"छगन भुजबळांना आलेला अनुभव..."; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

    14-Sep-2024
Total Views |
 
Shinde & Bhujbal
 
मुंबई : छगन भुजबळांना आलेला अनुभव त्यांनी कथन केला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. मनोज जरांगेंच्या पाठीमागे आमदार रोहित पवार आणि राजेश टोपे आहेत, असा दावा मंत्री छगन भुजबळांनी केला होता. यावर शिंदेंनी प्रतिक्रिया दिली.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "छगन भुजबळांना आलेला अनुभव त्यांनी कथन केला असेल. महायूती सरकार मराठा समाजाला न्याय देणारं सरकार आहे. कुणाचंही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतली आहे. पण विरोधकांची मात्र दुटप्पी भूमिका आहे. ते बोलतात एक आणि करतात एक. सर्वपक्षीय बैठकीतून त्यांनी पळ काढला. त्यामुळे त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल त्यांची भूमिका जाहीर करावी."
 
हे वाचलंत का? -  उद्धव ठाकरे! हेच का मविआचं वेगळं हिंदुत्व?, कर्नाटकातील प्रकारावरुन भाजपची टीका
 
काँग्रेस सरकारला जनता हद्दपार करेल!
 
कर्नाटकमधील पोलिस गणेशमुर्ती घेऊन जातानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. यावर बोलताना ते म्हणाले की, "कर्नाटकमधील घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. हा विघ्नहर्ता सर्वांचे विघ्न दूर करतो. देशभरात गणरायाचं आगमन झालं असताना तमाम गणेशभक्तांच्या भावना दुखावणाऱ्या कर्नाटक सरकारचा मी जाहीर निषेध करतो. गणरायाला अटक करणाऱ्या काँग्रेस सरकारला जनता देशातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही," असे ते म्हणाले.
 
राहूल गांधींच्या आरक्षणाबाबतच्या वक्तव्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "राहूल गांधींच्या पोटातलं त्यांच्या ओठावर आलं आहे. विदेशात जाऊन त्यांच्या मनातलं ते बोलले. आरक्षण रद्द करण्याची भाषा करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. तसेच जे बाबासाहेब आंबेडकरांना धोका देऊ शकतात ते आरक्षणाला कधीही धोका देऊ शकतात. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता येणाऱ्या निवडणूकीत त्यांना त्यांची जागा दाखवेल. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या विरोधात महायूती पूर्ण ताकदीने उभी राहिल," असेही ते म्हणाले.