दिल्लीकडे झुकल्या माना...

07 Aug 2024 21:22:20
uddhav thackeray delhi tour


परवा बोलले, ते काल नाही आणि काल बोलले ते आज नाही, अशी सत्तेसाठी मानसिकता असणार्‍यांबद्दल काय बोलणार? हो, ‘दिल्लीपुढे झुकणार नाही, वाकणार नाही’ वगैरे वगैरे बोलणारे उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौर्‍यावर आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी दिल्लीत आहोत, असे ते म्हणाले. आतातरी माहिती मिळेल की, महाराष्ट्रातून दिल्लीला जाताना वाटेत लागणारे गुजरात आणि पुढची दिल्ली भारतातच आहेत. उद्धव ठाकरे आणि त्यांचे ‘डॉक्टरपेक्षा कंपाऊंडरच मोठा असतो’, असे मानणारे सहकारी संजय राऊत हे गेल्या काही वर्षांमध्ये दिल्ली आणि गुजरातबद्दल बोलत असतात. जणू दिल्ली काय, गुजरात काय, उत्तर प्रदेश काय, ही राज्ये देशात नाहीतच, असाच त्यांचा आविर्भाव असतो. सत्तेत असलेले सत्ताधारी दिल्लीत राहतात. म्हणून त्यांना औरंगजेब काय, अफजलखान काय, असे म्हणायची उद्धव आणि त्यांच्या समविचारी लोकांची चढाओढ लागत असते. त्याच दिल्लीत उद्धव ठाकरे दौरा करत आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीसोबतचे खासदार तिथेच राहून उबाठा गटाच्या उमेदवाराला मतदान करतील, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मागे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्रितपणे जास्त जागा जिंकल्या. त्यानंतर विधान परिषदेची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये महायुतीच्या पारड्यात यश आले. विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतरही विधान परिषदेमध्ये आमदार महायुतीसोबतच राहिले, हे सत्य आहे. या अनुषंगाने महायुतीतले खासदार आपल्याला मतदान करतील, हे उद्धव ठाकरे यांचे म्हणणे म्हणजे वस्तीपातळीवरील भाषेत पुड्या सोडणे असे आहे. यावर काही लोक म्हणतात, “मच्छर कसा मारावा, हा प्रश्न पडणार्‍यांनाही स्वप्न बघायचा हक्क असतोच की.” मात्र दिल्लीच्या वार्‍या करणारेच काही दिवसांनी मराठी माणसाला दिल्ली आणि महाराष्ट्र असा प्रांतवाद करायला भरीस पाडणार आहेत. त्याचबरोबर, मराठी मुसलमान कसे इतर हिंदूंपेक्षा आपलेच आहेत, असे मराठी माणसाच्या मनात भरवण्यासाठी वाटेल ते करणार आहेत. म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने खोट्या भावभावनेला सहानुभूतीला बळी जाऊ नये. वारसदाराने पूर्वजांचे विचार जपले, की खपवले हा विचार करावा.

विमर्श आणि विनेश

स्पर्धेचे सर्व अटीनियम कसोशीने पाळणे हे काम स्पर्धकाचेच. या पार्श्वभूमीवर विनेश फोगटने उपांत्य फेरी जिंकली. मात्र, अंतिम स्पर्धेदरम्यान तिचे वजन नियमातील 50 किलो वजनापेक्षा 100 ग्रॅमने वाढले. ती ऑलिम्पिक स्पर्धेतून बाहेर झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विनेशला म्हटले की, “तुम्ही चॅम्पियनच्या चॅम्पियन आहात. आजच्या असफलतेचे दुःख मी शब्दांतही व्यक्त करू शकत नाही. असो, आधीही ऑलिम्पिक खेळलेल्या विनेशला ऑलिम्पिकचे नियम माहीत असतीलच. अंतिम स्पर्धेत निर्धारित केलेल्या वजनापेक्षा एक ग्रॅमही वजन जास्त असले, तरीसुद्धा स्पर्धकाला अपात्र ठरवले जाते. तसेच उपांत्य फेरी जिंकली, तरी त्याला विजेतेपद दिले जाणार नाही. विनेशचे वजन तब्बल दोन किलो जास्त होते. अंतिम स्पर्धेत सहभागी होता यावे म्हणून मग वजन कमी करण्यासाठी तिने रात्रभर बरेच प्रयत्न केले. पण, स्पर्धेच्या वेळेपर्यंत तिचे वजन निर्धारित वजनापेक्षा 100 ग्रॅम जास्तच होते. असेच सुप्रसिद्ध मुष्टिपटू मेरी कोम हिच्यासोबत 2018 साली घडले होते. पोलंड येथील ओपन बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमचे वजन दोन किलोने वाढले. मात्र, मेरी कोमने चार तासांत दोन किलो वजन कमी केले. विनेशचे दुर्देव आहेच. सगळ्यांसाठी हा धक्का आहे. आपण सगळे विनेशसोबत आहोत. मात्र, देशाच्या स्थिरतेविरोधात विमर्श बनवणार्‍या लबाडांचे काय? त्यांना माहीत आहे की, भारतीय हिंदू कुणी काहीही बोलले, तरी विश्वास ठेवतात. त्यामुळे विनेशच्या या स्थितीवर हे समाजघातकी लोक विविध मार्गाने विमर्श करण्यासाठी सिद्ध झाले आहेत. हुमा कुरेशी, फरहान अख्तर, स्वरा भास्कर आणि नव्याने त्या टोळक्यात सामील झालेल्या सोनाक्षी जहिर सिन्हा आणि समविचारी नेहमीची पात्र विनेशला अपात्र करण्याबाबत संशय उत्पन्न व्हावा, असे मोघम बोलत आहेत. उपांत्य स्पर्धेत विनेशचे जिंकणे म्हणजे भारताचे शासन, केंद्र सरकार आणि मोदींच्या विरोधातले जिंकणे असे यांचे समविचारी लोक प्रसार माध्यमांवर सांगत होते. विनेश उपांत्य फेरीत जिंकली, तर विनेश आणि तिचे समर्थक विजयी; आणि वाढलेले वजन कमी झाले नाही, म्हणून अंतिम फेरीतून बाहेर पडावे लागले, तर मग जबाबादार कोण?

9594969638
Powered By Sangraha 9.0