खरा प्रश्न हा राहुल गांधी यांना आपल्या संस्थेत भाषण करण्यासाठी आमंत्रित करणार्या संस्थांचा आहे. पाश्चिमात्य देशांतील बहुराष्ट्रीय कंपन्या, बँका, जागतिक बँक, नाणेनिधी यांसारख्या संस्था भारताच्या आर्थिक विकासाबद्दल किती आशेने आणि भरभरून बोलतात हे लक्षात घेता, राहुल गांधी हे ‘सीरियल खोटारड़े’ असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. तरीही त्यांना आपल्या संस्थेत भाषणासाठी बोलाविणार्यांचाच बुध्यांक तपासून पाहाण्याची गरज आहे, अन्यथा त्यांच्या आमंत्रणामागे भारतविरोधी छुपा अजेंडा आहे, असेच म्हणावे लागते.
राहुल गांधी यांची असत्याची फॅक्टरी पुन्हा एकदा धडधडू लागली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी इंग्लंड आणि युरोपातील काही विद्यापीठांमध्ये दिलेल्या भाषणांमध्ये मोदी सरकार आणि भाजप यांच्यावर प्रच्छन्न टीका तर केलीच होती, पण ते करताना भारताचीही बदनामी केली होती. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी हाच उद्योग पुन्हा सुरू केला आहे. राहुल गांधी हे सध्या अमेरिकेच्या दौर्यावर आहेत. तिथे टेक्सास विद्यापीठात भाषण करताना त्यांनी आपला जुनाच भारतविरोधी राग आळविला. आपल्या भाषणात त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर यथेच्छ पण बिनातथ्य टीका केली आहे. इतकेच नव्हे, तर मोदी यांच्यामुळे भारतात कारखाने बंद पडत असून, त्यामुळे हजारो लोक बेरोजगार होत असल्याचा अभिनव शोधही लावला आहे. भाजप आणि संघ यांची विचारसरणी प्रतिगामी आणि पुरुषप्रधान असल्याचा दावा करताना त्यांना महिलांनी केवळ घर सांभाळावे असे वाटते, असाही आरोप केला आहे. राहुल गांधी यांच्या आजवरच्या सर्व वक्तव्यांचा इतिहास पाहाता, त्यांनी हे आरोप कोणत्या आधारावर केले आहेत, असे विचारण्याचा नादानपणा आम्ही करणार नाही. बालकबुद्धीच्या वक्तव्यांना तर्कशुद्धतेचे निकष लावायचे नसतात, याची जाणीव आम्हाला आहे. तरीही भारतातील विरोधी पक्षनेते या नात्याने राहुल गांधी यांच्या वक्तव्याची छाननी करणे, आमचे कर्तव्य आहे.
गेल्या काही वर्षांत, विशेषत: ‘कोविड’च्या साथीपासून बहुसंख्य अमेरिकी आणि युरोपीय कंपन्यांनी चीनमधील आपले कारखाने अन्य देशांमध्ये हलविण्यास प्रारंभ केला आहे. तैवानवरील चीनच्या संभाव्य हल्ल्यांचाही त्यामागे विचार आहे. चीनपेक्षा या कंपन्यांना आता भारत हे उत्पादनाचे आकर्षक केंद्र वाटत आहे. गेल्या पाच वर्षांत भारतात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक झाली असून ‘फॉक्सकॉन’सारख्या अनेक कंपन्यांनी भारतात सेमीकंडक्टरची चिप, मोबाईल वगैरे उच्च तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने भारतात बनविण्यासाठी गुंतवणूक केली आहे. आय-फोन आता भारतात तयार होत असून ‘अॅपल’ कंपनीची अन्य उत्पादनेही लवकरच भारतात बनविली जातील. संरक्षण सामग्री क्षेत्रातील अनेक उत्पादने आता भारतात बनत आहेत. बांगलादेशातील राजकीय अस्थैर्यामुळे तेथील वस्त्रोद्योगही भारतात स्थलांतरित होऊ लागला आहे. या स्थितीत मोदी यांनी भारतातील कारखाने बंद पाडले, असे विधान राहुल गांधी कोणत्या आधारावर करीत आहेत? पण, राहुल गांधी यांना सत्यासत्यतेशी काही देणे-घेणे नाही. त्यांना मोदी आणि भाजपविरोधाचा आपला कंडू शमवायचा असतो.
राहुल गांधी यांच्या असत्य भाषणांचा इतिहास आता सर्वविदित. भारतातील जनतेलाही त्यांच्या भाषणातील खोटेपणा लक्षात येऊ लागला आहे. असे असतानाही परदेशातील, विशेषत: पाश्चिमात्य देशांतील विद्यापीठे आणि अन्य संस्था यांच्याकडून राहुल गांधी यांना भाषणासाठी आमंत्रित केले जाते, हीच मुळी आश्चर्याची बाब. विद्यापीठे ही ज्ञानाची केंद्रे असतात आणि त्यांना जागतिक घडामोडी आणि जागतिक महत्त्वाच्या नेत्यांची विशेष माहिती असते. भारतातील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांना भाषणासाठी आमंत्रण मिळते, असे जरी म्हटले तरी ज्या वक्त्याला आपण आमंत्रित करतो, त्याचे कर्तृत्त्व आणि इतिहास काय आहे, त्याचे काम स्पृहणीय आणि भरीव आहे का, ते तपासून पाहाण्याची गरज असते. राहुल गांधी यांनी आजवर ज्या ज्या परदेशी संस्थांमध्ये भाषणे दिली, त्या भाषणातील एकही मुद्दा वास्तवाच्या कसोटीवर खरा उतरत नाही, हे दिसून आले आहे. थोडक्यात, राहुल गांधी यांची टीका ही पोकळ आणि बिनातथ्यावर आधारित असते, हे त्यांचे भाषण वरवर ऐकणार्यालाही कळून येते.
ज्या मोदी यांच्यावर राहुल गांधी कडाडून टीका करतात, त्या मोदींना जगातील अनेक देशांनी आपले सर्वोच्च मानसन्मान दिले आहेत. मोदी यांच्याइतके मानसन्मान तर मनमोहन सिंह किंवा नेहरू यांनाही मिळाले नव्हते. इतकेच नव्हे, तर मोदी यांच्याकडे जग एक जागतिक नेता म्हणून आशेने बघते. रशिया-युक्रेन युद्धात मध्यस्थी करण्याची विनंती या राष्ट्रांच्या प्रमुखांनी मोदी यांना केली आहे, यावरून मोदी यांचे जागतिक व्यासपीठावरील स्थान काय आहे, ते कोणालाही कळून येईल. अशा या मोदींवर राहुल गांधी वाटेल तशी टीका कशी करू शकतात आणि केली, तरी त्यांना तिथे कोणी अडवीत कसे नाही, ही आश्चर्याची बाब आहे. पुरस्कार किंवा दान हे सत्पात्री द्यावे, हे वैश्विक सत्य. लायकी नसलेल्यांना सन्मान किंवा पुरस्कार दिल्यास त्या पुरस्काराची आणि तो बहाल करणार्याची विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा घटते, हेही त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. नोबेल पुरस्कारांनी गेल्या काही वर्षांत ही गोष्ट सिद्ध केली आहे. राहुल गांधी यांच्यासारख्या उच्छृंखल व्यक्तीला भाषणासाठी आमंत्रित करणार्या संस्था आणि विद्यापीठांच्या चालकांचे बुध्यांक (आयक्यू) तपासून पाहाण्याची गरज आहे. या संस्थांनी राहुल गांधी यांचा पूर्वेतिहास तपासून पाहिला होता का, असा प्रश्न पडतो. तसे असूनही राहुल गांधी यांना या कथित नामवंत विद्यापीठांकडून आमंत्रणे मिळत असतील, तर त्यामागे त्यांचा भारतविरोधी छुपा अजेंडा आहे, असे म्हणावे लागते. याचे कारण राहुल गांधी आपल्या भाषणात केवळ मोदींवर टीका करीत नाहीत, तर ते भारताची बदनामी करीत आहेत.
राहुल गांधी हे विरोधी नेते आहेत, ते भारतात. परदेशात ते एक भारतीय आहेत, ही गोष्ट ते विसरतात. दिवंगत पंतप्रधान नरसिंह राव यांनी काश्मीरसंबंधी भारताची भूमिका जगाला ठासून समजविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्यावतीने तत्कालीन विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांना पाठविले होते, हे उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे. काश्मीरबाबत काँग्रेस आणि भाजप यांच्या दृष्टिकोनात फरक असला, तरी वाजपेयी यांनी तेथे एक राष्ट्रप्रेमी भारतीय म्हणूनच आपल्यावरील जबाबदारी पार पाडली होती. अर्थात या दोन दूरदृष्टीच्या नेत्यांची तुलनाही राहुल गांधींशी होऊ शकत नाही. यावरून विरोधी पक्षनेत्याने परदेशात कसे आणि काय बोलले पाहिजे, ते लक्षात येईल. पण, ते राहुल गांधी यांना सांगून काय उपयोग!