सा.‘विवेक’ प्रकाशित आणि डॉ. मिलिंद पराडकर लिखित ‘तंजावरचे मराठे’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत पुणे येथे संपन्न झाला. राष्ट्रनिर्मिती व तिचे महत्त्व मांडत धर्माकरिता, स्वराज्याकरिता छत्रपती शिवरायांनी आपला पुरुषार्थ कसा उभा केला; त्यापद्धतीने आज प्रत्येकाने विचार करणे का महत्त्वाचे आहे? याबाबत सरसंघचालकांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या उद्बोधनाचा भावार्थ...
आपला भारत देश हा अतिशय भाग्यवान आहे. तो यासाठी कारण, जेव्हा जेव्हा भारत आपल्या प्रकृतीसहित समाप्त होणार; एवढं मोठं संकट देशात उपस्थित होतं, त्यावेळेला त्याचा उपायही आपल्यासमोर येऊन उभा राहत असतो. राष्ट्रहिताच्या दृष्टीने वातावरण उत्पन्न करणारे संत-महात्मे आणि त्या वातावरणाच्या आधारावर एक दिशा घेऊन पुरुषार्थ करणारे कर्तृत्वसंपन्न असे महापुरुष आदीकाळापासून आजच्या क्षणापर्यंत या देशात उपस्थित झाले आहेत. त्यामुळे भारत देश निश्चितच चिरंजीव झाला आहे. म्हणून तो जरी चार ठिकाणी भटकून आला, तरी परत एका सन्मार्गावर येऊन ’मार्गाधारे वर्तावे। विश्व हे मोहरे लावावे॥’ असे करायला तो पुन्हा तयार होतो. ही आपल्या देशाला मिळालेली दैवी देणगी आहे. ती उगाच मिळायची म्हणून मिळालेली नाही. हे काम जगात व्हायची नित्य आवश्यकता असते. ते झालं पाहिजे, ही जबाबदारी स्वतः परमेश्वराने आपल्या खांद्यावर टाकली आहे. सत्ययुगातील कथांपासून आज घडणार्या घटनांपर्यंत ज्या गोष्टी होत्या, त्यामागची प्रेरणा तपासली तर ती वेगळी नाही.
‘तंजावरचे मराठे’ पुस्तकाच्या शेवटी रामचंद्र अमात्य यांच्या आज्ञापत्राचा उतारा आहे. त्याच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं याबद्दल सांगितलं आहे. त्यात म्हटले आहे की, ईश्वराने राजे का उत्पन्न केले? तर धर्मपथावर समाजाला अढळ ठेवण्याकरिता. एकटा माणूस जगू शकत नाही, म्हणून मिळून-मिसळून जगलं पाहिजे. त्याकरिता मानवनिर्मित एखादा कृत्रिम आधार निवडून तो सगळ्यांनी मानावा, सतत मानत राहावा, याकरिता एका सत्तेची निर्मिती करून आपल्या सामूहिक स्वार्थाचा उपक्रम जगात करायचा. तेही एकप्रकारे ईश्वरी प्रयोजन आहे.
स्वामी विवेकानंद सांगतात, प्रत्येक राष्ट्राचं एक प्रयोजन असतं. जगासमोर एका सामारिक सत्तेचा आदर्श प्रस्थापित करणं, हे त्याकाळी रोमन साम्राज्याचं ध्येयं होतं. ते यासाठीच जन्माला आलं होतं. स्वामी विवेकानंदांनी अशा दोन-तीन राष्ट्रांची उदाहरणे दिली आहेत. परंतु, आपला भारत देश हा ‘सर्वायव्हल’करिता निर्माण झालेला नाही. कारण, आपल्यासमोर ‘सर्वायव्हल’चा प्रश्नच नव्हता. ‘सुजल, सुफल, मलयज, शीतल’ अशी आपली मातृभूमी आणि त्यात आपण मूठभर संख्येचे लोक. चारही बाजूंनी सुरक्षित. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न आपल्यासमोर नव्हता. भरपूर समृद्धी मिळाल्याने ती भोगताना तिलाही एक मर्यादा असते, हे लक्षात आलं. कितीही समृद्धी झाली तरी, एक क्षण असा येतो की, त्यामध्ये मन रमत नाही, मनात एक पोकळी कायम राहते, समाधान राहत नाही. बाहेरच्या सुखात समाधान नाही. म्हणून भारताने स्वतःमध्ये त्याचा शोध घेतला आणि मग आपल्या पूर्वजांना सर्व अस्तित्वं एक आहे, याचं सत्य गवसलं. म्हणजेच काय तर सगळे आपले आहेत; वसुधैव कुटुम्बकम्! त्यामुळे आपल्याला शाश्वत सुखाचा मार्ग सापडला, ज्याने जीवनाचं सत्य उमगलं. तो आपण सर्वांना दिला पाहिजे.
धर्म, अर्थ, काम, मोक्ष असं आपण म्हणतो. अर्थ, काम या माणसाला सहज प्रवृत्तीने कळणार्या गोष्टी आहेत. त्याचा उबग आला म्हणजे मोक्षाची भावना मनात निर्माण होते. परंतु, हे सर्व एकत्र प्राप्त करून देणारा धर्म हा पहिला पुरुषार्थ असून त्याकडे दुर्लक्ष होते. ते खर्या अर्थाने सगळ्या सुखाचे कारण आहे. ’धर्माद अर्थश्च कामश्च स किमर्थं न सेव्यते’ असे व्यास महर्षींनी महाभारतात विचारले आहे. तो धर्म सर्व जगाला देण्याकरिता ऋषीमुनींच्या घोर तपस्येतून परिश्रमातून राष्ट्र उत्पन्न झालं, अशी ऋचा आहे. ’भद्रं इच्छन्तः ऋषयः स्वर्विदः, तपो दीक्षां उपसेदु: अग्रे! ततो राष्ट्रं बलं ओजश्च जातम्’ हे फक्त तेव्हाच सांगितले असे नाही. आपल्या देशाच्या समृद्धीकरिता, सुरक्षेकरिता वारंवार प्रयत्न झाले. जेव्हा जेव्हा देशाचं उत्थान झालं, तेव्हा तेव्हा त्यावेळच्या उत्थानकर्त्यांनी जे म्हटलं त्यात आपल्याला या गोष्टी मिळतात; अगदी आजही!
सुभाषचंद्र बोस लिखित ’द इंडियन रेझिस्टन्स’ या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टी 12 वर्षांनी त्यांनी पुन्हा तपासल्या. त्यातल्या काही त्रुटी व कालबाह्य झालेल्या गोष्टी खोडल्या आणि समासात त्याबाबतच्या सुधारणा केल्या. त्या सुधारणा अगदी तशाच स्वरूपात ’द इंडियन रेझिस्टन्स’ या पुस्तकातून प्रकाशित झाल्या आहेत. पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात त्यांनी भारताच्या इतिहासापासून सुरुवात केली आहे. इंग्रजांमुळे आपले एक राष्ट्र आहे, नाहीतर आपण अनेक राजांनी चालवलेल्या राज्यांचा समूह होतो, असे इंग्रजांनी म्हटल्याचा त्यात उल्लेख आहे. परंतु, हे चुकीचे आहे. भारताचा विचार करताना दशकात, शतकात अगदी सहस्त्रकात मोजून चालत नाही, तर युगायुगात मोजावा लागतो, इतका जुना आपला इतिहास आहे. त्या सगळ्या इतिहासात एक राष्ट्रजीवन समान हेतू धरून चालत आलेले आहे. मुघल आक्रमण, इस्लाम आक्रमणांचा उल्लेख करत लेखक पुढे सांगतात की, दोन शक्ती उत्पन्न झाल्या. पश्चिमेस शीखांची सत्ता आणि दक्षिणेत मराठ्यांची सत्ता. शिखांची सत्ता काही काळ चालली, नंतर इंग्रजांच्या कपटनीतीमुळे ती लवकर लयाला गेली. परंतु, मराठ्यांची सत्ता ही पुष्कळ वर्षे चालली. सर्व भारतभर पसरलेली आक्रमणे मराठ्यांनी परतून लावली. सांगायचे कारण हेच की, सुभाषबाबूंनासुद्धा ही एक प्रेरणा वाटते. सुभाषबाबू त्यांच्या या पुस्तकात स्वतःला ‘लेफ्टिस्ट’ म्हणवतात. काही आमूलाग्र सुधारणा ज्यांना व्हाव्याशा वाटतात, संपूर्ण स्वातंत्र्याचा आग्रह आत्ताच करायचा असे ज्यांचे म्हणणे आहे. अशा लोकमान्य टिळक, बाबू अरविंद घोष यांच्या गटाला सुभाषबाबू काँग्रेसमधला ‘लेफ्टिस्ट ग्रुप’ असे म्हणतात. आपल्या पुस्तकात त्यांनी समकालिनांचे, सर्व राजकीय प्रवाहांचे वर्णन केले आहे. स्वातंत्र्याकरिता सर्वांचे प्रयत्न एका विशिष्ट प्रेरणेतून चालत होते, हे या पुस्तकातून लक्षात येते. वास्तविक, ‘हिंदू’ हा शब्द सगळेच वापरतात असे नाही, परंतु सुभाषबाबूंनी निःसंकोचपणे तो वापरला.
’हिंदू एज अपोज टू मुसलमान’ (हिंदू विरुद्ध मुसलमान) असे नाहीये. व्याकरणाच्या दृष्टीने बौद्ध, जैन, शीख, मुसलमान, ख्रिश्चन हे सर्व नाम (नाऊन्स) आहेत. विशिष्ट प्रकारचा ग्रंथ, विशिष्ट प्रकारचे मत मांडणारे ते आहेत. हिंदू हे त्यांच्याप्रमाणे नाम नाही. हे सर्वजण एका विशिष्ट स्वभावात जेव्हा वागू लागतात, तेव्हा त्या स्वभावाचं वर्णन करणारं ते विशेषण आहे. ते अत्यंत उदात्त गोष्ट सांगतं की, सगळ्या विविधतेचा स्वीकार करा. म्हणून महाराष्ट्रातले मराठे तामिळनाडूमध्ये जातात, तेव्हा तिथे ते आजही परके वाटत नाहीत. सगळ्या भाषांचे साहित्य पाहिलंत तर हीच गोष्ट त्यात सांगितली आहे.
धर्मप्राण भारत देशाचा हा एकतेचा धागा धर्मातून येतो. धर्म म्हणजे केवळ पूजा नाही. धर्म म्हणजे हे खा, ते खा, हे खाऊ नका, हे म्हणजे धर्म नाही. सत्य, करूणा, सूचिता आणि तपस ही धर्माची मूल्यं सत्यामधून आली आहेत. याचा गौरव मनात घेऊन जेव्हा माणूस उभा राहतो, तेव्हा सगळ्या गोष्टी ठीक होतात. ज्यादिवशी आक्रमक भारताच्या सीमेत आले, तोच प्रतिकार सुरु झाला. इस्लामी आक्रमणाचे स्वरूप जोपर्यंत लक्षात आले नाही, तोपर्यंत लोकांनी केलेले प्रयोग विफल झाले. उत्कट त्यागाच्या, शौर्याच्या कथा आहेत, प्रेरणा उत्पन्न करणारी चरित्रं आहेत, परंतु यश नाही मिळालं. या सगळ्याचा अभ्यास करून, चुका सुधारून छत्रपती शिवाजी महाराजांनी जो उपाय केला, तो लागू पडला. तो म्हणजे आग्र्याहून सुटका. कैदेत टाकूनही औरंगजेब त्यांना मारू शकला नाही. जेव्हा महाराज आग्र्याहून परत आले, तेव्हा सर्वांसमोर एक स्पष्ट झालं की, स्वराज्य टिकून राहणार आहे. त्यानंतर पुढे जेव्हा परकीयांची जी सत्ता राहिली, ती स्वकियांच्या दयेवर राहिली. इंग्रज मध्ये आले नसते, तर कदाचित संपूर्ण सात्मिकरण होऊन आपला देश एकसंध दिसला असता. आजच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज नसले तरी त्यांचे योगदान माणसाला लगेच कळलं.
सशक्त असताना जेव्हा मराठे तंजावरमध्ये गेले, तेव्हा तेदेखील धर्माकरिता लढले. हिंदू समाजाचा बचाव, राज्याचा विस्तार, अधर्माची सत्ता उखडून काढून धर्माची सत्ता स्थापन करणे अशा बर्याच गोष्टी त्यांनी केल्या आहेत. कला, संस्कृती यांसारख्या प्रेरणादायक गोष्टी तंजावरमध्ये मराठ्यांनी वाढवल्या. ‘धर्माकरिता मरावे। मरोनी अवघ्यासी मारावे। मारता मारता घ्यावे। राज्य आपुले’ म्हणजेच काय तर, या सर्व गोष्टी धर्माकरिता केल्या गेल्या. ही आपली मूळ प्रेरणा आहे, जो आपल्या देशाचा प्राण आहे. याकरिता देश जेव्हा उभा राहतो, तेव्हा तो उन्नत होतो आणि धर्माला जेव्हा विसरतो, तेव्हा तो अधःपतीत होतो. त्या इतिहासाचे पुनःप्रत्यंतर घडवणारे पुस्तक म्हणजे ’तंजावरचे मराठे’. त्यात दिलेल्या माहितीमागचे प्रेरणेतील तत्वं काय होतं, त्याचेही त्यात वर्णन आहे. त्याची आज गरज आहे. भारत मोठा झाल्यावर ज्यांच्या स्वार्थाची दुकाने बंद होतील, त्यांना काळजी आहे की, भारत मोठा होऊ नये. म्हणून सगळी शक्ती एकवटून पद्धतशीरपणे आक्रमणं सुरु आहेत. म्हणून घाबरून जायचं कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही अशीच परिस्थिती होती. आता आपला पुरुषार्थ तसा उभा करायचा, याची प्रेरणा जागवली पाहिजे, ही काळाची गरज आहे. ती प्रेरणा जागवण्याकरिता ’तंजावरचे मराठे’ सारख्या पुस्तकातील माहिती फार उपयुक्त आहे. ती सर्वत्र पसरवली पाहिजे.
(शब्दांकन : ओंकार मुळये)