भारतातील जवळपास प्रत्येक राज्यात गणपतीची मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये भव्य आणि सुंदर गणेश मूर्त्या आहेत. गणपती हे दैवत भारतासोबतच परदेशांमध्येही पूजनीय आहे. त्यामुळे भारताबाहेर अनेक देशांमध्ये गणपतीची मंदिरे आणि मूर्त्या स्थापन केल्या गेल्या आहेत. जगातील सर्वात उंच गणपतीची मूर्ती सुद्धा अशाच एका देशात स्थापन केली गेली आहे.
‘या’ देशात आहे जगातील सर्वात उंच गणेश मूर्ती :
थायलंड देशातील खलॉग ख्वेन शहरात गणपतीची एक भव्य मूर्ती उभारली गेली आहे. ही मूर्ती ४० मीटर उंचीची असून ती जगातील सर्वात उंच गणेश मूर्ती म्हणून ओळखली जाते.
‘असे’ आहे मूर्तीचे स्वरूप :
४० मीटर उंचीची ही मूर्ती पितळ धातूपासून तयार केली गेलेली आहे. ८०० हून अधिक पितळाचे तुकडे जोडून ही मूर्ती तयार करण्यात आलेली आहे. ही मूर्ती उभ्या स्वरूपात असून तिच्या एका हातात आंबा, एका हातात ऊस, एका हातात फणस आणि एका हातात केळे आहे . या मूर्तीच्या सोंडेत लाडू धरलेला आहे आणि पोटावर साप वेटोळे आहे. वादळ आणि भूकंपापासून संरक्षण व्हावे यासाठी या मूर्तीचे बांधकाम विशेष काळजी घेऊन करण्यात आलेले आहे.
कधी झाली स्थापना :
ही मूर्ती घडवायला २००९ पासून सुरुवात झाली आणि २०१२ साली या मूर्तीची स्थापना झाली. ज्या ठिकाणी या मूर्तीची स्थापना केली गेली आहे तिथे आधी ‘गणेश इंटरनॅशनल पार्क’ची स्थापना करण्यात आली आणि त्या पार्कात २०१२ मध्ये ही मूर्ती स्थापित केली गेली. परदेशात राहणारे अनेक नागरिक या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी थायलंडमध्ये जातात.