मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Nagpur Ganesh Pandal News) गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांतील भव्य गणेश मूर्ती आणि तेथील देखावे येणाऱ्या भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनतात. मात्र नागपुर येथील एक गणेशोत्सव मंडळ सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. जरीपटका येथील रुद्र गणेश उस्तव मंडळाने बसवलेली गणेश मूर्ती भाविकांच्या आक्षेपानंतर मंडळाला तातडीने विसर्जित करावी लागली आहे. या प्रकरणी पोलिसांविरोधात शिविगाळ केल्यामुळे शरद पवार गटाच्या एका प्रवक्त्यास ताब्यातही घेण्यात आले आहे.
हे वाचलंत का? : शिमलानंतर आता मंडीतील अवैध मशिदीवरून हिंदू आक्रमक!जरीपटका येथील रुद्र गणेश उस्तव मंडळाने बसवलेल्या गणेश मूर्तीतून पंचमहाभूते (पृथ्वी, जल, अग्नि, वायु व आकाश) दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गणरायाच्या सोंडेकरीता ड्रेनेज पाईप वापरल्याचे काहींच्या निदर्शनास आले. त्यामुळे भावना दुखावल्याने त्यांनी मंडळाला मूर्तीचे त्वरीत विसर्जन करण्यात सांगितले. यासंबंधी जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही नोंदविण्यात आली होती.
जरीपटका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांच्या माहितीनुसार, मंडळाच्या एका कार्यकर्त्याने संबंधित प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते वेदप्रकाश आर्य यांच्यापर्यंत पोहोचवला. परंतु एकप्रकारे दिशीभूल करत माहिती दिल्याने वेदप्रकाश आर्य यांनी कुठल्याही गोष्टीची पडताळणी न करता पोलिसांवर आवाज चढवत त्यांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सुद्धा अपशब्द वापरले होते. त्यामुळे पोलिसांनी योग्य कारवाई करत वेदप्रकाश आर्य यांना ताब्यात घेतले. तरी भावना दुखावल्याप्रकरणी रुद्र गणेश उस्तव मंडळाने माफी मागत गणेश मूर्तीचे १२ सप्टेंबर रोजी विसर्जन करण्यात आले आहे.