मनोरंजनसृष्टीचं अलौकिक वैभव ‘महाराष्ट्र भूषण’ अशोक सराफ

09 Aug 2024 20:49:21
maharashtra bhushan entertainment


संगीत नाट्यभूमीपासून ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. नाट्यरसिकांना आपल्या अभिनयाची भुरळ पाडणार्‍या अशोक सराफ यांनी कालांतराने चित्रपटसृष्टीकडे मोर्चा वळवला आणि १९६९ साली ‘जानकी’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर आजपर्यंत त्यांनी ५५ वर्षांच्या मनोरंजनक्षेत्रातील प्रदीर्घ कारकिर्दीत मागे वळून न पाहता, दर्जेदार कलाकृती देऊ केल्या आणि प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन केलं. ‘महाराष्ट्रभूषण’ अशोक सराफ यांच्यासोबत त्यांचा हा अभिनयाचा प्रवास कसा होता, हे जाणून घेण्याचा दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेला हा प्रयत्न...

दि. २ ऑगस्ट रोजी ‘लाईफलाईन’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी डॉक्टरांची भूमिका साकारली होती. अभिनय क्षेत्रातील दांडगा अनुभव गाठीशी असताना डॉक्टरांच्या भूमिकेसाठी काय तयारी केली, असे विचारले असता अशोक सराफ म्हणाले की, “डॉक्टरची व्यक्तिरेखा साकारण्यापूर्वी अभ्यास करणं फार गरजेचं होतं. कारण, यापूर्वी डॉक्टरची एखादी भूमिका केली असेल, तर ती विनोदी असेल. पण, ‘लाईफलाईन’ या चित्रपटाच्या बाबतीत डॉक्टरचा प्रवास जरा निराळा होता. मुळात ‘डॉक्टर’ ही प्रवृत्ती किंवा व्यक्ती विनोदी नाही. त्यांचं त्या पेशामागे ज्ञान, विचार, शिक्षण आहे. त्यांनी घेतलेली पदवी आहे आणि या सगळ्याचा विचार करून ही व्यक्तिरेखा गंभीरपणे प्रत्येक कलाकाराने साकारणं गरजेचं असून, त्याच पद्धतीने ते मोठ्या पडद्यावर जबाबदारीने मांडलंदेखील गेलं पाहिजे. या चित्रपटात मी जो डॉक्टर साकारला आहे, त्याची विविध स्वभाव वैशिष्ट्ये आहेत आणि कलाकार म्हणून मी त्या विविध छटा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.”


मीम्सची कला

आजवर केलेल्या कामांमधून किंवा भूमिकांमधून स्वत:कडे काही ठेवलं का? असे विचारले असता प्रामाणिकपणे कबुली देत अशोक सराफ म्हणाले की, “मला मनोरंजनसृष्टीत ५५ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे आणि आजही नव्या आणि वेगळ्या भूमिकांच्या मी शोधात आहे. पण, आत्तापर्यंत मी ज्या भूमिका केल्या, त्यातून मी स्वत:कडे काहीही ठेवलं नाही. याउलट, प्रेक्षकांनी माझ्या त्या भूमिकेकडून काय घेतलं किंवा त्यांनी त्यांच्याकडे त्या कशा ठेवल्या, हे माझ्यासाठी एक कलाकार म्हणून फार महत्त्वाचं आहे. मी ज्या भूमिका साकारल्या आहेत, त्या प्रेक्षकांनी लक्षात ठेवाव्यात, त्याचे मीम्स बनवावेत, त्यांची नक्कल करावी, हे वास्तव मला सुखावणारं आहे. या सगळ्यातून मी ज्या रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी भूमिका साकारल्या, त्यांना मी काहीतरी कायमस्वरुपाची आठवण देऊ शकलो, हे माझ्यासाठी अधिक समाधानकारक आहे.” पुढे ते असंदेखील म्हणाले की, “माझ्या चित्रपटांमधील विविध संवादांचे मीम्स तयार केले जातात आणि मी ते आवर्जून पाहतो. त्यावरून ज्यांनी ते तयार केले आहेत, त्यांची बौद्धिकता आणि वैचारिक झेप कळते आणि मला ते फार आवडतं. कारण, मीम्स बनवणं हे तसं सोप्पं नाही. कारण, प्रसंग लक्षात घेऊन त्यापद्धतीने ते मांडणं आणि त्यातला नेमका विनोद समजून घेणं, ही देखील एक कला आहे आणि आजची पिढी ते चांगल्यारितीने करते, याचा आनंद आहे.”
 
 
एकाग्रतेने केलेले कामं ही आयुष्याची पुंजी

भूतकाळात डोकावून पाहताना अशोक सराफ म्हणाले की, “त्याकाळी मी रात्रंदिवस केवळ तालमीतच रमत होतो. मला कोणतंच व्यावहारिक ज्ञान नव्हतं. माझा रोजचा दिनक्रम म्हणजे सकाळी घरातून बाहेर पडायचं आणि रात्री १-२ वाजता कोणत्याही नाटकाची तालीम करून परत यायचं. नाटकापासून सुरू झालेला प्रवास मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट आणि मालिका इथंवर येऊन ठेपला आणि माझं वेगळं जग निर्माण झालं. मुळात इतक्या वर्षांत मी जी काही कामं केली, ती एकाग्रतेने केली. कारण, ज्यावेळी तुम्हाला आयुष्यात काहीही साध्य करायचं असतं, त्यावेळी प्रामाणिकपणा आणि एकाग्रता तुम्हाला तुमचं यश किंवा ध्येय गाठण्यासाठी फार मदत करतं आणि हे आवर्जून सांगायला आवडेल की, मी जी एकाग्रतेने कामं केली ती प्रेक्षकांना आवडली आणि तीच माझ्या आयुष्याची पुंजी आहे.”
 
देणे रंगभूमीचे...
 
प्रत्येक कलाकाराच्या मनात रंगभूमीची एक विशेष जागा मनाच्या कोपर्‍यात असते. अशोक सराफ यांच्याही आयुष्यात रंगभूमीला तसेच विशेष स्थान आहे. आत्तापर्यंत विविध नाटकांमध्ये त्यांनी अनेक कलाकारांसोबत कामं केली. त्या आठवणींना उजाळा देत ते म्हणाले की, “डॉ. श्रीराम लागू, निळू फुले अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत मोठ्या पडद्यावर आणि रंगमंचावर काम करण्याची संधी मला मिळाली. या कलाकारांसोबत काम करताना, मी नजरेने अनेक गोष्टी हेरल्या आणि माझ्याकडे अभिनेता म्हणून जपून ठेवल्या. म्हणजे, नाटकाचा प्रयोग सुरू असताना डॉ. लागू यांच्याकडून मी वक्तशीरपणा शिकलो. कारण, नट म्हणून वक्तशीरपणा फायद्याचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नाटकाचा प्रयोग सुरू असताना प्रामाणिकपणा फार गरजेचा आहे. तो कसा? तर प्रयोगात आपलं काम झालं की ग्रीन रुममध्ये न जाता, डॉ. लागू विंगेत खुर्ची टाकून शांत बसायचे. मी पूर्वी आपलं काम झालं की हिंडायचो, पण त्यांच्यासोबत काम करत असताना मी ती बाब शिकलो आणि आजही मी नाटकाच्या प्रयोगाला ते काटेकोरपणे पाळतो.”


लक्ष्मीकांतच्या जाण्याने एक तोडीसतोड सहकलाकार गमावल्याचे दु:ख

अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे ही मराठी विनोदी चित्रपटांतील जोडगोळी होती. त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना सराफ म्हणाले की, “लक्ष्मीकांत बेर्डे ‘टॅलेन्टेड’ अभिनेता होता. नट म्हणून तुमची निरीक्षण क्षमता फार महत्त्वाची असते आणि ती लक्ष्मीकांतमध्ये होती. आत्तापर्यंत मी आणि लक्ष्मीकांतने ५० चित्रपटांमध्ये एकत्रित कामं केली. त्याचं विनोदाचं ‘टायमिंग’ फार उत्तम होतं आणि त्याने माझ्या विनोदाच्या ‘टायमिंग’शी ते योग्यरित्या जुळवून घेतल्यामुळे आम्हाला एकत्र काम करण्यात फार आनंददेखील येत होता. त्याच्या जाण्यामुळे मला खूप त्रास झाला, माझी पंचाईत झाली होती खरंतर. कारण, तोडीसतोड सहकलाकार सोबतीला असला की, काम करायला एक वेगळीच ऊर्जा आणि उत्स्फूर्तता मिळते, ती लक्ष्मीकांतच्या जाण्याने मला खूप पोकळी निर्माण झाली.”
 
आता लवकरच अशोक सराफ सचिन पिळगावकर दिग्दर्शित ’नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात पुन्हा झळकणार आहेत.

Powered By Sangraha 9.0