकप्रतीनिधी यांचा सहभाग असणार आहे. या सामाजिक आरोग्य शिबिरांचे दि.०१ सप्टेंबर रोजी प्रायोगीक तत्वावर घाटकोपर येथे उद्घाटन झाले. याचदिवशी जळगाव, चंद्रपूर जिल्हा व राज्याच्या इतर भागातही शिबिराचे आज आयोजन करण्यात आले होते. त्यास नागरीकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून हजारो नागरिकांनी मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आहे.


आजपासून राज्यभरात शिबिरे राबविण्यात येणार असून या तपासण्यांमध्ये रोगाचे निदान झाल्यास आवश्यकतेनूसार शस्त्रक्रीया किंवा पुढील उपचार शासनाच्या विविध आरोग्य विषयक योजना जसे की, धर्मादाय रुग्ण योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, यांच्या माध्यामातून मोफत उपचार करण्याबाबत समन्वय साधन्यात येणार आहे. या शिबिरामध्ये सुमारे १५०० रुग्णालयांचा समावेश असणार आहे. शिबिराच्या आयोजनाची माहिती १-२ दिवस आधीच आशा समाजसेविका, समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवक यांच्या मार्फत त्या भागातील लोकांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे.


शिबिरामध्ये खालील बाबींचा समावेश 

• नागरीकांचे स्क्रिनींग 
• रक्त तपासण्या (५९ प्रकारच्या रक्त चाचण्या)
• ई.सी.जी तपासण्या 
• आयुष्मान भारत योजना कार्डचे वाटप (आभा कार्ड)
• आवश्यक औषधांचे वाटप 
• शासनाच्या आरोग्य विषयक विविध योजनांची माहिती देणे.


शिबिरांचे स्वरुप 

•कालावधी : दि.०१ सप्टेंबर ते दि.३१ ऑक्टोबर
•वेळ : सकाळी ८.३० ते दुपारी १२.३०
• ठिकाण : जवळील शाळा, समाजमंदिर, मंदिरे, सार्वजनिक ठिकाण
Powered By Sangraha 9.0