मुंबई : भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आणि पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. पुढील दशकात भारत जगाच्या एकूण विकासात २० टक्के योगदान देईल, असे जी-२० शेरपा अमिताभ कांत यांनी AIMA परिषदेत बोलताना सांगितले. ते म्हणाले, आज आपण जे पाहत आहोत ते आपल्या आर्थिक परिस्थितीत होणारा बदल आहे. तसेच, एका दशकात अर्थव्यवस्था पहिल्या पाचमध्ये आली आहे, असेही अमिताभ कांत यांनी सांगितले.
दरम्यान, काही वर्षांपूर्वी आपण पाच सर्वात कमकुवत देशांपैकी एक होतो. पुढील दशकात भारत जगाच्या एकूण विकासात २० टक्के योगदान देईल याचे मुख्य कारण म्हणजे देशाची जागतिक स्तरावर तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, असे सांगताना पुढील तीन वर्षांत आपण जपान आणि जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू. विकासाची आकांक्षा असलेल्या जगात भारत एक अतिशय मजबूत विकास प्रेरकशक्ती म्हणून उदयास आला आहे, असेही कांत यावेळी म्हणाले.
आगामी २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्यासाठी भारताला खेड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवन बदलणे, आरोग्य क्षेत्रात सुधारणा करणे आणि पोषण मानके वाढवणे आवश्यक आहे. कांत म्हणाले की, भविष्यातील वाढीसाठी भारताला अनेक 'चॅम्पियन' राज्यांची गरज आहे. असे सांगताना जर भारताला पुढील तीन दशकांत ९ ते १० टक्क्यांपर्यंत विकास साधायचा असेल आणि २०४७ पर्यंत विकसित अर्थव्यवस्था बनवायची असेल, तर शिक्षण परिणाम(कौशल्य), आरोग्य क्षेत्रे आणि पोषण मानकांचे प्रमाण सुधारण्याची गरज कांत यांनी अधोरेखित केली.