'ही शान कोणाची, लालबागच्या राजा'ची अशा जयघोषात पार पडला लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा
18-Sep-2024
Total Views |
मुंबई : (Lalbaugcha Raja Visarjan 2024) गणेशोत्सवात मुंबईतील आकर्षणाचे प्रमुख केंद्रबिंदू असणारा लालबागचा राजा अखेर दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता परतीच्या प्रवासाला निघाला होता. दहा दिवसांसाठी आलेल्या ह्या लाडक्या पाहुण्याला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर लाखोंचा जनसागर उसळला होता. राजाच्या या भव्य विसर्जन सोहळ्यामध्ये रिलायंस इंडस्ट्रीजचे अनंत अंबानी देखील सहभागी झाले होते. तब्बल २० तास चाललेल्या भव्य मिरवणुकीची सांगता गिरगाव चौपाटीवर झाली.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ११ वाजता लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती. मिरवणुकीला सुरुवात झाल्यापासून ठिकठिकाणी लाडक्या बाप्पावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर पुढे लालबाग, भारतमाता सिनेमा, चिंचपोकळी पूल, बकरी अड्डा, भायखळा रेल्वे स्थानक (पश्चिम), क्लेअर रोड, नागपाडा, डंकन रोड, दोन टाकी, कुंभारवाडा, सुतार गल्ली, माधवबाग, सी. पी. टँक, व्ही. पी. रोड, ऑपेरा हाऊस असा प्रवास करुन अखेर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला.
रात्रभर मुंबईच्या रस्त्यांवर गणेशभक्तांचा अलोट उत्साह पाहायला मिळाला. सकाळी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाल्यानंतर मोठ्या दिमाखात त्याची महाआरती करण्यात आली. त्यानंतर राजाला विसर्जनाच्या दिशेने नेत तराफ्यावर बसवण्यात आले. यावेळी कोळी बांधवांकडून लालबागच्या राजाला बोटींची विशेष सलामी देण्यात आली. खोल समुद्राच्या मध्यभागी गेल्यावर तराफा थांबवण्यात आला. तराफ्यावर ५ स्कुबा डायव्हर्स तैनात केले होते. ज्यांच्या माध्यमातून हायड्रॉलिक क्रेनच्या साहाय्याने लालबागच्या राजाचे शाही विसर्जन पार पडले. आपल्या लाडक्या बाप्पाला त्या अथांग समुद्राच्या कवेत सामावताना पाहून भाविकांचे डोळे पाणावले होते.