पापक्षालन आणि पुण्यवृद्धीसाठी प्रत्येक माणूस भक्तीच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी उपासना, तीर्थभेट, संगमस्नान असे अनेक मार्ग तो अनुभवतो. नर्मदा परिक्रमा हा एक भक्ताला सर्वसुखांची अनुभुती देणारा राजमार्गच म्हणावा लागेल. नर्मदा मय्येच्या साथीत काही दिवस घालवणे हे निश्चितच मनाला स्वात्मसुखाची अनुभुतीचा साक्षात्कार करवते. भक्तांवर अविरत माया धरणार्या या नर्मदा मय्येच्या महतीचे वर्णन या ‘श्रीनर्मदा परिक्रमा : एक अभ्यासपूर्ण आनंदयात्रा’ पुस्तकात केले आहे. त्याचा हा परिचय.
नर्मदे हर हर ...
भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना लोकमाता अर्थात देवता मानतात नद्यांच्या आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिकस्वरूपाची कल्पना आपल्या पूर्वजांना असल्यामुळे, नद्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची पुरातन परंपरा इथल्या भूमीत चालत आली आहे. डॉक्टर मासारू इमोटो यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनामुळे, आपल्या पूर्वजांच्या या दृष्टीकोनास विज्ञानाकडून ही पुष्टी मिळत आहे. अर्थात हा आदर व्यक्त करण्याच्या नानाविध पद्धती आपल्या संस्कृतीत आहेत.अशापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण आणि एकमेवाद्वितीय परंपरा म्हणजे श्री नर्मदा परिक्रमा.
श्रीनर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीला उजव्या हाताला ठेवून, तिच्या भोवताली घातलेली प्रदक्षिणा. हिंदू संस्कृतीमध्ये प्रदक्षिणा हे पूजेचे एक अविभाज्य अंग मानले जाते. भरतखंडात नर्मदेपेक्षाही आकार, विस्तार आणि लांबीत अन्य मोठ्या नद्या असल्या, तरी नर्मदा नदीचे प्राचीनत्व, तिचे भौगोलिक स्थान आणि पुण्यप्रदान करण्याचे श्रेष्ठत्व, या वैशिष्ट्यांमुळे परिक्रमा ही केवळ नर्मदेचीच केली जाते.
एका भक्तीसत्संग मेळाव्यासाठी, श्रीमद परमहंसपरिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या खोपोली येथील मूर्तीस्थानी, जात असताना परमपूज्य सद्गुरु ब्रह्मलीन श्री वासुदेव वामन बापट गुरुजी यांना असे जाणवले की, नर्मदेचा नुसताच शाब्दिक जयघोष करण्यापेक्षा, नर्मदातीरी श्रीस्वामीमहाराजांच्या पालखी आणि पादुकांसंगे यज्ञसन्मुख सामूहिक मंत्रघोष झाला तर, त्यातून भक्तांसाठी आणि नर्मदातीरी शुभ लहरी निर्मितीसाठी बरेच काही साध्य होऊ शकते. त्यामुळे त्याचवेळी सद्गुरु बापट गुरुजींनी, सामूहिक नर्मदा परिक्रमेचा संकल्प केला, व वर्षभरातच सुमारे 320 साधक आणि भक्तांसमवेत 3 नोव्हेंबर 2011 ते 11 डिसेंबर 2011 या कालावधीत, श्रीबापट गुरुजींनी चाळीस दिवसांची श्रीनर्मदा परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण केली! अशा अभूतपूर्व सामूहिक नर्मदा परिक्रमेचा अनुभव, त्यात सहभागी झालेल्या साधक भक्तांमार्फतच श्रीनर्मदा परिक्रमा : एक अभ्यासपूर्ण आनंदयात्राया ग्रंथात प्रकट केला आहे.
ग्रंथाचे मुखपृष्ठ हे नर्मदेच्या समृद्ध प्रदेशातून पालखीसहित पायी चालणार्या, परिक्रमावासीयांचं आहे. आध्यात्मिक उन्नतीकडे वाटचाल करणार्या साधक भक्तांचे हे चित्र खूप अर्थपूर्ण आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे, परिक्रमेच्या तपाकडे अत्यंत अभ्यासपूर्ण आणि ज्ञानयुक्त दृष्टीने बघत, सद्गुरु बापट गुरुजी यांनी परिक्रमावासीयांसाठी आंतरस्पर्शी आणि ओघवत्या शैलीत केलेले सतरा विवेचनरूपी ज्ञानदान, व प्रत्यक्ष परिक्रमा करणार्या साधक भक्तांनी उत्तमरीत्या मांडलेला स्मृतीरूपी शब्दसवांद हे आहे. अर्थात संपूर्ण परिक्रमेचा अभ्यासपूर्ण आढावा यांचा सुरेख संगमच आहे.
अध्यात्म आणि विज्ञान एकत्र अभ्यासले जाऊ शकतात, असे प्रतिपादन करणारे बापट गुरुजी एका विवेचनात म्हणतात, नर्म म्हणजे सुख आणि द म्हणजे देणारी, अशी नर्मदा नदी. हे सुख कोणते तर, पारलौकिक शाश्वत सुख देणारी नर्मदा नदी .तिची परिक्रमा करताना, किंबहुना दैनंदिन जीवनात सुद्धा सत्कर्म, यज्ञ, दान, तप यांसह श्रद्धायुक्त अंतःकरणाने जर नर्मदा मैय्येशी एकरूपता साधता आली, या सगळ्या मागचे अध्यात्म आणि विज्ञानही समजून घेता आले, तर तिच्या पाण्यामध्ये जो ज्ञानाचा प्रकाश आहे, तो साधक भक्तांमध्ये उजळून, त्यांची जीवनपरिक्रमा खर्या अर्थाने साध्य होईल.
नर्मदा परिक्रमेच्या अनुभवाची शिदोरी मांडताना, संपूर्ण प्रवासातील अचूक नोंदी परिक्रमेचा भौगोलिक तपशील, आरती, नामस्मरण,स्तोत्रपठण, निवडक मंदिरातून घेण्यात येणारे देवी देवतांचे दर्शन, त्याच जोडीला कर्मयुक्त भक्ती मार्गाची सांगड घालण्यासाठी सद्गुरूंनी करून घेतलेले दीपदान, कुमारिका पूजन, विविध मंदिरांतील संस्थापकांचा सद्गुरुंनी केलेला सन्मान, यांचे वर्णन स्मृतीरूपाने वाचकांच्या मनात आनंद संवेदनारूपी लहरी निर्माण करतात. त्यायोगे परिक्रमेचे विविध पैलू भविष्यकाळात, परिक्रमा करायला उत्सुक असणार्यांसाठी निश्चितपणे प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरू शकतात.
अगदी सुरुवातीला केलेले परिक्रमेचे पूर्वनियोजन असो अथवा, शेवटी समविष्ट केलेला परिक्रमेचा संपूर्ण अहवाल असो, या सर्व तपशिलामुळे हा ग्रंथ प्रत्येक नर्मदाप्रेमीने संग्रही ठेवावा, इतका सर्वसमावेशक झाला आहे. तसेच श्री टेंबेस्वामींचे नर्मदा किनारी झालेले चातुर्मास, आश्रमांचा तपशील अशी विविध उपयुक्त माहिती समाविष्ट केल्यामुळे ’श्री नर्मदा परिक्रमा:एक अभ्यासपूर्ण आंनंद यात्रा’ हा ग्रंथ प्रत्येक वाचकासाठी अलभ्य पर्वणीच आहे.
ग्रंथाचे नाव : श्रीनर्मदा परिक्रमा : एक अभ्यासपूर्ण आनंदयात्रा
विवेचकाचे नाव : परमपूज्य सद्गुरु श्री वासुदेव वामन बापट गुरुजी
प्रकाशकाचे नाव : यज्ञेश्वर प्रकाशन
पृष्ठ संख्या : 348
ग्रंथ मूल्य : रु450
कुठे उपलब्ध होईल :www.bookganga.com, www.amazon.in, न्यू नेर्लेकर बुक स्टोर, पुणे
रेशमा गोरे फुटाणे