तमिळनाडू : गणपतीची अनेक नावे आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे ‘गजमुख’. गज म्हणजे हत्ती आणि मुख म्हणजे चेहरा. देवी पार्वतींनी गणरायाला प्रवेशद्वाराजवळ ‘आत कोणालाही प्रवेश करू देऊ नकोस’ असे सांगून उभे केलेले असताना महादेव तिथे येतात. गणपती महादेवांना सुद्धा आत प्रवेश करू देत नाही. त्यावेळी गणपतीने प्रवेश नाकारल्यामुळे क्रोधित झालेले भगवान शंकर गणरायाचे शिर धडापासून वेगळे करतात. महादेवांचा क्रोध शांत झाल्यावर त्यांना त्यांची चूक उमगते. त्यावेळी माता पार्वती आणि इतर देवतांच्या आज्ञेवरुन गणरायाला हत्तीचे शिर लावले जाते. आणि तेव्हापासून गणरायाला ‘गजमुख’ ही ओळख मिळते. आपण सर्वांनी गणपतीला हत्तीसारखे मुख आणि सोंड असलेल्या रूपातच पाहिलेले आहे. आपल्या देशात असलेल्या मंदिरांमध्येसुद्धा गणपतीची अशाच रूपातली मूर्ती आहे. पण देशातल्या एका मंदिरात मात्र गणपती ‘मानवी रूपातील’ मूर्ती आहे.
तामिळनाडू मधील तिरूवरूर जिल्ह्यात हे मानवी रूपातील गणपतीचे मंदिर आहे. हे मंदिर आदि विनायक मंदिर म्हणून ओळखले जाते. सोंड नसलेल्या रूपातील गणपतीचे हे जगातील एकमेव मंदिर आहे. महादेवांनी क्रोधित होऊन गणरायचे शिर धडापासून वेगळे करण्यापूर्वी गणरायाचे जे रूप होते ते या मंदिरात पाहायला मिळते. या मंदिराची स्थापना कधी आणि कोणी केली याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही. हे मंदिर सातव्या शतकात बांधले गेले असावे असे मानले जाते. तमिळनाडू राज्यातील तिरूवरूर जिल्ह्यात असलेल्या कुथनूर या गावापासून दोन किलोमीटर अंतरावर तीलतर्पणपुरी म्हणून एक प्रसिद्ध ठिकाण आहे. हे मंदिर आदी विनायक मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. गजमुखी अवतारापूर्वी मानवी रुपात असलेल्या गणपतीच्या मूर्तीमुळे याला आदि गणपती संबोधले जात असावे. या मंदिराची स्थापना कधी आणि कोणी केली याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही. हे मंदिर सातव्या शतकात बांधले गेले असावे असे मानले जाते. या मंदिरातील गणपती उजवा पाय खाली सोडून ध्यानस्थ बसलेला आहे. त्याला चार हात आहेत आणि त्याचे मुख मानवी आहे. या मंदिरातील गणेश मूर्तीची खुद्द अगस्त्य ऋषि संकष्टी चतुर्थीला प्रार्थना करायचे असा उल्लेख काही ठिकाणी उपलब्ध आहे. ही अनोखी मूर्ती पाहण्यासाठी देशभरातून आणि परदेशातूनही अनेक पर्यटक या मंदिराला भेट देतात. या गणेशाची भक्ती केल्याने, त्याचा आशीर्वाद घेतल्याने उत्तम यश मिळते असा स्थानिकांचा आणि इथे येणाऱ्या भाविकांचा विश्वास आहे. या मंदिराच्या परिसरातच शिवपिंडींचे सुद्धा दर्शन घ्यायला मिळते. या शिवपिंडींबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. ती अशी की प्रभू रामचंद्र हे आपला पिता दशरथ यांचे श्राद्ध आणि पिंडदान करण्यासाठी आले. मात्र, पिंडदान केल्यावर त्या पिंडाच्या जागी किडे दिसू लागले. श्रीरामांनी पुन्हा पिंडदान केले. मात्र, पुन्हा तेथे किडे दिसून लागले. असे अनेकदा घडल्यावर शेवटी श्रीरामचंद्रांनी महादेव शिवशंकराची आराधना केली. आराधना केल्यानंतर महादेव तेथे प्रकट झाले आणि श्रीरामांना सांगितले की, मंथरावन येथे जाऊन श्राद्ध करावे. महादेवांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार, श्रीरामांनी तत्कालीन मंथरावन येथे जाऊन पिंडदान केले. आश्चर्य म्हणजे श्रीरामांनी ज्या ठिकाणी पिंडदान केले होते, त्या ठिकाणी त्या चार पिंडांची चार शिवलिंगे तयार झाली. ती ही शिवलिंगे आहेत असे मानले जाते. हा शिवलिंग असलेला भाग मुकतेश्वर म्हणून ओळखला जातो. पिंडदानासाठी हा भाग खूप प्रसिद्ध आहे.