मुंबई : सायन मध्ये राहणाऱ्या रोकडे कुटुंबियांच्या घरी या वर्षी ‘विश्वचषक’ या विषयावर आधारित देखावा साकारण्यात आला आहे. भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबईतील मरीन ड्राइव येथे जी विजयी परेड झाली ती या देखाव्यात दाखवण्यात आली आहे. विश्वचषक सुरू असताना ‘यावर्षीचा विश्वचषक भारतीय संघ जिंकू दे आणि तो भारतातच येऊदे अशी प्रार्थना भारतातील करोडो लोक देवाकडे करत होते.’ त्यातून रोकडे कुटुंबियांना देखाव्यासाठी हा विषय सुचला. या देखाव्यात त्यांनी संपूर्ण मरीन ड्राइव, तिथे लोकांनी केलेली गर्दी, त्या गर्दीतून जाणारी भारतीय संघाची बस, त्या बसमधला भारतीय संघ, त्यांच्या हातातला विश्वचषक अशी अनेक दृश्ये दाखवली आहेत. बसच्या मागून धावणारी माणसे, झाडावर बसलेली माणसे, इमारतींच्या गच्चीवरून हे सगळं पाहणारी माणसे असे अनेक बारकावे त्यांनी देखाव्यातून दाखवले आहेत. विश्वचषक जिंकल्यावर भारतीयांनी साजरा केलेला या आनंदी क्षणाच्या आठवणी हा देखावा पहिल्यावर पुन्हा एकदा ताज्या होतात. कलादिग्दर्शक केतन दूधवडकर यांनी रोकडे कुटुंबियांच्या मदतीने साकारला आहे.