विवेके स्वस्वरूपीं भरावें।

07 Aug 2024 22:31:41
ramdas swami shlok bhavarth


मानवी मन हे नाना विषयात गुंतलेले असते. या विषयांच्या चिंतनातून मनाला मिळणारे सुखच भौतिक जगालाच सत्य मानण्याची खरी सुरुवात आहे. कारण या सुखातून मनाला बाहेर पडावेसे वाटत नाही. मात्र हे सुख माणसाला त्याच्या अस्तित्वाची ओळख करून देण्यास सक्षम नाही. ही ओळख करून घेण्यासाठी अंगीकार करण्याच्या मार्ग समर्थ रामदास स्वामींनी सांगितला. त्या श्लोकाचा हा भावार्थ...

समर्थांनी यापूर्वीच्या मनाच्या श्लोकांतून प्रतिपादन केले आहे की, अविद्यागुणाने माणसाच्या ठिकाणी भ्रमाची निर्मिती होऊन, त्याला आपले नेमके हित कशात आहे हे समजत नाही. देहबुद्धी, अहंकार, गर्व, ताठा हे माणसाला चुकीच्या मार्गाने घेऊन जातात. भ्रामक अविचारी समजुतींमुळे कुठे विश्वास ठेवावा आणि कशावर संशय घ्यावा, याचा विवेक न राहिल्याने माणूस प्रापंचिक गोष्टीत तसेच हित-अहितकारी निर्णय घेण्यात चुकत जातो. विचारांची दिशा लक्षात न आल्याने, आत्महित कशात आहे हेच समजेनासे होते. आत्महितकारक विचाराचा मार्ग चुकल्याने आपले अहित होत आहे, हेही माणसाला अविद्येने लक्षात येत नाही असे स्वामींचे मत आहे. यासाठी विचारांच्या साहाय्याने या जगात शाश्वत काय आहे, याचा शोध घेत गेले पाहिजे. तसेच जगात शाश्वत सत्य काय आहे? याचा अत्यंत विचारपूर्वक आदरपूर्वक शोध घेणे महत्त्वाचे आहे. सत्याचा काळजीपूर्वक, शांत मनाने शोध घेत गेले, त्यावर चिंतन केले, तर शाश्वत-अशाश्वताचा विवेक समजू लागतो आणि त्याद्वारा ईश्वराच्या साक्षात्कारापर्यंत पोहोचता येते. परब्रह्माची जाणीव झाल्यावर भ्रम, भ्रांती तसेच त्यातून उत्पन्न झालेली अविद्या हे सारे मावळतात, असे स्वामींनी श्लोक क्रमांक 144 मध्ये स्पष्ट केले आहे. त्या अगोदर समर्थांनी जगातील शाश्वत-अशाश्वताचे, सत्य-असत्याचे, विवरण दासबोधात सविस्तरपणे केले आहे. त्यावर एक नजर टाकली तर भ्रम, भ्रांति, अविद्या यांना ओलांडून ईश्वरी सत्तेकडे जाण्याचा मार्ग सापडू शकतो.

पारमार्थिक संवादात सर्वसाधारणपणे ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ असे बोलण्याची रीत आहे. त्याचा शब्दशः अर्थ लावताना, ब्रह्म सत्य आहे व हे जग मिथ्या म्हणजे खोटे आहे’ असा लावला जातो. दृश्यजगता संबंधाने विश्लेषण करताना, ‘जगन्मिथ्या’ याचा अर्थ हे जग मुळात नाही, ते खोटे आहे, भासमान आहे, ते एक स्वप्न आहे, ती माया आहे, असा अर्थ संतकुळाने गृहीत धरला असला तरी, समर्थांना तो मान्य नाही. समर्थांनी त्याच्याकडे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून बघितले आहे. जग हे एक स्वप्न आहे, तो भास आहे, ते खोटे आहे असे कितीही म्हटले, तरी ते आपल्याला दिसते, जाणवते, अनुभवता येते, मग त्याला खोटे कसे म्हणता येईल, असा विचार करून स्वामींनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. स्वामींच्या मते ’जगन्मिथ्या’ या सूत्रार्धाचा अर्थ हे जग मुळात नाही, ते स्वप्नाप्रमाणे भासमान आहे, असा करता येत नाही, हे प्रथम स्वामींनी स्पष्ट केले. समर्थांच्या मते हे दृश्य जगत मिथ्या आहे. म्हणजे ते विनाशी आहे. या जगातील प्रत्येक दृश्यवस्तू वेगवेगळ्या घटकांनी बनलेली आहे, आणि ती विघटनक्षम आहे. आज ना उद्या घटक वेगळे होऊन, त्या पदार्थाचे दृश्य अस्तित्व राहणार नाही. म्हणजे तो पदार्थ नाशवंत आहे. हे प्रतिपादन समर्थांनी दासबोधात बर्‍याच ठिकाणी केलेले आढळते. हे दृश्य जगत, विघटित होऊन सर्व काही नाश पावणार आहे, म्हणून ते मिथ्या, अशाश्वत असा स्वामींचा अभिप्राय आहे. तथापि परब्रह्माचे विघटन होत नाही, म्हणून ते शाश्वत आणि सत्य आहे, असा विवेकपूर्ण विचार करीत गेल्यास, ‘अज्ञान भ्रम भ्रांती सर्व मोडे’ अशी स्थिती होऊन, ‘देव जोडे’पर्यंत मजल मारता येते. अशा शब्दांत स्वामींनी श्लोक क्रमांक 144चा शेवट केला आहे.

वस्तुतः अविनाशी शाश्वत सत्य स्वतः सिद्ध असूनही, ते शोधण्याची आपल्यावर वेळ यावी, असे का व्हावे? याचा अर्थ आपली विचारांची दिशा चुकली, आपले चिंतन विवेकाच्या दिशेने न होता, ते विकारांच्या दिशेने झाले, असे म्हणावे लागते. त्यांतून जीवाला कसे सावरता येईल, हे आता स्वामी पुढील श्लोकात सांगत आहेत.

सदा विषयो चिंतितां जीव जाला।
अहंभाव अज्ञान जन्मासि आला।
विवेके सदा सस्वरूपी भरावें।
जिवा ऊगमी जन्म नाहीं स्वभावें॥145॥
प्रत्येक जीवाचे आत्मस्वरूप आनंदमय अविनाशी परब्रतत्त्व असल्याचे ज्ञानी पुरुषांनी सांगितले आहे. ते समजण्यासाठी आत्मज्ञानाची आवश्यकता असते, असे स्वामींनी स्पष्ट केले आहे. स्वामींनी यापूर्वीच्या मनाच्या श्लोकांतून, आत्मज्ञानाविषयी वेगवेगळ्या पद्धतींनी समजावून सांगितले आहे. सर्वसाधारणपणे आपण भौतिक गोष्टींच्या माहिती संकलनाला व्यवहारात ज्ञान असे म्हणतो. पण ते ज्ञान नव्हे, तसेच भौतिकज्ञान आणि आत्मज्ञान यात फरक आहे. स्वामी जेथे ज्ञान शब्दाचा वापर करतात, तेथे त्याचा अर्थ भौतिकज्ञान असा नसून त्यांना आत्मज्ञान हा अर्थ अभिप्रेत असतो, हे त्यांच्या विवेचनावरून दिसून येते.

स्वामींच्या मते अहंकार, गर्व, ताठा आणि ज्ञानाचा अभाव म्हणजेच अज्ञान. यांच्याच आहारी गेल्याने ज्ञान स्वतः स्पष्ट असूनही, ते मिळवताना माणसाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हे अहंकार, अज्ञान जीवाच्या ठिकाणी कसे निर्माण होतात यासंबंधीचे विवेचन, स्वामी आता करीत आहेत. सर्वसाधारणपणे जीवाचा अनुभव असा की, माणसाचे मन भौतिक विषयात पूर्णपणे गुरफटून गेलेले असते. या जगात असंख्य अशाश्वत वस्तूंचा साठा भरलेला आहे, त्यांना विषय असे म्हणतात. एखादेवेळी शांतपणे बसून आपल्या मनाचा खेळ पाहता आला, तर हे मन विषयात कसे भरकटत जाते याचा स्वयंशोध घेता येतो. निद्रा अवस्थेतही या मनाचे व्यापार चालूच असतात. तूर्तास झोपेतील मनोव्यापारांचा विचार बाजूस ठेवून, प्रापंचिक विषयाचा विचार करू. सकाळी उठल्यापासून दिवसभराचा विचार केला, तर मन अनेक विषयांची व्यर्थ चिंता करीत असते. कसे ते एक साधे उदाहरण घेऊन पाहू.

पुस्तक वाचायला घेणे ही सामान्य घटना आहे. तरी त्यावेळी मनात येते की, यापूर्वी आपण केव्हा वाचन केले होते, तेव्हा कोण बरोबर होते, आपण वाचन का थांबवले वगैरे. तसेच वाचन म्हटले की, शाळेत असताना आपण शालेय अभ्यासाची पुस्तके टाकून, चोरून कथा-कादंबर्‍या कशा वाचल्या होत्या ते सारे आठवून मन विषयात भरकटते. एक विषय संपला की दुसरा, असे अनंत विषय मनात येत राहतात. मन क्षणभरही स्वस्थ बसत नाही. स्वामींनी त्याचे वर्णन, ‘सदा विषयों चिंतितां जीव जाला।’ असे केले आहे. जीव सतत विषयांचे चिंतन करतो, कारण विषयसेवनातून आनंद मिळेलच अशी मनाने समजूत करून घेतलेली असते. यातून अहंभाव आणि अज्ञान जन्माला येतात, असे स्वामींनी म्हटले आहे. वास्तविक खरे स्वरूप आनंदमय असतानाही, जीव अहंकारामुळे व अज्ञानामुळे बाह्य विषयसेवनात आनंद शोधत असतो. विषयोपभोगात आनंद शोधताना, आपला देह, इतरांचा देह, त्यांचा सहवास, परिस्थिती काळ-वेळ यांवर अवलंबून राहावे लागते. जीव परावलंबी व संकुचित बनतो. आणि आपले आनंदमयी आत्मस्वरूप विसरतो. याला अज्ञान म्हटले आहे.

यापासून सुटका हवी असेल तर, विवेकाच्या साहाय्याने आपल्या मूळ स्वरूपाचा शोध घेऊन आपण स्वस्वरूपात विलीन व्हावे. अहंकार व अज्ञान यांना तेथे स्थान नाही. जीवाच्या उगमस्थानी अहंकार, अज्ञान यांचा जन्म संभवत नाही. विवेकाच्या साहाय्याने जीवाला आत्मज्ञान झाले, तर उद्धाराचा मार्ग सापडतो. जीव मनातीत झाल्याने अहंकारमुक्त होऊन त्याचा जन्ममरणाशी संबंध राहात नाही.

7738778322
Powered By Sangraha 9.0