‘तुजसाठी मरण तें जनन, तुजविण जनन ते मरण...’ स्वा. सावरकरांच्या या निर्धाराप्रमाणे शस्त्राला वाहून घेतलेल्या निलेश अरुण सकट या शस्त्रप्रेमी तरुणाविषयी...
निलेश सकट यांचा जन्म मुंबईत 27 जून 1988 रोजी झाला. बालपण आणि प्राथमिक शिक्षण मुंबईत झाल्यानंतर वडिलांनी सांगलीतील मूळ गावी विटा येथे व्यवसाय सुरू केल्याने उर्वरित शिक्षण गावी झाले. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे ‘एफवायबीए’नंतर रोजगाराच्या शोधात पुन्हा मुंबईची वाट धरली. 2006 मध्ये नवी मुंबईतील मॉलमध्ये टेक्निशियनची नोकरी धरली. पण, शिवकार्य आणि शस्त्रास्त्रांमध्येच मन गुंतल्याने, चार वर्षांतच नोकरी सोडून निलेशने शिवकालीन शस्त्रास्त्रांचा अभ्यास आणि संग्रह करण्याचे ठरवले.
निलेशने निवडलेल्या या क्षेत्रात वारसा कुणाचाही नाही, पण घरातील मूळ पारंपरिक तलवारीची पूजा करणे आणि मावळ्याच्या वेेेशात ती सोबत मिरवणे, हा छंद त्याला बालपणापासून होता. त्या शस्त्राची इतकी सवय झाली की, जेवताना, झोपतानाही तो तलवार जवळ बाळगायचा. पाहुण्याकडे गेला तरी तेथील एखादे शस्त्र बाळगल्याशिवाय त्याला झोप येत नसे. निलेशचे लहान चुलते लष्करात असल्यामुळे बंदुकीचा नादही जडला होता.
त्याचे पहिले प्रेम शस्त्र असल्याने शस्त्रे चालवण्याची युद्धकला हा त्याचा आवडीचा विषय होता. सोबतच चित्रकला, शिल्पकलेतही रुची वाढली. लहानपणीच इतिहास अभ्यास आणि शस्त्रांचा संग्रह करताना आजूबाजूची तसेच, पाहुण्यांकडील शस्त्रे गोळा केली. भंगारवाले, पदपथावर जुन्या वस्तूंच्या विक्रेत्यांकडून शस्त्रे मिळवून निलेशने शस्त्रसंग्रहासह शस्त्रसंवर्धनाचा विडा उचलला. साधारणतः 2007 साली शस्त्रसंग्राहक कै. गिरीश लक्ष्मण जाधव या प्रभृतीची ओळख झाली. त्यांच्या शस्त्र प्रदर्शनांना भेट देऊन, तसेच त्यांच्या घरी जाऊन शस्त्राविषयी सखोल माहिती मिळवली. शस्त्रांचे वेड व संग्रह पाहून त्यांनी निलेशला शस्त्रास्त्र प्रदर्शनाविषयी सुचविले. शस्त्रास्त्रांचा अभ्यास करून मिळवलेले ज्ञान लोकांपुढे नेण्यासाठी त्याने 2010 पासून शस्त्र प्रदर्शने आणि शस्त्रांची माहिती देण्यास सुरुवात केली. आजवर महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक आदी राज्यांमध्ये इतिहासाचे अबोल साक्षीदार या नावाने निलेश शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवतो.
शस्त्र हे राष्ट्राचे द्योतक आहे, राष्ट्राच्या सीमा शस्त्रानेच राखल्या जातात. तेव्हा, आपला जाज्वल्य इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचावा, शिवकालीन शस्त्राप्रति कुतूहल वाढावे, याकरिता निलेश शाळा, महाविद्यालयांमध्येही शस्त्र प्रदर्शने आयोजित करतो. या क्षेत्रात काम करताना अनेक थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभले. त्यामध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शस्त्रपारंगत गिरीश जाधव, दुर्गमहर्षी अप्पा परब यांचे योगदान आहे. 2008 साली शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट झाल्यानंतर त्यांच्या संग्रहातील अनेक शस्त्रे हाताळण्यास मिळाल्याने त्याच्या शस्त्राभ्यासात मोलाची भर पडली. बाबासाहेबांकडील बहुतांश शस्त्रांची त्याचप्रमाणे ऐतिहासिक घराण्यांकडील पारंपरिक शस्त्रांची दुरुस्ती, देखभालही निलेशने केली असून, कालानुरूप गंजून जीर्ण झालेल्या ऐतिहासिक शस्त्रांची शास्त्रशुद्ध पद्धतीने दुरुस्ती करून ती शस्त्रे भावी पिढीसाठी जतन केली आहेत. तसेच भारतातील संग्रहालयांना भेटी देऊन तेथील शस्त्रांचाही अभ्यास केल्याचे तो सांगतो.
छत्रपती शिवाजी महाराज शस्त्रास्त्रांचे जाणकार होते. चित्रगुप्ताच्या बखरीमध्ये शिवकालीन शस्त्रांची नावे आहेत, त्यात ‘यशवंत’ नावाचा पट्टा, ‘तुळजा’, ‘भवानी’ आणि ‘जगदंबा’ या तलवारी, ‘शंभू प्रसाद गुरुज’, ‘गेंड्याच्या कातडीची ढाल’ असे वर्णन आढळते. ‘दहा तलवार धारींवर एक पट्टेकरी भारी’ या उक्तीनुसार पट्ट्याचे महत्त्व जाणून महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडत्या ’पट्टा’ या शस्त्राला 2024 मध्ये राजमान्यता मिळाली. यासाठी निलेश व त्याच्या मित्राने समकालीन पुराव्यानिशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती, असे निलेश आवर्जून नमूद करतो.
आजपावेतो करीत असलेले शिवकार्य तसेच शस्त्राभ्यास व शस्त्र संवर्धनासाठी निलेशला विविध संघटनामार्फत गौरवण्यात आले, तर, 2016 रोजी किल्ले रायगडाच्या सदरेवर ‘शस्त्रविशारद’ या उपाधीने सन्मानित केले आहे. 2012 रोजी श्री क्षेत्रपाल खंडोबा, जिल्हा सातारा या कुलदैवताच्या मंदिरात 98 किलो वजनाची तलवार स्वतः बनवून अर्पण केली असून या तलवारीची नोंद ‘लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाल्याचे निलेश सांगतो.
‘इतिहासाचे अबोल साक्षीदार’ या मोहिमेंतर्गत निलेश संपूर्ण महाराष्ट्रभर ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन भरवत आहे. साधारणपणे 700 हून अधिक प्रदर्शने झाली आहेत. तसेच महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर सहली नेऊन किल्ल्यांवरील शस्त्रास्त्रे व दुर्ग यांची माहिती देण्याचे काम तो करतो. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत विविध ठिकाणी शस्त्रास्त्रे प्रदर्शन भरवतो. 350व्या श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुंबईत गेटवे ऑफ इंडिया तसेच राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी सिंदखेडराजा येथे ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन भरवले होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पुण्यातील आंबेगाव येथील ‘शिवसृष्टी’मध्ये शस्त्रदालन उभारण्याचे भाग्यही लाभल्याचे निलेश सांगतो.
‘आहे तितूके जतन करावे, पुढे आणिक मिळवावे’ या समर्थांच्या उपदेशाप्रमाणे जाज्वल्य इतिहासाचे अबोल साक्षीदार असलेल्या शस्त्रांचे सुयोग्य संवर्धन व्हावे, यासाठी अविरत झटणार्या निलेश सकट याला दै.‘मुंबई तरुण भारत’ च्या शुभेच्छा!
(अधिक माहितीसाठी संपर्क - 8898613948)