उत्सवांचे अर्थशास्त्र!

    14-Sep-2024
Total Views |
festival season market economy
 
लोकांच्या रीतिरिवाजांचा, स्थानिक रूढी-परंपरांचा, सण-उत्सवांचा, त्यांच्या आशा-आकाक्षांचा, विविध समूहांच्या श्रद्धांचा, त्यांच्या आवडी-निवडीचा, कौटुंबिक व सामाजिक पोताचा, मुख्य म्हणजे रोज सुरू असणार्‍या सांस्कृतिक अभिक्रियेचा अभ्यास केल्याशिवाय उद्योजकांना पुढे जाताच येत नाही. उद्योजकाला या सर्वांचं भान असेल तर त्याची बाजारपेठेवरील पकड घट्ट व्हायला मदत होते. लोकांच्या भौतिक आणि आंतरिक अवस्थेचं प्रतिबिंब म्हणजे बाजारपेठ. सण हे बाजारपेठेसाठी महा-इव्हेंट आहेत. सण-उत्सव-समारंभ नाहीसे झाले तर बाजारपेठ कोरडीठाक पडेल आणि अर्थव्यवस्थेवर ती गंभीर परिणाम करेल. म्हणूनच अर्थजगताशी निगडित प्रत्येकाने सणांचं ऋणी असलं पाहिजे.

विघ्नहर्त्या गणपती-गजाननाचे आगमन हे कुटुंबामध्ये, सार्वजनिक ठिकाणी होताना सगळीकडे चैतन्याचे, आनंदाचे वातावरण असते. लोकमान्य टिळकांचे गणपती उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याबद्दल किती वेळा आभार मानले तरी ते अपुरेच पडतील. कारण, आपला समाज हा कौटुंबिक आणि आध्यात्मिक दृष्टीने आत्मकेंद्रीत आहे. त्यामुळे समष्टि साधना, सामाजिक कार्य व त्यातून निर्माण होणारे संघटन यापासून समाज खूपच दूर असतो. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरे करायचे, ही संकल्पना समाजात रुजवून सर्व समाजाला त्यावेळच्या राजकीय इंग्रजी राजवटी विरुद्ध संघटित केले. म्हणूनच त्यांना त्यावेळच्या भारतीय राजकारणाचे ’असंतोषाचे जनक’ अशी पदवी देण्यात आली. आपल्या सर्वांना माहीतच आहे की, गांधीजींच्या राजकारणातील प्रवेशापूर्वीच भारतभर भ्रमण करून लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्याची मानसिकता तयार केली होती.

लोकमान्य टिळकांचा दुसरा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ’स्वदेशीचा पुरस्कार’ आणि ’आधुनिकतेचा अंगीकार.’ त्यावेळच्या फारच कमी लोकांना इंग्रजांची अर्थनीती समजली होती. सर्व वसाहतींमधून स्वस्तातला कच्चा माल, स्वस्त गुलाम व कामगार यांच्याकडून उच्च दर्जाची उत्पादने तयार करून ती युरोप व अमेरिकेत आणि इतर भरभराटीला आलेल्या शहरांमध्ये विकणे आणि त्यातून कित्येक पट फायदा आपल्या राष्ट्रासाठी घेऊन जाणे. ही इंग्रजांची उद्योगनीती कायमच त्यांना फायदा मिळवून देत होती. तसेच 1853 साली ब्रिटिशांनी पहिली प्रवासी रेल्वे कलकत्ता ते हुगळीपर्यंत सुरु केली. त्याचा हळूहळू विस्तार होत गेला. पर्यटन वाढवणे हा देखील त्यामागचा एक महत्त्वपूर्ण उद्देश होता. प्रवासी रेल्वेचा प्रवाशांना बाजारपेठेला जोडणे आणि अर्थव्यवस्थेतील व्यापाराला चालना देण्यावर लक्षणीय परिणाम झाला. 1850 ते 1947 पर्यंत रेल्वे हा भारताचा महत्त्वपूर्ण पायाभूत विकास होता. एवढे विस्तृत विवेचन गणेशोत्सवाचे करण्यामागील कारण म्हणजे, आपल्याला आत्तापर्यंत सण-उत्सव, परंपरा, देवळे, कुंभमेळे याची फक्त धार्मिकताच समजली. पण, यातून निर्माण होणारी अर्थसंपत्ती आपल्या अजून लक्षात आलेली नाही, हे प्रकर्षाने दिसून येते.

श्रावण साधारण ऑगस्टमध्ये सुरु होतो. सप्टेंबरमध्ये गणपती, ऑक्टोबरमध्ये नवरात्र आणि नोव्हेंबरमध्ये दिवाळी हे सण खास करून महाराष्ट्र तसेच मध्य भारत, उत्तर भारत आणि पूर्व भारतात तर उगादी, ओणम डिसेंबर-जानेवारी महिन्यात दक्षिणेकडे साजरे होतात. असे सर्व सण-उत्सव वर्षभर खूप मोठ्या प्रमाणात भारतात साजरे केले जातात. या सगळ्यातून जी अर्थशक्ती निर्माण होते, त्याला अर्थशास्त्रामध्ये ’बिग एम’ (सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणारी संपत्ती) असं म्हटलं जात. तो कसा कार्यरत होतो ते पाहूया.
 
गणेशोत्सवानिमित्त घरगुती दीड दिवस, सात दिवस, दहा दिवस गणपती बसविले जातात. सार्वजनिक मंडळांचे थाटा-माटात दहा दिवस गणपती बसतात. महाराष्ट्रात सुमारे पाच ते दहा लाख वैयक्तिक गणपती बसवले जातात, तर सुमारे 25 हजार ते एक लाख सार्वजनिक मंडळांमधून गणेशोत्सव साजरा केला जातो. अगदी लहान मुलांपासून ते महिला आणि अबालवृद्धांपर्यंत तसेच गावखेड्यांपासून ते अगदी शहरातील टॉवर्सपर्यंत सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतो. एकंदरीतच या काळात बाजारपेठ ग्राहकांनी फुललेली असते. चार पैसे सढळ हाताने खर्च करण्याकडे बर्‍याचजणांचा कल असतो. आता आपण त्यातल्या एकेक गोष्टींचा विचार केला तर 1) गणपतीची मूर्ती 2) मूर्ती घडवणारे मूर्तिकार 3) कारखान्यातील कामगार इत्यादींची संख्या एवढी प्रचंड आहे की, चीनलाही गणेश मूर्ती बनवण्याचा मोह आवरता आला नाही. 4) गणपतीसाठी केली जाणारी आरास व त्यासाठी लागणारे कागद, लाकडाचे, प्लास्टर ऑफ पॅरिसचे देखावे इत्यादी साहित्यासाठी लागणारी अर्थशक्ती, अमर्याद क्रिएटिव्हिटी व यातून वाढणारा टर्नओव्हरही प्रचंड असतो. 5) पहिल्या दिवशी होणारी शास्त्रशुद्ध पूजा व पूजेसाठी लागणारी पूजेची भांडी, पत्री, फुलं, नैवेद्य हे पूजा द्रव्य, गणपती सहस्रावर्तन, गणपती अथर्वशीर्ष पठण, नातेवाईक-मित्रमंडळींसाठी केलेले कार्यक्रमाचे आयोजन, भोजन समारंभ, भंडारा यासाठी वापरण्यात आलेले नारळ, गूळ, तांदळाचे पीठ, हजारो किलो पेढ्यांची निर्मिती या सर्वांच्या निर्मितीसाठी कार्यरत असलेले कारखाने, तेथे काम करणारी माणसे, गणपती बाप्पाला वाजत-गाजत आणणारे वाजंत्री, मिरवणुकींचाही यात समावेश आलाच. ’मिरवणूक’ या शब्दाची फोड केली, तर ‘मिरवण्यासाठी केलेली नेमणूक’ होय. त्यामुळे मिरवणुकीत मिरवण्यासाठी कपडे-लत्ते आले. इतमामाप्रमाणे पुन्हा बाजारात जाणे आले. झब्बे, नऊवारी साड्या, दागदागिने यांची खरेदी आली. यावेळी खिशावर थोडा ताण पडत असला तरी सगळे त्याचा पुरेपूर आनंद घेत असतात. उत्स्फूर्तपणे केलेल्या खरेदीत आनंद, आश्चर्य आणि समाधान असतं. मुख्य म्हणजे अर्थव्यवस्थेला गती मिळते. उत्स्फूर्त खरेदीचा वेग आणि प्रमाण हे केवळ सणाच्या काळात वाढतं. यादृष्टीने आपण सण-उत्सवाकडे पाहिलं तर आपण बाजारपेठेला मिळणार्‍या निमित्तांच्या दृष्टीने आपण खूपच समृद्ध आहोत. त्यात आंतरराष्ट्रीय सण-उत्सवांची भर पडली आहे. हेही कमी म्हणून की काय, बाजारपेठेच्या प्रोत्साहनातून नवे सण-उत्सव तयार झाले आहेत.

अशा या गणपती उत्सवातून सार्वजनिक स्तरातून 50 हजार ते एक लाख कोटी रुपयांपर्यंतचा धंदा होत असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. सरकारी किंवा खासगी सर्वेक्षण करणार्‍या संस्थांनी जर याचा सर्व्हे केला, तर यावेळी रोजगाराचं प्रमाण प्रचंड वाढून आपोआपच सर्व बाजारात तेजी आलेली दिसून येते. या सणांच्या काळात जे व्यावसायिक वातावरण तयार होत अशीच काहीशी स्थिती वर नमूद केलेल्या दिवाळी, नाताळ, ओणम, उगादी अशा सर्वच सणांसाठी लागू पडते. ख्रिसमस हा काही हिंदूंचा सण नाही. हिंदूंमध्ये गुढीपाडव्याला नववर्ष साजरे केले जाते. तरीदेखील आपण नाताळच्या एकमेकांना शुभेच्छा देतो. उत्सव साजरे करणं ही भारतीयांची परंपरा आहे, हेच यातून प्रकर्षाने दिसून येत. त्यामुळे उद्योजकांसोबतच होलसेल-किरकोळ व्यापारी या सणाच्या दिवसांची आणि या दरम्यान मिळालेल्या संधीची वाट बघत असतात.

सणांच्या अनुषंगाने उद्योजकांनी एखादे उत्पादन/सेवा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून पूर्वनियोजन करून ग्राहकांकडून होणार्‍या खरेदीच्या मानसिकतेचा फायदा करून घेतला पाहिजे. बरेचदा आपल्याकडून ‘प्रॉडक्शन बजेट’ हे खूप ‘कन्झर्वेटिव्ह’ स्वरूपाचं बनवल जातं आणि प्रत्यक्ष विक्रीची वेळ आल्यावर फक्त पाच ते दहा टक्के गिर्‍हाईकांना पुरेल एवढ्या वस्तूंची निर्मिती केली जाते. सांगायचं तात्पर्य हेच की, आपल्याला हिंदू सण-उत्सव आणि त्यातून साधलं जाणारं अर्थकारण हे नीट समजलेलं नाही. त्यामुळे त्याचा आपल्या व्यवसायासाठी कसा उपयोग करून घेतला पाहिजे, याचे आकलन आपल्याला होत नाही. त्यामुळेच एका मोठ्या व्यापारी सौद्यातून होणार्‍या फायद्याला आपण मुकतो आणि उद्योगात अपेक्षित घडी बसत नाही. त्यामुळे उद्योजकाने अत्यंत जागरूक राहून व्यवसाय केला पाहिजे. वर्षातून एकदा येणार्‍या या सण-उत्सवांची आपले उत्पादन आणि सेवा यांच्याशी सांगड घातली पाहिजे. उद्योजकांसाठी सणांच्या काळातली उलाढाल खूप खात्रीलायक आणि निर्णायक असते. मुख्य म्हणजे, या काळात अर्थव्यवस्थेला गती मिळते. उत्स्फूर्त खरेदीचा वेग आणि प्रमाण हे केवळ सणाच्या काळात वाढतं. या गोष्टीचं भान ज्या उद्योजकाला असतं, त्याला उद्योगाच्या अनेक संधी उपलब्ध होतात आणि तो त्याचा फायदाही घेतो.

आपल्याला कितीही पैसे मिळाले तरी मनःशांती लाभेलच असं नाही. पण, देवाकडे प्रार्थना केली की तो आशीर्वाद देतो. अशा ठिकाणी मनःशांती आणि चैतन्य लाभते. म्हणूनच भक्तगण सणासुदीच्या काळात कितीही गैरसोय झाली तरीदेखील धार्मिक पर्यटनस्थळांना भेटी देतात. भक्तांकडून देवाला फळ, फूल, दागिने भक्तिभावाने अर्पण केले जातात. त्यामुळे याचा अप्रत्यक्षरीत्या व्यापार्‍यांना फायदा होत असतो. म्हणजेच आज लाखो संख्येने भाविक व्यापार्‍यांची भरभराट करत आहे. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे स्पष्ट दिसायला लागतं.

लोकांच्या रीतिरिवाजांचा, स्थानिक रूढी-परंपरांचा, सण-उत्सवांचा, त्यांच्या आशा-आकाक्षांचा, विविध समूहांच्या श्रद्धांचा, त्यांच्या आवडी-निवडीचा, कौटुंबिक व सामाजिक पोताचा, मुख्य म्हणजे रोज सुरू असणार्‍या सांस्कृतिक अभिक्रियेचा अभ्यास केल्याशिवाय उद्योजकांना पुढे जाताच येत नाही. उद्योजकाला या सर्वांचं भान असेल तर त्याची बाजारपेठेवरील पकड घट्ट व्हायला मदत होते. लोकांच्या भौतिक आणि आंतरिक अवस्थेचं प्रतिबिंब म्हणजे बाजारपेठ. ’सण हे बाजारपेठेसाठी महा इव्हेंट आहेत.’ सण-उत्सव-समारंभ नाहीसे झाले तर बाजारपेठ कोरडीठाक पडेल आणि अर्थव्यवस्थेवर ती गंभीर परिणाम करेल. म्हणूनच अर्थजगताशी निगडित प्रत्येकाने सणांचं ऋणी असलं पाहिजे. उद्योजकांनी तर नेहमी म्हटलं पाहिजे- ’सणांचे ऋणी आम्ही’ !
व्यापारी-उद्योजकांना येऊ घातलेल्या सर्व सणांच्या ’श्रीमंत शुभेच्छा’!

रविंद्र प्रभुदेसाई
(लेखक पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक आहेत.)