संतापजनक! दुकानात घुसून केली गणेश मूर्तीची विटंबना
दोन मुस्लिम महिला सूरत पोलिसांच्या ताब्यात
11-Sep-2024
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Surat Ganpati Murti News) सूरतमध्ये गणेशोत्सवादरम्यान इस्लामिक कट्टरतावाद्यांनी केलेल्या हिंसाचारानंतर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी आणखी एक घटना घडली आहे. मुस्लीम महिलांनी काही गणेश मूर्तींच्या दुकानात घुसून गणपतीच्या दोन मूर्त्यांची विटंबना केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. त्यांनी हे कृत्य करण्यासाठी त्यांच्या अल्पवयीन मुलांची मदत घेतली असल्याची माहिती मिळत आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी सध्या अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सूरतमधील अठवा भागातील सोनी पलिया मार्केटमध्ये विशाल खलासी यांचे गणेश मूर्तींचे एक दुकान आहे. काही दिवसांपूर्वी याठिकाणी लैमा सलीम शेख आणि रुबिका इरफान पठाण त्यांच्या दोन लहान मुलांना घेऊन त्यांच्या दुकानात आल्या होत्या. त्यानंतर या दोन मुस्लिम महिलांनी त्यांच्या अल्पवयीन मुलांना भडकावून दुकानात ठेवलेल्या गणेशमूर्तींची विटंबना करण्यास सांगितले. या महिलांनी जाणूनबुजून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याकरीता हे कृत्य केल्यामुळे याप्ररणी सूरत पोलिसांनी कारवाई करत दोन्ही महिलांना अटक केली आहे.
पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, दुकानातील एकूण १० मूर्त्यांची विटंबना करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन्ही मुस्लिम महिलांवर पुढील कारवाई सुरू आहे. याचबरोबर वडोदरातही गणेशमूर्ती फोडल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. राजमहल रोड आणि दांडिया परिसरात ३ गणेश मंडळांच्या मूर्ती फोडण्यात आल्याचे समोर आले आहे. रणछोड युवक मंडळ, प्रगती युवक मंडळ आणि खाडीया पोळ युवक मंडळाच्या गणेश मूर्तींची तोडफोड केल्याने येथील हिंदू संतप्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी काही अज्ञात व्यक्तींनी या पंडालवर येऊन गणपतीच्या मूर्ती फोडल्याचं सांगण्यात आले आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला असून या मंडळातून सामान चोरीला गेल्याच्या अनेक घटनाही घडल्या आहेत. या प्रकरणाचा पोलीस सध्या तपास घेत आहेत.