सौदीतही ‘बुर्ज खलिफा’

13 Sep 2024 22:25:34

Jeddah Tower
 
आधुनिक सुविधांच्या मागणीला सामावून घेत संरचना, सार्वजनिक बांधकामे आणि पायाभूत सुविधा निर्माण करतील. युरोपमधील नूतनीकरण केलेल्या विमानतळांपासून ते आशियातील उच्चभ्रू अपार्टमेंट्सपर्यंत, अनेक प्रभावी प्रकल्प आज जगाचा नकाशा बदलत आहेत. सौदी अरेबियातील अशाच एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयी आजच्या लेखातून जाणून घेऊया.
 
केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणीला गती प्राप्त झालेली दिसते. मोठ्या आणि अधिक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे बांधकाम उद्योग झपाट्याने विस्तारत आहेत. वर्ष २०३० पर्यंत जगभरातील पायाभूत सुविधा उभारणार्‍या कंपन्या या लोकसंख्यावाढ आणि आधुनिक सुविधांच्या मागणीला सामावून घेत संरचना, सार्वजनिक बांधकामे आणि पायाभूत सुविधा निर्माण करतील. युरोपमधील नूतनीकरण केलेल्या विमानतळांपासून ते आशियातील उच्चभ्रू अपार्टमेंट्सपर्यंत, अनेक प्रभावी प्रकल्प आज जगाचा नकाशा बदलत आहेत. सौदी अरेबियातील अशाच एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयी आजच्या लेखातून जाणून घेऊया.
 
सौदी अरेबियामध्ये ३ हजार, २८१ फूट या प्राथमिक उंचीवर एक गगनचुंबी इमारत बांधकामाधीन आहे. ही इमारत पूर्ण झाल्यावर ती सौदी अरेबिया आणि जागतिक स्तरावर सर्वात उंच इमारत ठरेल. ही इमारत पूर्वी ’किंगडम टॉवर’ आणि ‘माईल-हाय टॉवर’ म्हणून ओळखली जात. आता याच जागेवर ‘जेद्दाह टॉवर’ची उभारणी सुरु आहे. ‘जेद्दाह टॉवर’ पूर्ण झाल्यावर ‘बूर्ज खलिफा टॉवर’पेक्षा 564 फुटांनी अधिक उंची गाठत ही जगातील सर्वात उंच गगनचुंबी इमारत म्हणून ओळखली जाईल. ‘बूर्ज खलिफा’च्या नावे सध्या जगातील सर्वात उंच गगनचुंबी इमारतीचा विक्रम आहे. ही इमारत ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’च्या जवळपास ११पट उंच असेल आणि ‘फिलाडेल्फिया सिटी हॉल’ आणि ‘एम्पायर स्टेट बिल्डिंग’ यांसारख्या आयकॉन्सचा समावेश असलेल्या प्रतिष्ठित गगनचुंबी इमारतींबरोबर शीर्षस्थानी असेल.
 
‘जेद्दाह टॉवर’ सौदी अरेबियातील जेद्दाह या शहरात स्थित आहे. हा परिसर एक बंदर क्षेत्र असून तांबड्या समुद्राच्या सीमेवर आहे. जेद्दाह हे मध्य-पूर्व देशांतील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर. पेनांग फ्लोटिंग मशीद आणि अल बालद, कोरलपासून बनवलेली घरे असलेली अशी आकर्षक संरचना असणारी ही इमारत शहराचे ऐतिहासिक केंद्र असेल. ‘जेद्दाह टॉवर’ची रचना ‘नियो-फ्यूचरिस्टिक’ वास्तूशैलीमध्ये करण्यात आली आहे. ‘जेद्दाह टॉवर’चे बांधकाम २०१३ सुरू झाले. परंतु, २०१८ त्याला विराम देण्यात आला. या प्रकल्पातील कंत्राटदारांना अटक करण्यात आल्याने आणि कोरोना साथीच्या रोगामुळे या प्रकल्पाला विलंब झाला. तथापि, सप्टेंबर २०२३ या प्रकल्पाचे बांधकाम आता पुन्हा जोरात सुरू झाले. हे काम थांबवण्याआधी पूर्वीच्या बांधकाम व्यावसायिकांनी इमारतीचा एक तृतीयांश भाग पूर्ण केला होता.
 
‘जेद्दाह टॉवर’च्या बांधकामासाठी सुमारे १.२३ अब्ज खर्च अपेक्षित आहे. ‘बूर्ज खलिफा’प्रमाणेच, ‘जेद्दाह टॉवर’ ही निवासी, व्यावसायिक आणि कार्यालयीन दोन्ही जागा देणारी मिश्र-वापराची इमारत असणे अपेक्षित आहे. तेथे एक निरीक्षण डेक (जगातील सर्वात उंच असल्याचे) नियोजित आहे, फोर सीझन्स हॉटेल आणि ९८फूट व्यासाची बाहेरची बाल्कनीदेखील असेल, जी मूळतः हेलिपॅड म्हणून डिझाईन करण्यात आली आहे. ‘काऊन्सिल ऑन टॉल बिल्डिंग्स अ‍ॅण्ड अर्बन हॅबिटॅट’चे अध्यक्ष अँटनी वूड यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादात सांगितले, दुबईने अक्षरशः वाळवंटातून स्वतःचीनिर्मिती केली आहे. ‘बूर्ज खलिफा’ या जगातील सर्वात उंच इमारतीच्या उभारणीने जे साध्य झाले, ते अविश्वसनीय आहे. जेव्हा सौदी युवराज अलवालीदने जगातील पहिली उंच इमारत बांधण्याचा दृष्टिकोन समोर ठेवला, तेव्हा ‘बूर्ज खलिफा’ बांधकामाधीन होता. पण, सुरुवातीपासूनच दुबई मॉडेलची सौदी अरेबियामध्ये प्रतिकृती बनवण्याचा हेतू होता. ‘जेद्दाह इकोनॉमिक सिटी’ हे तांबड्या समुद्रावरील भविष्यकालीन महानगर असेल, ज्यामध्ये जगातील सर्वात उंच इमारत ‘जेद्दाह टॉवर’ साकारत आहे.
 
माध्यमांमधील वृत्तानुसार, ही अद्भुत रचना ‘ड्रियन स्मिथ आणि गॉर्डन गिल आर्किटेक्चर’चे एड्रियन स्मिथ आणि गॉर्डन गिल यांनी तयार केली आहे. स्मिथ आणि गिल यांनी डिझाईन केलेली ही रचना पुढील चार ते पाच वर्षांत सौदी अरेबियाच्या भविष्यातील प्रगतीचे प्रतीक आहे. हा टॉवर सौदी अरेबियाच्या पर्यटन उद्योगाचा विस्तार करण्यासाठी सौदीचे राजे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी डिझाईन केलेल्या अनेक मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे, जो देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरेल.
Powered By Sangraha 9.0