सशक्त समाजनिर्मितीसाठी...

11 Sep 2024 22:13:14

Dr. Priya Sawant
 
नेतृत्व विकास विशेषज्ञ, प्रेरक वक्त्या, आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध कॉर्पोरेट ट्रेनर डॉ. प्रिया सावंत यांची विश्व हिंदू परिषद कोकण प्रांताच्या उपाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झाली. त्यानिमित्ताने...
 
आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. तसेच आता नेतृत्वपदांवरही उत्तमरित्या महिला जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे डॉ. प्रिया सावंत. विश्व हिंदू परिषदेच्या कोकण प्रांत उपाध्यक्ष म्हणून नेतृत्व विकास विशेषज्ञ, सुप्रसिद्ध कॉर्पोरेट ट्रेनर डॉ. प्रिया सावंत यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेणारा हा लेख...
 
नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे दि. २५ सप्टेंबर १९७१ रोजी प्रिया यांचा जन्म झाला. मात्र, त्यांचे संपूर्ण बालपण हिंदू परंपरा जपणार्‍या आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या डोंबिवलीत गेले. इथेच त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. प्रियाताईंचा जन्म अशा कुटुंबात झाला की जिथे घरातील मुलींना वैचारिक स्वातंत्र्य होते. शिवाय मुलगा-मुली असा कुठलाही भेदभाव न करता, कुटुंबातील सर्वच मुलींना उच्च शिक्षणाच्या समान संधी व प्रोत्साहन सदैव मिळाले.
 
प्रिया यांचे बालपण एका संयुक्त मोठ्या कुटुंबात मामा-मावशांच्या प्रेमळ सहवासात आणि आजीआजोबांच्या घरंदाज संस्कारात गेले. वयाच्या ६०व्या वर्षी त्यांच्या ‘नानीजी’ नगरसेवक म्हणून निवडून आल्या. त्या फारशा शिकल्या नव्हत्या, तरी त्यांच्यामध्ये अप्रतिम नेतृत्व कौशल्य होते, तर प्रियाताईंच्या आई मुंबईतील एका शाळेत शिक्षिका होत्या. आईमुळे नेहमीच अभ्यास, शिष्यवृत्ती परीक्षा, वादविवाद, क्रीडा, कला यांमध्ये प्रावीण्य मिळवल्याचे प्रियाताई आवर्जून सांगतात.
 
मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात ‘एमएससी’ केल्यानंतर १९९४ साली प्रियाताईंच्या व्यावसायिक प्रवासाला सुरुवात झाली. आधी ‘एनार केमिकल्स, मुंबई’ येथे ‘संशोधन शास्त्रज्ञ’ म्हणून आणि नंतर मुंबईतीलच ‘रॅपटाकोस अ‍ॅण्ड ब्रेट’ या प्रसिद्ध फार्मास्युटिकल कंपनीमध्ये संशोधन आणि विकास अधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यानंतर प्रियाताईंना शिक्षक, प्राचार्य आणि नेतृत्व विकास प्रशिक्षण तज्ज्ञ म्हणून शैक्षणिक तसेच कॉर्पोरेट क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली.
 
प्रिया सावंत यांचे पती सैन्यात अधिकारी आहेत, तर त्यांचे वडीलही भारतीय नौदलात कार्यरत होते. त्या म्हणतात, एका सैन्याधिकार्‍याशी लग्न केल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच सुधारणा होत गेली. सैन्यामुळे त्या देशाशी अधिक जोडल्या गेल्या. त्यांच्या पतीची जिथे जिथे पोस्टिंग व्हायची, तिथे त्या आर्मी स्कूलमध्ये मुलांना शिकवायच्या. अभ्यासासोबतच त्या मुलांना देशभक्तीचे धडेही देऊ लागल्या. पुढे पुण्यात आल्यावर प्रियाताईंनी पुणे विद्यापीठातून ‘औद्योगिक मानसशास्त्र’ आणि ‘क्लिनिकल सायकोलॉजी’मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. पुढे पुण्यातीलच एका नामांकित शाळेत मुख्याध्यापिका म्हणून त्या रुजू झाल्या.
 
‘आयआयटी दिल्ली’च्या ‘व्यवस्थापन अभ्यास’ विभागातून ‘एंटरप्राइज मॅनेजमेंट’चा कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्देश स्पष्ट झाला आणि तेव्हाच त्यांच्या उद्योजक म्हणूनही प्रवासाला प्रारंभ झाला. विविध क्षेत्रांतील अनुभवी, विद्वान आणि ज्ञानी मंडळींना भेटण्याबरोबरच त्यांच्या मार्गदर्शनाचे भाग्य लाभल्याचे प्रियाताई सांगतात. त्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक आणि विवेकपूर्ण झाल्याचेही त्या विशेषत्वाने अधोरेखित करतात.
 
सुधीर फडके, शं. ना. नवरे, सु. ग. शेवडे, सुरेंद्र बाजपेयी, आबासाहेब पटवारी अशा संघ परिवारातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे प्रियाताईंची संघाशी नाळ जोडली गेली. त्या स्वतःला भाग्यवान समजतात की, त्या हिंदू धर्म संस्कारात वाढल्या. हिंदू धर्मातील सकारात्मकता लोकांपर्यंत पोहोचवायला हवी, हे भारतभर केलेल्या प्रवासामुळे त्यांच्या लक्षात आले. म्हणूनच गेल्या २० वर्षांपासून त्या आपल्यापरिने सकारात्मक आणि सक्षम समाज निर्मितीसाठी कार्यरत आहेत. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे त्यांच्या या कार्यास चालना मिळाली. त्यातून पुढे त्यांचा विश्व हिंदू परिषदेच्या सक्रिय कार्यकर्त्यांशीही संपर्क आला. वेगवेगळ्या कामांनिमित्त अनुभवलेले ज्येष्ठ स्वयंसेवक बिमल केडिया, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, रतन शारदा यांचे राष्ट्राप्रती असलेले विचार, निष्ठा आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती आपल्याला नेहमीच प्रेरित करीत असल्याचे प्रियाताई आवर्जून सांगतात.
 
विहिंप कोकण प्रांत मंत्री मोहन सालेकर आणि डॉ. प्रतिभा यांच्यामुळे प्रियाताई विश्व हिंदू परिषदेशी जोडल्या गेल्या. विश्व हिंदू परिषदेच्या निमित्ताने सकारात्मक समाजनिर्मितीचे काम करण्याची संधी त्यांना मिळाल्याचे भाग्य त्या समजतात. वेगवेगळ्या जबाबदार्‍या सांभाळत त्या आज प्रांत उपाध्यक्षपदापर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. प्रियाताईंनी आजवर अनेक उद्योजक, ज्येष्ठ विद्यार्थी, क्रीडापटू, सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कार्यरत व्यावसायिक यांना प्रशिक्षण दिले आहे. प्रियाताई कायम विश्वास बाळगतात की, प्रत्येकामध्ये काहीतरी महान कार्य करण्याची क्षमता आहे. अशा व्यक्तींना त्या कौशल्यपूर्ण पद्धतीने यथोचित मार्गदर्शन करून प्रेरित करतात.
 
जागतिक महिला दिनानिमित्त गुजरात सरकारकडून प्रियाताईंचा विशेष सत्कारही करण्यात आला असून, कित्येक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. प्रिया सावंत यांना पुढील वाटचालीसाठी ‘दै. मुंबई तरुण भारत’तर्फे अनेकानेक शुभेच्छा!
 
 
Powered By Sangraha 9.0