प्रेरणादायी मूर्तिकार

    12-Sep-2024
Total Views |
madhukar mestry


मूर्ती व्यावहारिकदृष्ट्या कशी सर्वोत्तम घडेल, यापेक्षा ती भावनिकदृष्ट्या कशी जीवंत होईल, याचा विचार करणारे मूर्तिकार मधुकर मेस्त्री यांच्याविषयी...

काही मूर्तिकारांनी घडवलेल्या गणेशमूर्ती पाहिल्या की, बाप्पाने जणू स्वतःच या मूर्तिकारांची निवड त्यांच्या हातून आकार घेण्यासाठी केली असल्याचा भास व्हावा. असेच एक कुशल आणि अनुभवी मूर्तिकार म्हणजे गिरगावमधील मधुकर मेस्त्री. मुंबईतील लालबाग-गिरगाव भागात गणेशोत्सवाचा थाट मोठा असतो. त्यामुळे या भागात मूर्तिशाळा आणि मूर्तिकारांची संख्याही तुलनेने अधिक. पण, आजही त्या सगळ्या मूर्तिकारांमध्ये मधुकर मेस्त्री यांची एक वेगळी ओळख आहे. याला कारण ठरले, ते त्यांच्या साध्या पण तितक्याच आकर्षक मूर्ती आणि त्यांची त्यांच्या मूर्तिकलेप्रतिची श्रद्धा अन् निष्ठा. मधुकर मेस्त्री यांचा जन्म कोकणातील राजापूरमध्ये झाला. अनेक कोकणी लोक पोटापाण्यासाठी मुंबईत स्थलांतरित होतात; तसेच मेस्त्री कुटुंबही झाले.

मधुकर मेस्त्री यांच्या वडिलांचा गिरगावमध्ये मेस्त्रीकामाचा कारखाना होता. वडिलोपार्जित कारखाना असल्यामुळे मधुकर मेस्त्री यांचे बंधूसुद्धा त्याच व्यवसायाकडे वळले. पण, मधुकर यांचे मन मात्र एका वेगळ्याच दिशेला झेप घेत होते. लहानपणी त्यांच्या चाळीत राहणार्‍या एका कुटुंबाचा गणेशमूर्ती घडविण्याचा कारखाना होता. मधुकर मेस्त्री यांनी अगदी लहान वयातच त्या कारखान्यात जाऊन तिथे काम करणार्‍या मूर्तिकारांना मदत करायला सुरुवात केली. तिथेच त्यांचा संबंध गणेशमूर्ती आणि मूर्तिकलेशी आला. ते स्वतः भविष्यात एक प्रसिद्ध मूर्तिकार होणार आहेत, याची त्यांच्या बालमनाला त्यावेळी अजिबात कल्पना नव्हती. अशाचप्रकारे त्यांनी अनेक वर्षे त्या कारखान्यात काम केले.
 
मूर्तिकलेतील बारकावेही मेस्त्रींनी याच कारखान्यात अवगत केले. मुळातच बाप्पावर अपार श्रद्धा आणि विश्वास असल्यामुळे त्यांच्या ते काम खूप आवडीचे होते. पण, त्या गणेशमूर्ती घडविणार्‍या कारखान्याच्या मालकांनी काही कारणांमुळे तो कारखाना बंद केला. त्यावेळी मधुकर मेस्त्री यांना अतीव दुःख झाले. पण, ते कदापि निराश झाले नाहीत. त्यांनी त्यांच्या राहत्या घरी स्वतः मातीच्या लहान लहान मूर्ती घडवायला सुरुवात केली. कारखान्यातील कामाचा अनुभव आणि बाप्पाचा आशीर्वाद त्यांच्या सोबत होताच. सुरुवातीला ते फक्त चार ते पाच मूर्ती घरी तयार करत असत. पण, पुढे त्यांच्या मूर्ती लोकांना आवडू लागल्या आणि त्यांच्या मूर्तींची संख्याही वाढत गेली. ती संख्या इतकी वाढली की, 1974 साली त्यांनी गिरगावमध्ये स्वतःची ‘गणेश चित्र मंदिर’ मूर्तिशाळा सुरू केली. गिरगावमधील एक प्रसिद्ध मूर्तिकार म्हणून मधुकर मेस्त्री आणि एक प्रसिद्ध मूर्तिशाळा म्हणून लोक ‘गणेश चित्र मंदिर’ला ओळखू लागले.

घरगुती गणपतींसोबतच मोठमोठ्या मंडळांमधून मधुकर मेस्त्री यांच्याकडे मूर्तींची मागणी वाढू लागली. गिरगाव, लालबाग आणि ग्रॅण्डरोड या भागातील अनेक मोठ्या मंडळांमधील गणेशमूर्ती गेली कित्येक वर्षे ‘गणेश चित्र मंदिर’मध्येच तयार होतात. गिरगावमधील प्रसिद्ध आणि मानाचा मानला जाणारा ‘गिरगावचा राजा’सुद्धा अनेक वर्षे मधुकर मेस्त्रीच घडवत होते. मधुकर मेस्त्री यांनी काही वर्षे एका कंपनीमध्ये ‘सेल्समन’ म्हणूनही काम केले. पण, काही काळाने त्यांनी ती नोकरी सोडून पूर्ण वेळ लक्ष मूर्तिकलेकडे केंद्रित केले. ‘आपण घडवत असलेली मूर्ती लोकांच्या घरी आणि मंडळांमध्ये पाच किंवा दहा दिवस विराजमान होते. लोक तिची मनोभावे पूजा करतात. लोकांसाठी ती फक्त मूर्ती नसते, तर तो त्यांचा देव असतो,’ ही जाणीव नेहमी मूर्ती घडवताना मधुकर मेस्त्री यांच्या मनात असते. त्यामुळे आजही एखादी मूर्ती व्यावहारिकदृष्ट्या कशी सर्वोत्तम साकारता येईल, यापेक्षा भावनिकदृष्ट्या ती कशी अधिकाधिक जीवंत असेल, याचा विचार ते करतात.

गेली अनेक दशके मधुकर मेस्त्री मूर्तिकलेचे काम करत आहेत. हे काम करत असताना त्यांनी इतर मूर्तिकार कसे काम करतात, मूर्तिकलेत काळासोबत काय बदल होत आहेत, नवनवीन प्रकारच्या मूर्ती, याचेही निरीक्षण आणि अभ्यास केला. बदलत्या काळासोबतच त्यांनी आपल्या कामात, शैलीत आणि मूर्तींच्या शैलीमध्येही बदल केले. एकेकाळी राहत्या चाळीत चार मूर्ती घडविणार्‍या या मूर्तिकाराच्या ‘गणेश चित्र मंदिरा’त आता दरवर्षी 400 हून अधिक मूर्ती तयार होतात. आयुष्याच्या उत्तरार्धात फार काम करणे शक्य होत नसल्यामुळे मधुकर मेस्त्री यांनी आपला अनेक दशके जपलेला मूर्तिकलेचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपवून विश्रांती घ्यायचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेतला होता.

पण, त्यांच्या थोरल्या मुलाच्या अकस्मात निधनाने त्यांना पुन्हा मूर्तिशाळेची जबाबदारी हाती घ्यावी लागली. उतारवयामुळे त्यांना मोठ्या मूर्ती घडवणे शक्य होत नाही. पण, घरगुती लहान मूर्ती मात्र यावर्षीसुद्धा त्यांनी तितक्याच कल्पक पद्धतीने आणि तितक्याच तन्मयतेने घडवल्या आहेत. यावर्षीसुद्धा त्यांच्या ‘गणेश चित्र मंदिर’ कार्यशाळेतून ग्राहकांनी मोठ्या संख्येने गणेशमूर्तींना पसंती दिली. मूर्तिकला क्षेत्रात येऊ पाहणार्‍या आणि आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी मधुकर मेस्त्री यांचे काम प्रेरणादायी ठरेल, यात शंकाच नाही. अशा या महान मूर्तिकाराला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!

दिपाली कानसे