कवी मनाचा माणूस

    13-Sep-2024
Total Views |

Sanjeev Shankar Ahire
 
कौटुंबिक जबाबदार्‍या सांभाळत, आपल्या कवितारुपी छंदाला जोपासत प्रत्येकाच्या
अंतःकरणात रामनाम जागवणार्‍या साहित्यिक संजीव शंकर अहिरे यांच्याविषयी...
 
संजीव शंकर अहिरे यांचा जन्म दि. १५ फेब्रुवारी १९६७ रोजी मालेगाव तालुक्यातील मांजरे गावी झाला. त्यांचे बालपण देवपूर पाडे येथे गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण झाले. पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण मेशी येथे, तर ‘बीएससी’ सटाणा महाविद्यालयातून, तर ‘एमएससी’ जळगाव येथील एमजी महाविद्यालयातून पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मध्य प्रदेशातील उज्जैन येथे नोकरी मिळाली. यादरम्यानच, ‘मानवी संसाधन’ या विषयात रोहतक विद्यापीठातून त्यांनी ‘एमबीए’चे शिक्षण पूर्ण केले. नोकरी करत असताना त्यांना मराठी साहित्यात आवड निर्माण झाली. याचदरम्यान उज्जैनच्या हिंदी साहित्यिकांनी संजीव यांच्यातील लेखन कौशल्य ओळखून, त्यांना हिंदीमध्ये लिखाणासाठी प्रोत्साहन दिले. एका वर्षातच सरस रचना केल्याने उज्जैन जिल्ह्यातील साहित्यिकांनी ‘सर्वश्रेष्ठ साहित्यकार’ म्हणून त्यांना घोषित केले. यानंतर त्यांनी हिंदी साहित्यात मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या पहिल्याच ‘वनिताहोंकी फिरयाँदे’ या पर्यावरण काव्यसंग्रहाला २००८ साली भारत सरकारचा ‘मिडीनी पुरस्कार’ मिळाला. याबरोबरच, संजीव यांचा ‘सांजवात’ हा मराठी काव्यसंग्रहदेखील प्रकाशित झाला.
 
यादरम्यान, साधारणपणे महाराष्ट्राबाहेर एक कोटी मराठी लोक राहतात. त्यांचे देशव्यापी बृहन्महाराष्ट्र मंडळ आहे. या बृहन्महाराष्ट्र मंडळाचा मध्य प्रदेशमध्ये दहा वर्षे त्यांनी कार्यभार पाहिला. या मंडळाचे देशभरातील कटक, चेन्नई, भोपाळ यांबरोबरच अनेक राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी अधिवेशनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. यामध्ये मराठी भाषा, संस्कृती आणि संस्कार याविषयी संजीव यांनी व्याख्याने दिली. या मंडळाअंतर्गत ‘उंबरठ्याआड मायमराठी’ हा उपक्रमदेखील राबविला. दैनंदिन कामात भलेही त्या राज्यातील भाषा बोलावी लागत असेल, मात्र घराचा उंबरठा ओलांडल्यानंतर मराठी कुटुंबाने मराठी भाषाच बोलली पाहिजे, जेणेकरुन मुलांवर मराठी संस्कार होण्यास मदत होईल. तसेच घरातील स्त्रियांनाही मराठी शिकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मध्य प्रदेशमध्ये हा उपक्रम खूप यशस्वी झाला. ज्या मराठी कुटुंबांना मराठी भाषा अवगत नव्हती, तेदेखील मराठी भाषा उत्तम बोलू लागले.
 
मायमराठीच्या प्रचार-प्रसाराच्या उद्देशाने निबंध स्पर्धाही आयोजित केली जाते. त्या निबंध स्पर्धेत अहिरे यांना राष्ट्रीय पातळीवर तीनवेळा प्रथम पारितोषिक मिळाले. या कामासाठी त्यांना ‘अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदे’ने ‘साहित्यगौरव’ पुरस्कारानेही गौरविले. या काळात हिंदी भाषेत त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले. त्यांच्या या उपलब्धीबद्दल ‘बिर्ला ग्रुप’चे अध्यक्ष कुमार मंगलम् बिर्ला यांनी विशेष पुरस्काराने संजीव यांना सन्मानितही केले. उज्जैन, रतलाम, निमच आणि इंदूर या माळवा प्रांतातील मराठी माणसाला संजीव यांनी संघटित केले. २००८ साली नाशिकला स्थायिक झाल्यानंतर संजीव यांची चार पुस्तकेही प्रकाशित झाली. ‘पंचवटी के राम’ हे गद्य आणि पद्य रुपात प्रकाशित झाले. यामध्ये भगवान राम अडीच वर्षे नाशिकमध्ये वास्तव्यास होते. याकाळात त्यांचे नाशिक नगरीसोबत कसे भावसंबंध होते, भगवान राम कळसूबाईपासून मांगी-तुंगी या शिखरांदरम्यान कुठे कुठे राहिले, त्यावर अहिरे यांनी काव्यातून भाष्य केले आहे.
 
त्यांच्या या पुस्तकाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली, तर ‘हृदयांजली’ हा गोदावरीच्या प्रदूषणावर टिप्पणी करणारा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. तसेच ‘स्वामी समर्थांच्या रचना’ हे त्यांचे तिसरे पुस्तकही प्रकाशित झाले. यासोबतच सहा पुस्तकांचे त्यांनी मराठी आणि हिंदीमध्ये भाषांतर केले आहे. हा सगळा प्रवास सुरु असताना मागील १५ वर्षांपासून संजीव अहिरे ‘क. का. वाघ शिक्षणसंस्थे’त जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अजूनही हा कवी मनाचा माणूस शांत बसलेला नसून ‘अयोध्येत उभारण्यात आलेले राम मंदिर’ हा पहिला, तर ‘शिवसह्याद्री’ नावाचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. काव्यक्षेत्रात केलेल्या या भरीव योगदानासाठी अहिरे यांना ‘अखिल भारतीय निबंध स्पर्धे’चेतीन पुरस्कार, ‘सांजवात’ काव्यसंग्रहाला ‘पुरुषोत्तम पुरस्कार’, ‘राष्ट्रीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य गौरव पुरस्कार’, ‘ग्रासीम केमिकल कंपनी’चा ‘केमिकलरत्न पुरस्कार’, केंद्रीय सचिवालय हिंदी साहित्य परिषदेचा ‘राष्ट्रीय शब्दसन्मान पुरस्कार’ अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
 
प्रभू रामांवर अहिरे यांची निस्सीम श्रद्धा असून, त्याविषयी बोलताना ते म्हणतात की, “प्रभू रामचंद्र माझे आराध्य आहेत. त्यांनी मानवस्वरूपात केलेल्या भूमीवर कायमस्वरूपी निवास करण्याचा मानस असल्यामुळे उज्जैन सोडून नाशिक नगरीत स्थिरावलो. मानवमात्रांचे आपसांतील भेद मिटवण्यासाठी आणि सर्व मानवजातीला एका सूत्रात बांधण्यासाठी आणि ‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही संकल्पना साकार करण्यासाठी हृदयातला राम जागवण्याचा माझा संकल्प आहे. हृदयातला राम जागृत झाला, तर संपूर्ण जगात शांतता स्थापित होऊ शकते, यावर माझा संपूर्ण विश्वास आहे. त्यादृष्टीने लेखन, चिंतन आणि मनन चालू आहे. त्यासाठी दुसरा प्रयत्न म्हणून लवकरच ‘रामदर्शन’ हे महाकाव्य प्रकाशित करण्याचा विचार आहे.” भविष्यात यादृष्टीने काही योजना राबविण्याचा मानस आहे. या कार्यासाठी प्रभू सद्बुद्धी देतील, अशी अपेक्षा ठेवणार्‍या या कवी मनाच्या माणसाला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा.
लेखक - विराम गांगुर्डे