धारावीतील 'एन शिवराज'उद्यानाची दूरवस्था!

09 Aug 2024 12:04:02
N Shivraj Park News


मुंबई :
धारावीतील एन शिवराज उद्यानाच्या नुतनीकरणाचे आणि दुरुस्तीचे काम फेब्रुवारी २०२४ पासून संथ गतीने सुरु असून काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या उद्यानात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. तसेच उद्यानाला सुरक्षाकर्मी नसल्याने मद्यापी आजूबाजूच्या परिसरात सर्रास व्यसन करताना पाहायला मिळतात. त्यामुळे क्रिडाप्रेमींनी आणि स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या संबंधित विभागाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

अर्धवट कामामुळे ठिकठिकाणी खड्डे, मातीचे ढिग पाहायला मिळतात. उद्यानात पाणी नसल्याने झाडे सुकून गेली आहेत. तसेच लहान मुलांच्या खेळाचे साहित्य नसल्याने मुलांनी ही शिवराज उद्यानाकडे पाठ फिरवली आहे. त्यात आठवड्यातील काही दिवस उद्यानाला टाळे लावलेले असते. उद्यानाच्या दोन नंबर गेटजवळ कचऱ्याचे ढिगारे पाहायला मिळतात. तसेच उद्यानाच्या आतील बाजूला ही काहीशी अशीच परिस्थीती आहे. यामुळे स्थानिकांनी सुरक्षाकर्मी तैनात करण्याची आणि उद्यानाची देखभाल पालिकेने करावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान संबंधित वार्डच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांशी 'दै.मुंबई तरुण भारत'ने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, पावसाळ्याआधी काम सुरु झाल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. तसेच उद्यान नागरिकांसाठी सुरु आहे. मात्र काही ठिकाणी अस्वच्छता असल्याचे ही त्यांनी सांगितले.

मुंबईत मुलांना खेळासाठी उद्याने किंवा स्वतंत्र जागा नसताना पालिकेअंतर्गत येणारे एन शिवराज उद्यान अनेक दिवसांपासून बंद आहे. उद्यानाच्या आजूबाजूला अनाधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट असतो. तसेच उद्यानाच्या आत बाजूला मद्यापी रात्री अपरात्री व्यसन करायला येत असतात. नागरिकांना यामुळे त्रास होत असतो. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या संबधित विभागाने या प्रकरणात लक्ष देऊन उद्यान सर्वसामान्य नागरिकांसाठी स्वच्छ करून लवकरात लवकर सुरु करावे.

सिद्धेश जाधव , स्थानिक रहिवाशी
Powered By Sangraha 9.0