मुंबई : लालबागमधील पाटील कुटुंबियांच्या घरात यावर्षी एक खास देखावा साकारला गेला आहे. या वर्षीच्या त्यांच्या देखाव्याचा विषय आहे ‘बायोस्कोप’. त्यांनी साकारलेला हा बायोस्कोप फक्त बायोस्कोप नाही तर तो ‘बायोडायवरसिटीस्कोप’. पूर्वी दूरदर्शनसारखी मनोरंजनाची फार साधने उपलब्ध नसताना ‘बायोस्कोपला’ खूप महत्व होते. त्यातून एक प्रकारचा सिनेमा पाहता येता. आता तो काळाच्या ओघात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे नव्या पिढीला या बायोस्कोपची माहिती व्हावी आणि सोबतच त्यांना बायोडायवरसीटी म्हणजे जैवविविधतेचे महत्व कळावे यासाठी पाटील कुटुंबाने या वर्षी हा अभिनव देखावा साकारला आहे. हा संपूर्ण देखावा त्यांनी पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर करूनच साकारला आहे.