मुंबई : तुमची प्रत्येक कृती संशयास्पद आहे. मराठ्यांच्या आरक्षणातही तुम्ही राजकारण करत आहातस, असा घणाघात खासदार नारायण राणेंनी केला आहे. शरद पवार जातीजातीत तेढ निर्माण करत आहेत, असेही ते म्हणाले. त्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
नारायण राणे म्हणाले की, "शरद पवार या वयातही महाराष्ट्रात सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नशील नाहीत. ते आजही लावालावी करत आहेत. जातीजातीत तेढ निर्माण करत आहेत. चारवेळा मुख्यमंत्री असताना, केंद्रात मंत्री असताना त्यांनी आरक्षणाची टक्केवारी वाढवली नाही आणि आता मागणी करत आहेत. तुम्ही लोकांची मनं पेटवता. तुमची प्रत्येक कृती संशयास्पद आहे. मराठ्यांच्या आरक्षणातही तुम्ही राजकारण करत आहात. वय वर्ष ८३ पर्यंत तुम्ही स्वत:च्या जातीला न्याय देऊ शकला नाहीत."
हे वाचलंत का? - मुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरला खराब हवामानाचा फटका!
"छत्रपतींचा महाराष्ट्र लोककल्याणकारी बनावा हे पवारांच्या ध्यानीमनी असायला हवं. वाद नको, आपण बसूया, असं त्यांनी म्हणायला हवं. पण पेट्रोल टाकून फिरायचं आणि काडी घेऊन फिरायचं, त्यांना महाराष्ट्रात स्थान नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण करताना काहीच वाटत नाही का?" असा संतप्त सवालही राणेंनी शरद पवारांना केला आहे.