दादर : शिवाजी पार्क हाऊस ‘सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ तर्फे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी एक अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. ‘शिक्षण आपल्या दारी’ असा या मंडळाच्या उपक्रमाचा विषय आहे. भटक्या विमुक्त जमाती आणि लोककलाकारांना पोटापाण्यासाठी स्थलांतर करावे लागते. त्यामुळे त्यांच्या मुलांना शिक्षणापासून अनेकदा वंचित राहावे लागते. याच मुलांचा विचार करून मंडळ हा उपक्रम राबवत आहे. यावर्षी मंडळातर्फे भटक्या विमुक्त जाती-जमातींसाठी काम करणाऱ्या संस्थांना मदत दिली जाणार आहे. मंडळाने या उपक्रमाला साजेसा असा देखावा सुद्धा साकारलेला आहे. विविध लोककलाकार, त्यांच्या कला आणि शिक्षणाचे महत्व अशा सर्व गोष्टी या देखाव्यामध्ये दाखवण्यात आल्या आहेत. हा संपूर्ण देखावा पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर करूनच तयार करण्यात आला आहे. कलादिग्दर्शक सुमित पाटील यांनी या संपूर्ण देखाव्याचे दिग्दर्शन केले आहे. या मंडळात एक ‘शिक्षणाची दानपेटी’ सुद्धा ठेवण्यात आली आहे. ज्या लोकांना या शिक्षणापासून वंचित मुलांना मदत करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही पेटी आहे. या गणेशोत्सव मंडळाचे हे ५१ वे वर्ष आहे. दरवर्षी हे मंडळ असे समजोपयोगी उपक्रम हाती घेते.