दहशदवाद्यांची नावे बदलून हिंदू नावे ठेवली!, नेटफ्लिक्सच्या वेबसिरीजला नोटीस

02 Sep 2024 16:17:00


Kandahar
 
(Wikipedia : File photo )
 
नवी दिल्ली : विमान अपहरणकर्त्यांची मूळ नावे बदलून त्यांना हिंदू नावे दिल्याने नेटफ्लिक्सची कंधार (Kandahar) हायजॅक वेबसिरीज वादात सापडली आहे. इब्राहिम अतहर, शाहिद अख्तर सईद, सनी अहमद काजी, मिस्त्री जहूर इब्राहिम, शाकीर, अशी मूळ आरोपींची नावे बदलून हिंदू नावे देण्यात आल्याने प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. 'द कंधार हायजॅक स्टोरी’ ही वेबसीरीज १९९९ साली घडलेल्या कंदहार विमान अपहरणाच्या घटनेवर आधारित आहे.
 
या सीरीजला चांगला प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे हा वाद उफाळून आला आहे. मूळ आरोपींची नावे हिंदू ठेवण्यात आल्याने हा संताप व्यक्त केला जात आहे. “जे खरं आहे तेच दाखवा”, असे म्हणत त्यांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे. यामध्ये दाखवण्यात आलेल्या दहशतवाद्यांची खरी नावे बदलून हिंदू नावे वापरण्यात आल्याने प्रेक्षकांनी यावर आक्षेप घेतला आहे. घटना आधारीत मूळ पाकिस्तानी असलेल्या मुस्लीम दहशतवाद्यांची नावे सीरीजमध्ये भोला आणि शंकर अशी दाखवण्यात आली आहेत.
 
या प्रकरणाची दखल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने घेतली असून याबाबत नेटफ्लिक्सला नोटीस बजावण्यात आली आहे. IC814 या वेबसीरीजसाठी नेटफ्लिक्सच्या आशयनिर्मिती प्रमुखांना दिल्लीत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या वेबसीरीजमध्ये नेटफ्लिक्सने जाणीवपूर्वक दोन हिंदू नावे वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वेबसीरीजचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा याला सोशल मीडियावर टॅग करुन याविरोधात रोष व्यक्त केला जात आहे.
 
ट्विटर तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर याप्रकरणाविरोधात #BoycottBollywood असा ट्रेंड सुरू झाला आहे. ६ जानेवारी २००० रोजी गृह मंत्रालयाकडून या घटनेतील दहशतवाद्यांची नावे सांगण्यात आली होती, तरीही हिंदू नावांचा उल्लेख का केला असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच वेबसीरीज ही सत्य घटनेवर आधारलेली असल्याचे भान ठेवून गोष्टी ठरवणे अपेक्षित असल्याचेही बोलले जात आहे. नासिरुद्दीन शाह, विजय वर्मा, पंकज कपूर, दिया मिर्झा, अरविंद स्वामी अशी तगडी स्टारकास्ट असलेली ही वेबसीरीज नावाच्या वादामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
 
नावात बदल करण्यामागे खरं कारण काय?
 
IC814 : The Kandahar Hijack Story ही सीरीज अपहरण झालेल्या विमानाचे कॅप्टन देवी शरण आणि पत्रकार श्रींजय चौधरी यांच्या “ फ्लाइट इनटू फिअर : द कॅप्टन्स स्टोरी " पुस्तकावर आधारित आहे. काठमांडूहून जे विमान दिल्लीला येत होते, त्यामधील दहशतवाद्यांनी प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा म्हणून टोपणनावे वापरली होती. जसे की शेफ, डॉक्टर, बर्गर, भोला आणि शंकर, अशाप्रकारे दहशतवाद्यांनी आपली खरी ओळख लपवण्यासाठी ह्या नावांचा उल्लेख केला होता, असे या पुस्तकामध्ये स्पष्ट सांगितले आहे.
 
Powered By Sangraha 9.0