मुंबई : महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात दंगली का होत नाहीत? झाल्या पाहिजे, असे वादग्रस्त विधान उबाठा गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधला. रविवार, १ सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीतर्फे ‘जोडे मारा आंदोलन’ करण्यात आले.
मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोलेंच्या प्रमुख उपस्थितीत हुतात्मा स्मारक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत रविवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत खैरेंनी एक वादग्रस्त विधान केले आहे.
हे वाचलंत का? - लाडकी बहिण योजना! लवकरच 'त्या' महिलांच्या खात्यात ४५०० रुपये जमा होणार
चंद्रकांत खैरे म्हणाले की, "कुठल्याही गावात एखादा पुतळा कोसळला तर तिथे दंगली होतात. आज इतक्या मोठा पुतळा पडला, मला हे कळत नाही की, या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाहीत? दंगली झाल्या पाहिजे. महाविकास आघाडीतर्फे उद्धवजी, शरद पवार आणि नाना पटोलेंच्या नेतृत्वात जोडे मारो आंदोलन सुरु आहे. कितीही पोलिस येऊद्या. आम्हाला सवय झाली आहे," असे ते म्हणाले.
चंद्रकांत खैरेंच्या या विधानामुळे त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याआडून महाविकास आघाडीला महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत का? असा सवालही यानिमित्ताने सर्वत्र उपस्थित करण्यात येत आहे.