‘धक्कातंत्रास्त्रा’चा योग्य प्रयोग

12 Sep 2024 20:51:45
pm modi visited cji chandrachur home


पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सायंकाळी सरन्यायाधीश न्या. चंद्रचूड यांच्या घरी आले. गौरी-गणपतीचे दर्शन घेतले आणि आरतीही केली. पंतप्रधानांच्या या अतिशय साध्या कृतीचा जबरदस्त धक्का पुरोगामी इकोसिस्टीमला बसला आहे. कारण, दि. 4 जूननंतर प्रथमच मोदींनी आपल्या खास ठेवणीतल्या ‘धक्कातंत्रास्त्रा’चा प्रयोग केला आहे. परिणामी, मोदी सरकार कमकुवत झाल्याचा दावा करणारी इकोसिस्टीम पुरती गोंधळली आहे, हे नक्की.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिका दौर्‍यावर आहेत. तसे तर ते नेहमीच परदेश दौरे करत असतात, मात्र यावेळी घटनात्मक पदावर असल्याने त्यांच्या दौर्‍यास विशेष महत्त्व होते. मात्र, हे महत्त्व धुळीस मिळवण्यावरच राहुल गांधी आणि काँग्रेसचा भर दिसला. कारण, त्यांनी याही दौर्‍यात भारतविरोधी वक्तव्ये करण्याची एकही संधी दवडली नाही. त्याचवेळी भारतविरोधी व्यक्तींना राहुल गांधी यांनी सोबत घेतल्याचाही आरोप सत्ताधारी भाजपने केला आहे. अर्थात, राहुल गांधी यांच्या भारतविरोधी विधानांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुलामा काँग्रेस आणि त्यांच्या इकोसिस्टीमने चढविण्यात प्राविण्य मिळवले आहेच. अशा विधानांनी राहुल गांधी हे अधिक प्रगल्भ राजकारणी भासतील, अशीही अपेक्षा काँग्रेसला असल्याचे दिसते. अर्थात, राहुल गांधी यांच्या अशा वक्तव्यांचे चाहते देशात आणि परदेशातही मोठ्या संख्येने असतातच. त्यामुळेच आपण काहीतरी क्रांतिकारी बोलत आहोत, असे त्यांना वाटणे साहजिकच.

आता राहुल गांधी यांनी अमेरिकेत बोलताना ‘भारतात शीख व्यक्ती कडे आणि पगडी परिधान करून गुरुद्वारात जाऊ शकत नाही,’ असा अतिशय अजब दावा केला. आता हा दावा करताना देशातील शीख समुदायावर कसा अन्याय होतो, हे दाखवून जगात भारताची प्रतिमा मलीन करण्याचा राहुल गांधी यांचा हेतू असावा. मात्र, असा दावा करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी आपल्या ‘ल्युटन्स दिल्ली’तल्या अधिकृत निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाबा खडकसिंग मार्गावरच्या ‘गुरुद्वारा बंगलासाहिब’ अथवा संसदेस लागून असलेल्या ‘गुरुद्वारा रकाबगंज’ येथे दररोज शेकडो शीख बांधव कडे आणि पगडी परिधान करून कसे दर्शन घेत असतात, याची माहिती घ्यायला हवी होती. त्याचवेळी, आपल्या आजीची खलिस्तानी अतिरेक्यांनी हत्या केल्यानंतर ‘गुरुद्वारा रकाबगंज’ येथे शीखांना कसे जाळून मारले होते आणि शीख हत्याकांडाचे कसे समर्थन केले होते, याचीही त्यांनी माहिती नसावी. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे कॅनडातील ‘सीख्ज फॉर जस्टीस’ या दहशतवादी संघटनेने लगबगीने समर्थनही केले. यावरून राहुल गांधी यांचे वक्तव्य किती गंभीर आहे, हे लक्षात येते. एकेकाळी काँग्रेसचे नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांनी काश्मीरची बाजू मांडण्यासाठी तत्कालीन विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांना जिनेव्हा येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीस कसे पाठवले होते, हे उदाहरण काँग्रेस आणि इकोसिस्टीमकडून नेहमीच दिले जाते. मात्र, राहुल गांधी यांची परदेशातील वक्तव्ये पाहता, त्यांचा वकुब लक्षात येतो.
 
अर्थात, राहुल गांधी यांच्या वक्तव्यांचे भारतात नेहमीप्रमाणे इकोसिस्टीमने टाळ्या पिटून स्वागत केले. जणू काही भारतात अल्पसंख्याक अतिशय असुरक्षित असून बहुसंख्य हिंदू त्यांच्यावर अन्याय करत असल्याचे चित्रच त्यांना निर्माण करायचे होते. मात्र, हे होत असतानाच काँग्रेसशासित कर्नाटकात हिंदूंवर मुस्लिमांकडून होणार्‍या अत्याचाराकडे राहुल गांधी, काँग्रेस आणि त्यांची इकोसिस्टीम मौन बाळगून आहे.

कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील नागमंगला गावात गणपती विसर्जनावेळी दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. दि. 11 सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या या दगडफेकीनंतर परिसरात तणाव पसरला आहे. दोन्ही पक्ष आमनेसामने आले, हाणामारी झाली, दुकाने आणि वाहने जाळण्यात आली. बदरीकोप्पलू गावातील तरुण शहरात गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक काढत असताना ही घटना घडली. ही मिरवणूक मार्गातील दर्गा-मशीद येथे पोहोचल्यानंतर रस्ता ओलांडत असतानाच, हिंदू आणि मुस्लीम समाजातील लोकांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. त्याचे कारण म्हणजे, म्हैसूर रोडवर मिरवणूक काढू नये, असा मुस्लिमांचा आग्रह होता. मात्र, आता मिरवणुकीचा रस्ता बदलणार नाही, अशी अतिशय रास्त भूमिका हिंदूंनी घेतली. त्यावर समाजकंटकांनी मिरवणुकीवर दगडफेक सुरू करून तलवारीदेखील नाचवल्या.

मात्र, राहुल गांधी यांची भारतविरोधी वक्तव्ये उचलून धरणार्‍या आणि गणेशोत्सवावर मुस्लिमांनी हल्ले करण्याच्या घटनांविषयी सोयीस्कर मौन बाळगणारी इकोसिस्टीम बुधवारी रात्री अचानक संतप्त झाली. ‘एक्स’ असो, ‘फेसबुक’ असो, ‘इन्स्टाग्राम’ असो, ‘लिंक्डइन’ असो अथवा ‘चॅनलचर्चा’ असो; या सर्व ठिकाणी त्यांनी ‘देशातील न्यायव्यवस्था विकली गेली होऽ’ अशी बोगस बोंब मारण्यास प्रारंभ केला. यावेळी ही बोंब मारण्याचे निमित्त होते ते देशाचे सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या घरच्या गणपतीचे आणि गौरीचे पंतप्रधानांनी दर्शन घेणे. तर बुधवारी सायंकाळीच पंतप्रधान मोदी हे सरन्यायाधीशांच्या निवासस्थानी दाखल झाले. पंतप्रधानांचे सरन्यायाधीशांनी सपत्निक स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधानांनी गणरायाची आरती केली. त्यावेळी सरन्यायाधीश स्वतः आरती म्हणत होते, तर त्यांच्या पत्नी कल्पना दास या घंटी वाजवत होत्या. सरन्यायाधीशांचे कुटुंबीयदेखील यावेळी आरतीमध्ये सहभागी झाले होते.

हे पाहून इकोसिस्टीम पार हवालदिल झाल्याचे दिसून आले. अनेकांनी आता न्यायव्यवस्था मोदी सरकारची बटीक झाल्याचा बालिश आरोप केला, तर प्रामुख्याने उबाठा नेत्यांनी ‘शिवसेना प्रकरणात आम्हाला न्याय मिळणार नाही,’ असा टाहो फोडला. इकोसिस्टीमच्या या बोंबांचा सूर हा जणू काही आता सरन्यायाधीश उद्यापासून भाजपच्या दीनदयाळ उपाध्याय मार्गावरच्या मुख्यालयातच जाऊन बसतात की काय, असा होता. खरे तर सरन्यायाधीशांच्या घरच्या गौरी-गणपतीचे पंतप्रधानांनी दर्शन घेणे, ही घटना भारतीय लोकशाहीचे सौंदर्य दाखवणारी. त्यास उगाच धर्मनिरपेक्षतेच्या तकलादू चष्म्यातून पाहण्याची अजिबातच गरज नाही. कारण, आपल्या न्यायव्यवस्थेचे बोधवाक्य ‘यतो धर्मस्ततो जयः’ असे महाभारत या हिंदू साहित्यातून घेतले आहे. त्यामुळे सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधानांनी जाणे, यामध्ये वावगे काहीही नाही. पंतप्रधानांच्या या अतिशय साध्या कृतीचा जबरदस्त धक्का इकोसिस्टीमला बसला आहे. कारण, दि. 4 जूननंतर प्रथमच मोदींनी आपल्या खास ठेवणीतल्या ‘धक्कातंत्रास्त्रा’चा प्रयोग केला आहे. परिणामी, मोदी सरकार कमकुवत झाल्याचा दावा करणारी इकोसिस्टीम पुरती गोंधळली आहे, हे नक्की.

मात्र, सर्वोच्च न्यायालयास आपली जहागीर समजणार्‍या इकोसिस्टीमला हा धक्का पचविता येणे अवघड आहे. एकीकडे न्यायपालिकेचे स्वातंत्र्य जपावे, असे सांगणारी ही इकोसिस्टीमच ‘अमुक न्यायाधीश या बाजूचे, तमुक न्यायाधीश त्या बाजूचे’ असे प्रकार करत असतात. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई असो, बोबडे असो किंवा एन. व्ही. रामन असो; या प्रत्येकावर इकोसिस्टीमने हेत्वारोप केले आहेतच. मजेशीर बाब म्हणजे, ‘हे सरन्यायाधीश आमचे आहेत बरं का’ अशी मोहीम इकोसिस्टीमतर्फे चालविली जाते. मग त्या सरन्यायाधीशांच्या ठराविक निकालांचे वारेमाप कौतुक केले जाते. मात्र, त्याच सरन्यायाधीशांच्या काही निवाड्यांना लक्ष्य करून त्यांना ‘सरकारचे एजंट’ ठरवले जाते. नजीकच्या भूतकाळात असा प्रकार न्या. गोगोई आणि न्या. बोबडे यांच्याविषयी घडविण्यात आला होता. आता विद्यमान सरन्यायाधीश न्या. चंद्रचूड हे या इकोसिस्टीमचे लक्ष्य बनले आहेत. अर्थात, माजी सरन्यायाधीश न्या. यशवंत चंद्रचूड यांचा वारसा लाभलेले न्या. धनंजय चंद्रचूड अशा इकोसिस्टीमला काडीचीही किंमत देणार नाहीत, याविषयी खात्री वाटते.

Powered By Sangraha 9.0