मुंबई (अक्षय मांडवकर) - पुणे जिल्ह्यातील लोणावळास्थित भुशी धरण परिसरातून १९१८ साली शोधण्यात आलेली ‘लिम्नोफिला लिम्नोफिलॉइड्स’ ही पाणवनस्पतीची प्रजात नामशेष झाली आहे (Limnophila limnophiloides plant species endemic to bhushi dam). ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर’ने (आययूसीएन) या संदर्भातील घोषणा केली आहे. ‘आययूसीएन’ने आपल्या ‘लाल यादी’त या प्रजातीला ‘नामशेष’ म्हणून नमूद केले आहे. या प्रजातीच्या शोधानंतर गेल्या कित्येक वर्षांत या प्रजातीचा मागमूस न लागल्याने आणि भुशी धरण क्षेत्रात झालेल्या पर्यटनवाढीमुळे जगात केवळ या परिसरात सापडणारी ही वनस्पती नामशेष झाली आहे. (Limnophila limnophiloides plant species endemic to bhushi dam)
‘लिम्नोफिला’ हे कुळ पाणथळ क्षेत्रात वाढणार्या पाणवनस्पतींचे आहे. याच कुळातील ‘लिम्नोफिला लिम्नोफिलॉइड्स’ या वनस्पतीचा शोध ब्लाटर आणि हॉलबर्ग या ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञांनी ऑक्टोबर, १९१८ मध्ये लावला होता. भुशी तलावाच्या वाळलेल्या भागातून ही प्रजात त्यांनी गोळा केली होती. त्यावेळी, तिचे नामकरण ‘बोनायोड्स लिम्नोफिलॉइड्स’ असे करण्यात आले होते. ही प्रजात त्यांना केवळ भुशी धरण परिसरातच मिळाली होती. म्हणजेच ती त्या परिसराला प्रदेशनिष्ठ होती. ’भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभागा’चे (बीएसआय) शास्त्रज्ञ डी. के. मिश्रा यांनी 1996 ते 1998 या काळात महाराष्ट्रातील धोकाग्रस्त वनस्पतींच्या दस्तैवजीकरणाचे काम केले. या सर्वेक्षणात मिश्रा यांनी ही प्रजात शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपयश मिळाले.
‘बीएसआय’चे शास्त्रज्ञ सी. आर. जाधव यांनी पुणे जिल्ह्यातील वनस्पतींच्या दस्तैवजीकरणाचे दीर्घकालीन काम केले. त्यांनीदेखील ही प्रजात शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना प्रजात सापडली नाही. २०१६ साली ‘आययूसीएन’कडून ‘वेस्टर्न घाट प्लांट स्पेशलिस्ट ग्रुप’ या गटाला मान्यता मिळाली. सध्या गटामार्फत पश्चिम घाटातील वनस्पतींच्या मूल्यांकनाचे काम सुरू आहे. गटाच्या सदस्य डॉ. अपर्णा वाटवे यांना ‘लिम्नोफिला लिम्नोफिलॉइड्स’ या वनस्पतीचा संदर्भ मिळाल्यानंतर त्यांनी या प्रजातीचे मूल्यांकन करण्याचे ठरवले. विविध निकषांच्या आधारे ‘वेस्टर्न घाट प्लांट स्पेशालिस्ट ग्रुप’ने या वनस्पतीला ‘नामशेष’ श्रेणीचा दर्जा देण्याचे ठरवले आणि त्यासंबंधीची घोषणा काही दिवसांपूर्वीच ‘आययूसीएन’कडून करण्यात आली आहे.
विविध निकषांच्या आधारे मूल्यांकन
‘आययूसीएन’ने २०११ साली या प्रजातीचे मूल्यांकन ‘डेटा डिफिशिएन्ट’ श्रेणीत केले होते. म्हणजेच या वनस्पतीच्या अस्तित्वाविषयी काहीच माहिती नव्हती. मात्र, आता या प्रजातीला नामशेष म्हणून घोषित करण्यासाठी आम्ही विविध निकषांचा आधार घेतला. नामशेष घोषित करण्याचा निर्णय घेणे सहजसोपे नसते. त्यासाठी ठोस पुरावे, अचूक अंदाज आवश्यक असतात. गेल्या कित्येक वर्षांतील सर्वेक्षणामध्ये ही प्रजात आढळली नाही. शिवाय, या प्रजातीचा एकमेव अधिवास असणार्या भुशी धरण परिसरात वाढलेल्या पर्यटनामुळे या प्रजातीचा अधिवास नष्ट झाल्याने ही प्रजात त्याठिकाणी आढळणे शक्य नाही. अशा सगळ्या परिस्थितीचा मागोवा घेऊन ‘आययूसीएन’च्या ‘फ्रेश वॉटर प्लांट स्पेशलिस्ट ग्रुप’सोबत चर्चा करुन या प्रजातीला नामशेष म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. - डॉ. अर्पणा वाटवे, सदस्य, वेस्टर्न घाट प्लांट स्पेशलिस्ट ग्रुप