वाळवंटी, तांबड्या समुद्राकाठी डाव मांडला

13 Sep 2024 20:36:32

Mohammed Bin Salman
 
 
सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद-बिन-सलमान यांनी एक मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखला आहे. व्यापारीदृष्ट्या अतिशय मोक्याच्या, महत्त्वाच्या ठिकाणी ‘न्योम’ या नावाचे नवीन बंदर वसवायचे, अशी भव्य कल्पना मोहम्मद-बिन-सलमान यांनी मांडली आहे, नव्हे, काम सुरूच केले आहे.
 
मध्य-पूर्वेतल्या देशांमधली लोकप्रिय पर्यटनस्थळे कोणती, असा प्रश्न विचारला, तर पहिल्यांदा नावे आठवतील ती म्हणजे मक्का, मदिना आणि जेरुसलेम. मक्का, मदिना ही धार्मिक दृष्टीने मुसलमानांसाठी सर्वोच्च पूज्य स्थाने, तर जेरुसलेम हे मुसलमानांसह ख्रिश्चन आणि ज्यू यांच्यासाठीदेखील पवित्र शहर आहे. यानंतर क्रम लागतो, तो इजिप्त, जॉर्डन, सीरिया, लेबेनॉन आणि इराक या देशांमधील अनेक ऐतिहासिक, पुरातत्वीय ठिकाणांचा. इजिप्तमधले पिरॅमिड्स, जॉर्डनमधले पेट्रा हे प्राचीन शहर आणि मृत समुद्र, सीरियामधली दमास्कस, अलेप्पो, अँटिओक ही प्राचीन शहरे, लेबेनॉनमधले बैरूत हे अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य शहर, इराकमधले बगदाद हे प्राचीन शहर आणि इमाम हुसेन यांच्या हौतात्म्यामुळे शिया मुसलमानांना पवित्र असणारे करबला शहर अशी सर्व ठिकाणे ही जगभरातील प्रवाशांची आवडती ठिकाणे होती, आहेत.
 
आता तुम्ही जर मध्य-पूर्वेच्या नकाशावर नजर टाकली, तर तुमच्या लक्षात येईल की, यातले एकही ठिकाण तांबड्या समुद्राच्या काठावर नाही. भारताच्या पश्चिमेला असणार्‍या समुद्राला साधारणपणे ‘पश्चिम समुद्र’ असे म्हटले जाते. याचे प्राचीन हिंदू विशेषनाम आहे ‘रत्नाकर’. परंतु, आधुनिक युरोपीय दर्यावर्दींना या समुद्राची ओळख अरबांमुळे झाली. त्यामुळे त्यांनी याला नाव दिले ‘अरबी समुद्र.’ आधुनिक नौकानयन क्षेत्रात तेच नाव प्रचलित आहे.
 
तर या अरबी समुद्राचे दोन फाटे साधारण आग्नेयेकडून वायव्येला तिरके घुसले आहेत. उत्तरेकडचा फाटा उमानचे आखात नि होर्मझची सामुद्रधुनी या मार्गाने आत शिरला आहे. त्याने पर्शियाचे किंवा इराणचे आखात बनवले आहे. वायव्येकडून या आखातात तैग्रिस आणि युफ्रेटिस या महानद्या येऊन विलीन होत आहेत. दक्षिणेकडचा फाटा एडनचे आखात आणि बाब-अल्-मांदबची सामुद्रधुनी यामार्गे खूप खोलवर सुवेझपर्यंत आत घुसला आहे. या फाट्यालाच नाव आहे ‘तांबडा समुद्र’. वर इराणचे आखात आणि खाली तांबडा समुद्र यांनी एक खूप मोठा भूभाग वेगळा केला आहे. त्यालाच म्हणतात ‘अरबस्तानचे द्वीपकल्प’-‘अरेबियन पेनिन्सूला.’
 
आधुनिक काळात या द्वीपकल्पात काळे सोने म्हणजेच तेल सापडले. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या या संपूर्ण भूभागाला अतोनात महत्त्व आले. अनेक युरोपीय आणि अमेरिकन तेल उत्खनन कंपन्यांनी इथे मोठमोठे प्रकल्प सुरू केले. या प्रकल्पांवर काम करण्यासाठी जगभरातून कुशल कामगारांचा मोठा लोंढाच इकडे वाहू लागला.
 
लेबेनॉन, सीरिया, जॉर्डन, इराक, कुवेत, सौदी अरेबिया, यमन, उमान, कतार, बहरीन आणि संयुक्त अरब अमिराती हे अरबवंशीय देश आशिया खंडातल्या अरबी द्वीपकल्पात मोडतात, तर तांंबड्या समुद्राच्या पलीकडेच सुदान, इजिप्त, लीबिया, अल्जेरिया, मोरोक्को हे देश अरब असले, तरी ते आफ्रिका खंडात मोडतात. ती अरबांची मूळ भूमी नाही. मूळ रहिवाशांचा संपूर्ण उच्छेद करून अरबांनी व्यापलेले असे ते देश आहेत.
 
असो. तर तांबड्या समुद्राच्या काठावरची जिद्दा आणि अलवाझ ही दोन बंदरे सोडली, तर त्या एवढ्या मोठ्या सुमारे दोन हजार किमी लांबीच्या किनारपट्टीवर एकही मोठे बंदर नाही. याचे एक कारण असेही आहे की, ही किनारपट्टी समुद्रपाटीपासून बरीच म्हणजे सुमारे पाच हजार फूट उंच आहे आणि हा संपूर्ण भाग वाळवंटी आहे. चारही दिशांना सर्वत्र फक्त वाळू आणि वाळूच. दिवसा भाजून काढणारी उष्णता आणि रात्री हाडांत शिरणारी थंडी.
 
अशा कारणांमुळे एवढ्या लांबलचक तांबड्या समुद्रावर कोणतेही धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक ठिकाणच नाही. मक्का आणि मदिना ही दोन ठिकाणे समुद्रापासून बरीच आत आहेत. अर्थात त्या शहरांना धार्मिक महत्त्व असल्यामुळे तिथे वर्षभर सतत प्रवासी येतच असतात. यंंदाच्या २०२४च्या वार्षिक हज यात्रेला १० लाख, ८० हजार यात्रेकरूंनी भेट दिली. दि. १४ जून ते दि. १९ जून २०२४ या कालखंडातली यावर्षीची हज यात्रा कमालीच्या उष्णतेने गाजली. तशी दरवर्षीची हज यात्रा कोणत्या ना कोणात्या कारणाने गाजत असतेच. यंदाच्या यात्रेला ५१.८ सेंटिग्रेड इतक्या भयंकर उष्माघाताने तडाखा दिला. किमान १ हजार, ३०० ते १ हजार, ५०० यात्री उष्माघाताने मरण पावले. आपल्याकडे नेमके त्या कालखंडात नरेंद्र मोदींचे तिसरे सरकार नुकतेच सत्तारुढ झाले होते आणि ते लवकरच कोसळणार, अशी हवा निर्माण करण्यात आपल्याकडचे ‘मेनस्ट्रीम मीडिया’ किंवा ‘चाय-बिस्कुट पत्रकार’ दंग होते. त्यामुळे हज दुर्घटनेवरून त्यांनी फार उरबडवेपणा केला नाही.
 
पण, मक्का-मदिनेचे पर्यटन हे झाले धार्मिक पर्यटन, पाश्चिमात्यांची पर्यटनाची संकल्पना वेगळी आहे. त्यांच्या धर्मात दारू निषिद्ध नाही, उलट अनेक धार्मिक विधींमध्ये आवर्जून वापरली जाते. मांसाहारातही कुत्र्याचे मांस सोडून अन्य कोणाचेही मांस ते सहज लीलेने खातात. यामुळे पर्यटनस्थळ धार्मिक असलेच तरीसुद्धा त्यांना आरामशीर प्रवास, अ‍ॅटॅच्ड टॉयलेट्स असलेली सुखदायक निवासव्यवस्था, पोहण्याचे तलाव, त्यांच्या काठावर विविध प्रकारच्या ‘दारवांनी’ (दारुचे अनेकवचन) सुसज्ज असे बार, उत्कृष्ट सामिष भोजन, पश्चिमी संगीत वाजवणारी नृत्यालये किंवा डिस्कोथेक, काहींना त्यापुढची सोय असा सगळा साग्रसंगीत थाट हवा असतो. याकरिता खर्च करण्याची त्यांची तयारी असते. डॉलर्सच्या चवडींनी त्यांची पाकिटे, चुकलो ‘वॉलेट्स’ भक्कम फुगलेली असतात. आता तर वॉलेट्सही लागत नाहीत. शेकडो प्रकारची डेबिट-क्रेडिट कार्डस्, पेमेंट अ‍ॅप्स आणि पेमेंट गेटवेज उपलब्ध आहेत.
 
हे सगळे सर्वप्रथम हेरले अरबांच्या दुबईने. संयुक्त अरब अमिराती हा जो देश आहे, तो दुबई, अबूधाबी, अजमान, फुजैरा, शारजा, उम्म-अल्ब्-कैवान आणि रास-अल्-खैमा अशा सात छोट्या-छोट्या अरबी सल्तनतींनी किंवा संस्थानांनी एकत्र येऊन बनवलेला आहे. या संस्थानांपैकी दुबईमध्ये १९६६ साली तेल सापडले. दुबईचे त्यावेळचे शेख म्हणजे प्रमुख रशीद बिन सईद अल् मख्तुम हे मोठे दूरदर्शी होते. त्यांनी तेल उद्योगासाठी बाहेरून माणसे आणलीच. पण, भावी काळात दुबई हे इजिप्तच्या कैरोप्रमाणे किंवा लेबेनॉनच्या बैरुतप्रमाणे पाश्चिमात्य पर्यटकांचे आकर्षण बनले पाहिजे, असे उद्दिष्ट ठेवले. त्यासाठी सौदी अरेबियाप्रमाणे कर्मठ धार्मिक दृष्टिकोन न ठेवता मुक्त पश्चिमी दृष्टिकोन स्वीकारला.
 
म्हणजे काय? म्हणजे असे की, सौदी अरेबियात मक्का-मदिनेची तीर्थयात्रा फक्त मुसलमानच करू शकतात. अन्य कोणीही नाही. समजा व्यवसायानिमित्त गेलेच कुणी, तर त्यांना मक्केच्या काब्यात किंवा मदिनेच्या पैगंबरांचे दफनस्थळ असलेल्या दर्ग्यात प्रवेश करता येत नाही. जुगार आणि दारू यांना सौदीमध्ये कडक बंदी आहे. उलट, दुबईने १९६९ सालापासून जी भरारी घ्यायला सुरुवात केली आहे, ती सतत वरवरच जाते आहे. ‘बुर्ज-अल्-अरब’ हे गगनचुंबी पंचतारांकित हॉटेल कमी पडले म्हणून की काय, आता ‘बुर्ज खलीफा’ हे त्याच्याहीपेक्षा उत्तुंग हॉटेल उभे राहिले आहे. पर्यटक म्हणतील, ती वस्तू हात जोडून तयार आहे. शिवाय, दुबई हे ‘ड्यूटी फ्री’ शहर आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या वस्तू स्वस्तात विकत घेण्यासाठीही पर्यटक झिम्मड गर्दी करतात. यांची सर्वाधिक पसंती असते ती इलेक्ट्रॉनिक वस्तूंना आणि निखळ सोन्याचे किंवा सोने आणि जडजवाहीर यांनी बनवलेल्या दागिन्यांना.
दुबईतली ही प्रवासी गर्दी गेल्या दोन दशकांमध्ये अधिकच वाढली आहे. कारण, मध्य-पूर्वेतल्या जुन्या लोकप्रिय पर्यटनस्थळांना युद्धाची झळ जास्तच लागत आहे. सीरिया, जॉर्डन, इराक, इस्रायल, इजिप्त या देशांमध्ये सतत धुमश्चक्री चालू आहे. त्यातल्या त्यात इस्रायल आणि इजिप्तमधला पर्यटन व्यवसाय जरा स्थिर आहे; पण लेबेनॉनचे बैरुत हे निसर्गसुंदर शहर तर सततच्या घातपाती कारवायांनी उद्ध्वस्त झाले आहे. सीरियामध्ये २०११ सालापासून आजतागायत यादवी युद्ध सुरू आहे. अशा स्थितीत, दमास्कसचे उत्तम पोलाद कसे बनवले जात असे, हे बघायला कोण जाणार जिथे?
 
मध्य-पूर्वेतल्या अशा एकंदर वातावरणात सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद-बिन-सलमान यांनी एक मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखला आहे. सध्याचे राजे सलमान-बिन-अब्दुल अजीज अल सौद हे ८८ वर्षांचे आहेत. मोहम्मद-बिन-सलमान हे यांचे चिरंजीव आणि युवराज 39 वर्षांचे असून तेच भावी राजे असतील, असे सध्या तरी दिसते आहे. आंतरराष्ट्रीय वर्तुळात त्यांना ‘एम. बी. एस.’ या आद्याक्षरांनी ओळखले जाते. आतापर्यंत सौदी राजघराण्यातील राजपुरुषांची सार्वजनिक प्रतिमा जुगारी, रंगेल, चंगीमंगी अशीच होती. स्वतःच्या देशात दारू आणि नृत्यगृहांना बंदी करणारे हे राजेलोक कायम लास वेगासच्या जुगारी कॅसिनोमध्ये किंवा लंडन-पॅरिसच्या कुंटणखान्यांमध्ये पडलेले असायचे.
 
पण, मोहम्मद-बिन-सलमान वेगळा माणूस आहे. राजकारण, समाजकारण, आर्थिक धोरण, सैनिकी धोरण अशा सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रांत या जेमतेम चाळीशीत पोहोचलेल्या तरुण राजपुत्राने जी चमक, जी समज दाखवली, यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक जाणकार लोक त्याला मानू लागले, त्याचे मित्र बनले, जाणते वार्ताहर त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवू लागले. मोहम्मद-बिन-सलमानने अनेक जुनाट, सनातनी सामाजिक धोरणे रद्दबातल करून सौदी समाजाला खूपच प्रागतिक बनवले आहे.
 
सौदी अरेबियाच्या वायव्य कोपर्‍यात तबूक नावाचा प्रांत आहे. या प्रांताची उत्तर सीमा जॉर्डन आणि इस्रायल या आशियाई देशांना भिडली आहे. तिथून अकाबाचे आखात तांबड्या समुद्राला मिळते. ते ओलांडले की पलीकडे आफ्रिका खंडातल्या इजिप्त देशाचा सिनाई हा प्रांत लागतो. त्याच्या पलीकडे सुवेझचे आखात येते. व्यापारीदृष्ट्या अतिशय मोक्याच्या, महत्त्वाच्या अशा या तिठ्यावर ‘न्योम’ या नावाचे नवीन बंदर वसवायचे, अशी भव्य कल्पना मोहम्मद-बिन-सलमान यांनी मांडली आहे, नव्हे, काम सुरूच केले आहे. तब्बल २६ हजार, ५०० चौ. किमी एवढ्या परिसरात दुबईप्रमाणेच अतिशय आधुनिक असे बंदर, त्या बंदराला सौदीमधल्या अन्य व्यापारी शहरांशी जोडणारे रस्ते, रेल्वे आणि विमानतळ, कारखाने आणि उद्योगधंदे यांसाठी सर्व सुविधा, सर्व प्रकारच्या सुखसोयी असणारे पर्यटन स्थळ (सर्व सोईंमध्ये जुगार, दारू आणि पुढचे प्रकार आलेच); आणि यांसाठी लागणार्‍या मूलभूत सुविधा म्हणजे अखंड वीजपुरवठा, पिण्याचे पाणी नि सौदीच्या भीषण उष्णतेपासून संरक्षण देणारी शीतवायू यंत्रणा - ए. सी. प्लांटस् उभे करणे हे सोपे काम नाही. पण, सौदी म्हणजे फक्त मक्का-मदिना नव्हे, तर आमच्याकडे ‘अल् उला’ या प्राचीन कोरीव गुंफांसह सर्व अत्याधुनिक सोयींचे दुबईसारखेच पर्यटनस्थळही आहे, हे मोहम्मद-बिन-सलमानना सिद्ध करायचे आहे. आपण त्यांना शुभेच्छा देऊया.
Powered By Sangraha 9.0